घरफिचर्ससारांश...फिर भी तेरा इंतजार है !

…फिर भी तेरा इंतजार है !

Subscribe

एक वास्तववादी सिनेमा म्हणून ‘सत्या’ हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अजरामर झालेला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अभिनेता मनोज बाजपेयीने साकारलेली ‘भीकू म्हात्रे’ ही व्यक्तिरेखा अविस्मरणीय झालेली आहे. बाजपेयीच्या अभिनय कारकिर्दीतली ही आजवरची सर्वोत्तम भूमिका समजली जाते. यातली गाणी गुलजार यांनी लिहिली असून संगीतकार आहेत विशाल भारद्वाज. या गीतकार-संगीतकार जोडीचा हा ‘माचीस’ नंतरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट. वर्मा यांनी चित्रपटाच्या संगीताकडे विशेष लक्ष दिलेलं आहे.‘तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है...’ हे त्यातलं गाणं खास ठरलं.

राम गोपाल वर्मा निर्मित आणि दिग्दर्शित ‘सत्या’ हा चित्रपट ३ जुलै १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात उर्मिला मातोंडकर, जे.डी.चक्रवर्ती, मनोज बाजपेयी, शेफाली शाह, सौरभ शुक्ला, परेश रावल, गोविंद नामदेव, आदित्य श्रीवास्तव या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. राम गोपाल वर्मा यांच्या कारकिर्दीतला हा एक अत्यंत महत्वपूर्ण चित्रपट समजला जातो. मुंबईच्या अंडरवर्ल्ड विश्वाचं थरारक नि अंगावर येणारं चित्रण वर्मा यांनी यात केलं आहे. एक वास्तववादी सिनेमा म्हणून ‘सत्या’ हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अजरामर झालेला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अभिनेता मनोज बाजपेयीने साकारलेली ‘भीकू म्हात्रे’ ही व्यक्तिरेखा अविस्मरणीय झालेली आहे. बाजपेयीच्या अभिनय कारकिर्दीतली ही आजवरची सर्वोत्तम भूमिका समजली जाते. यातली गाणी गुलजार यांनी लिहिली असून संगीतकार आहेत विशाल भारद्वाज. या गीतकार-संगीतकार जोडीचा हा ‘माचीस’ नंतरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट.

वर्मा यांनी चित्रपटाच्या संगीताकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. त्यांनी पार्श्वसंगीतासाठी संदीप चौटा या तत्कालीन नवोदित संगीतकाराला संधी दिली. त्यानेही या संधीचं सोने केलं. या चित्रपटाचं पार्श्वसंगीतही अतिशय हटके नि वैशिष्ठ्यपूर्ण आहे. (इच्छुकांनी ते आवर्जून ऐकायला हवं. ) समीक्षकांनीदेखील या पार्श्वसंगीताची वाहवा केली होती. मनोज बाजपेयीला या चित्रपटातल्या भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर शेफाली शाह (समीक्षक पुरस्कार-सहाय्यक अभिनेत्री), मनोज बाजपेयी (समीक्षक पुरस्कार-उत्कृष्ट अभिनेता), संदीप चौटा (उत्कृष्ट पार्श्वसंगीत), एच. श्रीधर ( उत्कृष्ट ध्वनी संयोजन) आणि अपूर्व असरानी व भानोदया (उत्कृष्ट संपादन ) हे कलावंत फिल्म पुरस्कार विजेते ठरले.

- Advertisement -

या चित्रपटात बादलोंसे काट काट के… (भूपेंद्रसिंह), तू मेरे पास भी है… (लता-हरिहरन), गोली मार भेजे में…( मनो), गीला-गीला पानी…(लता) आणि सपनो में मिलती है…(आशा- सुरेश वाडकर) अशी पांच श्रवणीय गाणी होती. यातली गोली मार भेजे में… आणि सपनो में मिलती है… ही दोन गाणी तूफान लोकप्रिय झाली होती. तर उर्वरित गाणी दर्दी संगीतरसिकांच्या मनात घर करून राहिलीयेत. यातल्याच ‘तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है…’ या गाण्यावर हा एक दृष्टीक्षेप:

तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है
फिर भी तेरा इंतजार है…
तेरे लिए सूरज उगाया है, तेरे लिए रस्ता बिछाया है
तेरे लिए सूरज उगाया है, तेरे लिए मौसम मंगाया है
ये जहां एक पार है
तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है…

- Advertisement -

ऐ चलो चले, चलते ही, चलते ही, चलते रहे
आओ खूब हंसे, हंसते ही, हंसते ही, हंसते रहे
दिल पे कहां इख्तीयार है
तू मेरे पास भी है, तू मेरे साथ भी है
फिर भी तेरा इंतजार है…

तू खरं म्हणजे माझ्याजवळ आहेस… सोबतही आहेस… पण का कुणास ठाऊक तुझीच मी वाट पाहत आहे… कळत नाही हे असं का होत आहे… जवळ आहेस नि सोबतही आहेस तरी पण काही तरी कमतरता जाणवत आहे… किती वाट पाहायला लागली या जवळिकीची… या सोबतीची… आता भेटलोय तरी मन सैरभैर झालंय… मनात उगाचच नको नको त्या शंका येताहेत… आपला हा सहवास, ही सोबत क्षणभंगुर तर ठरणार नाही ना याचीच भीती वाटतेय… आपली एकमेकांपासून ताटातूट झाली तर कसा सहन होईल तो जीवघेणा विरह…जगता येईल आपल्याला एकट्याने ?

हा रवी तुझ्याचसाठी आलाय… तू नसतीस तर तो आलाच नसता… तुझं असणं, तुझं अस्तित्व आहे म्हणूनच तो उगवला आहे… ही वाट, हा रस्ता फक्त नि फक्त तुझ्या पावलांना काटे टोचू नये म्हणूनच अंथरला आहे… तू या वाटेने येणार म्हणूनच हा रस्ता तुझ्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे… अन्यथा या घनदाट जंगलात याचं काय काम… हा आताचा माहोल, हा ऋतू केवळ तुला भेटण्यासाठी आलेला आहे. तुझ्या असण्याने हा ऋतूदेखील बहरून आलाय… पुलकित झालाय… सारं जग तुझ्यासाठी चैत्यन्याने मोहरलं आहे… असंच जाऊ या दूरवर… न थांबता… क्षितिजाच्या पलीकडे… कधी वाटतं मनसोक्त रडून घ्यावं एकमेकांच्या मिठीत…तर कधी हसतचं राहावंसं वाटतंय … वेड्यासारखं! या मनावर नाही ना ठेवलं जात नियंत्रण… ते उधाण वार्‍यासारखं चौफेर उधळत राहतं… काय करावं सुचत नाही… तू आता या क्षणी समीप आहेस, सोबतीलाही आहेसच ना पण.. पण तरीही तुझी प्रतीक्षा आहे… हो तुझीच वाट पाहत आहे… हा प्रतीक्षेचा जीवघेणा काळ कधी संपेल? संपेल ना? की नाही संपणार कधीच? नुसत्या जाणिवेनं मन भयकंपित होऊन जातं!

लता आणि हरिहरन यांच्या भावमधुर स्वरातलं हे एक नितांत श्रवणीय युगल गीत. गुलजारने अतिशय सध्या, सोप्या आणि सहज शब्दांमध्ये अनुरागाची अभिव्यक्ती केली आहे. या लेखमालेच्या पहिल्या लेखांत म्हटल्याप्रमाणे राहुलदेव बर्मन यांच्यानंतर संगीतकार विशाल भारद्वाज सोबत गुलजार यांची विशेष जोडी जमली. या जोडगोळीने एकापेक्षा एक सरस गाणी श्रोत्यांना दिली आहेत. राहुलदेव बर्मन यांच्या संगीताशी नातं सांगणारं पण त्यांच्या शैलीची नक्कल नसलेलं संगीत विशाल भारद्वाज या प्रतिभावंत कलाकाराने दिलं आहे. या गाण्यासाठी पडद्यावर उर्मिला मातोंडकर आणि चक्रवर्ती या कलावंतांचा सहज नि नैसर्गिक वावर मन प्रसन्न करणारा आहे. विशेषतः उर्मिला खूप देखणी, सालस नि सोज्वळ रूपांत दिसते. पडद्यावरचे अभिनेते आणि पडद्याबाहेरचे गायक-गीतकार-संगीतकार-ध्वनीमुद्रक-कॅमेरापर्सन यांनी सर्जकतेनं केलेल्या कामगिरीचं फलित म्हणजे हे गाणं !

–प्रवीण घोडेस्वार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -