घरताज्या घडामोडीरानातल्या भाकरी

रानातल्या भाकरी

Subscribe

लसूण, मिरचीचा ठेचा घालून केलेली पाण्यातली किंवा ताकातली भाकरी. ही भाकरी इतकी ठसकेबाज आणि नखरेल दिसते की...गरमा गरम भाकरी तयार होताना..एखाद्या वाटसरूने तिथे क्षणभर थबकायलाच पाहिजे आणि त्या माऊलीकडून कोर, चतकोर भाकरी घेऊनच मग पुढे गेलं पाहिजे. ही भाकरी ताक न घालता पाण्यातही भिजवतात. पण पाण्यातल्या भाकरीपेक्षा ताकातली भाकरी अधिक खमंग लागते. सुगीच्या दिवसात दिवस संपला तरी कामे संपत नाहीत. त्यात घरच्या बायांवर स्वैपाकाचीही जबाबदारी. अगदी काही नाही केलं तरी भाकरी आणि तोंंडी लावणं तरी केलं पाहिजे...

‘रानातल्या भाकरी’ म्हटलं की माझी पंचेद्रिये जागी होतात आणि डोळ्यासमोर कितीतरी प्रकारच्या भाकर्‍या येतात. मूळात रान म्हणजे काय तर आपलं शेत. तर मला माहिती असलेल्या प्रकारांपैकी काही प्रकारच्या भाकर्‍या या सुगीच्या दिवसात विशेषत: शेतघरांमध्ये करतात तर त्यापैकी दुधातल्या आणि उसाच्या रसातल्या दशम्या मात्र रानात आणि सहलीला जातानाही करून घेतल्या जातात.

त्यापैकी अगदी साधा प्रकार म्हणजे.. थंड पाण्यातली भाकरी. शेतीची कामे पहाटेपासूनच सुरू होतात. लवकर आवरावे लागते. त्यावेळी पाणी गरम करुन भाकरीचं पीठ मळण्याऐवजी थंड पाणी टाकूनच पीठ मळतात. पीठ ताजं असलं तरच थंड पाण्यातली भाकरी चांगली होते, नाहीतर कटकटीत. अर्थातच ऊस चावून बळकट दात असलेले गडी शहरातल्या लोकांसारखी मऊ भाकरी पसंत करत नाहीत. त्यांना पाहिजे असते ती कडक भाकरी. थंड पाण्याची भाकरी… मजबूत हिरड्या आणि दात असलेल्या दंतमर्द आणि मर्दान्यांना आवडणारी अशी भाकरी असते. अजून एक सोप्या प्रकारची भाकरी म्हणजे… ‘ताकातली भाकरी’…

- Advertisement -

पूर्वी घरातल्या बाया बापड्यासुध्दा सुगीच्या वेळी शेतातल्या घरात रहायला जात. अर्थात तशातही बायका दूध दुभत्याचे पहात. विरजणे लावत आणि कासंडी भरून दह्याचं ताक करून ठेवत. दुपारच्या उन्हाच्या तावाला घरची दारची गडी माणसं ताक पिऊन थंड होतात. एखाद्याला उष्णता झाली तर ताकातली भाकरी करून द्यायची पध्दत असते. अंगावर उष्णतेने उठलेले बेंड ताकातल्या भाकरीने कमीच होऊन जाते.

तिसर्‍या प्रकारची भाकरी म्हणजे लसूण, मिरचीचा ठेचा घालून केलेली पाण्यातली किंवा ताकातली भाकरी. ही भाकरी इतकी ठसकेबाज आणि नखरेल दिसते की…गरमा गरम भाकरी तयार होताना..एखाद्या वाटसरूने तिथे क्षणभर थबकायलाच पाहिजे आणि त्या माऊलीकडून कोर, चतकोर भाकरी घेऊनच मग पुढे गेलं पाहिजे. ही भाकरी ताक न घालता पाण्यातही भिजवतात. पण पाण्यातल्या भाकरीपेक्षा ताकातली भाकरी अधिक खमंग लागते. सुगीच्या दिवसात दिवस संपला तरी कामे संपत नाहीत. त्यात घरच्या बायांवर स्वैपाकाचीही जबाबदारी. अगदी काही नाही केलं तरी भाकरी आणि तोंंडी लावणं तरी केलं पाहिजे…

- Advertisement -

मग कुणा माऊलीला भाकरीत लसूण मिरचीचा ठेचा घालावा असं वाटलं असणार…. प्रयोग म्हणून तिने ते पीठ ताकाने भिजवलं असणार…एकदा का घरच्या मंडळींना ही भाकरी रूचली…मग ती पाककृती पसरायला कितीसा वेळ लागणार..! त्यामुळे हिच्याकडून.. तिच्याकडे….असं करत करत ही ताकातली भाकरी म्हणजे शेतातल्या जेवणाची एक स्पेशालिटीच झाली म्हणा की! काटवटीत बाजरी, जोंधळा, नाचणी किंवा तांदूळ यापैकी कशाचंही पीठ घ्यावं आणि त्यामध्ये भरपूर लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून वाटलेला ठेचा घालावा. एखादी सासुरवाशीण नादिष्टपणाने हा ठेचा सगळ्या पीठाला अलवारपणे चोळत बसते मग तिने केलेल्या भाकरी अधिक चवदार लागतात..

मग त्यातलं थोडं थोडं पीठ घेऊन ताकात भिजवून ..या भाकरी थापायच्या…या भाकरीला लगेच उलटावं लागतं.. कारण तिला पाणी लावत नाहीत. ही भाकरी गरमागरम खाल्ली तर तोंडी लावायला कांदा आणि भूईमुगाच्या शेंगा असल्या तरी पुरे. गार भाकरीही चवदार लागते. मुख्य म्हणजे मऊ रहाते. शेतमजुरी, ऊसतोडणीसाठी आलेल्या कामकरी स्त्रियांना भाजी भाकरी असं रांधायला कुठला वेळ… त्यामुळे त्या बायकांच्या दुपारच्या शिदोरीतही ठेचा घातलेली ताकातली भाकरी असणारच. ही भाकरी शिळी झाली की कच्चं तेल आणि मुठीने फोडलेला कांदा घालून चूरा करावा.. कधी भाकर थापायलाही वेळ नाही झाला आणि चूरा करून नेला तरी गडीमाणसं खूश. ही भाकरी 2-3 दिवस टिकते. जास्त दिवस टिकवायची असली तर भाकरीचे तुकडे करून उन्हात ठेवावेत.

घरातल्या पोराटोरांना भातके म्हणून देता येतात किंवा खेळता खेळता मध्ये काही चघळावसं वाटलं तर पोरांच्या पैरणीच्या खिशात या भाकरीचे तुकडे भरून ठेवता येतात. शेतघरात दोन तीन दिवस रहायचं असेल तर किंवा गावाबाहेरच्या देवळातल्या सहलीसाठी मात्र दशम्या आवर्जून केल्या जातात. भाकरीचं पीठ निरशा दूधात किंचितसं मीठ घालून मळून केलेली भाकरी, तिला दशमी म्हणतात.

दशमी करताना काहीजण दूध उकळतात आणि त्यात गूळ आणि किंचित मीठ घालतात. त्यात भाकरीचे पीठ घालून झाकून ठेवतात. पंधरा वीस मिनिटाने ते पीठ मळून भाकरी करतात. ही भाकरी पोरांना फारच आवडते. या भाकरीचे तूप आणि अजून थोडा गूळ घालून लाडू पण बनवता येतात. हे एक शेतावरचे पक्वान्नच आहे. आता शेवटचा प्रकार म्हणजे उसाच्या रसातली भाकरी…ही भाकरी गुर्‍हाळावर बनते..उसाच्या ताज्या रसात भाकरीचं पीठ मळून ही भाकरी करतात. ही भाकरी गार गरम कशीही चांगली लागते पण तिच्याबरोबर खायला रानातल्या वांग्याची मसालेदार दमदार भाजी हवी…तरंच तिची खरी मजा…

आपल्याकडे काही रान नाही… आणि या कोरोना काळात शक्यतो बाहेर भटकायचं पण नाही…पण निदान भाकर्‍यांचे सगळे प्रकार आपल्या घरी सहज बनतील आणि घरबसल्या रानातली मजा चाखता येईल…खरंय ना!

  • डॉ. मंजुषा देशपांडे
    (लेखिका कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातील लोकविकास केंद्राच्या संचालक आहेत)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -