घरफिचर्ससारांशकाळाबरोबर बदलणारे तंत्रज्ञान

काळाबरोबर बदलणारे तंत्रज्ञान

Subscribe

बदलत्या तंत्रज्ञानाचे बरेचसे फायदे आपल्याला आजच्या आधुनिक युगात अनुभवाला येत आहेत आणि यापुढेही बदलत्या तंत्रज्ञानामुळे आपले जनजीवन आणखीनच सुखसोयीचे होणार आहे.

कालच्या आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदललेल्या जीवनाची काही उदाहरणे.

- Advertisement -

१ .आजच्या अत्याधुनिक युगात टेलिग्राम ही सर्वात जुनी आणि उपयुक्त सेवा बंद पडल्यानंतर जुनी मनीऑर्डर सेवाही बंद करण्यात आली आहे. यामुळेच पोस्टमन आपल्या दारात आता कधीच मनीऑर्डर घेऊन येणार नाही.

पूर्वी आपले दूरचे नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठविण्यासाठी मनीऑर्डर हे माध्यम होते, पण तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आणि हातात मोबाईल आले. आता तर या मोबाईलमधून क्षणात जगाच्या पाठीवर कुठेही पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आधी कमी शब्दांत संदेश पाठविणारी टेलिग्राम सेवा बंद पडली आहे आणि त्याची जागा मोबाईल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरील एसएमएसने घेतली तसेच आता मनीऑर्डरची जागा इंटरनेट व मोबाईल बँकिंगने घेतली. याचा फटका या प्राचीन टपाल सेवांना बसला आणि त्या कायमच्याच इतिहासजमा झाल्या.

- Advertisement -

१८८० पासून भारतीय टपाल खाते मनीऑर्डरची सेवा घरोघरी पुरवत होते. देशाच्या कानाकोपर्‍यातील लोकांना मनीऑर्डरच्या माध्यमातून घरबसल्या पैसे पाठविले जात असत, पण ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून पैसे पाठविल्यानंतर क्षणात ते प्राप्त होतात. हे पैसे काढण्यासाठी बँकेतही जाण्याची गरज उरली नाही. घराजवळच असलेल्या एटीएममधून हा पैसा काढता येतो. या ऑनलाईन बँकिंगमुळे मनीऑर्डर सेवा ठप्पच पडली आहे. टपाल खात्याने मनीऑर्डर सेवा बंद करून नवी इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर आणि इन्स्टंट मनीऑर्डर या दोन जलद सेवा सुरू केलेल्या आहेत. यातील इन्स्टंट मनीऑर्डर सेवेत एक हजार रुपयांपासून ५० हजार रुपये पाठविण्याची सुविधा राहणार आहे. इन्स्टंट सेवा असलेल्या टपाल कोषागारातून कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे एक इलेक्ट्रॉनिक फॉर्म भरून पैसे पाठवले जाऊ शकतात, तर इलेक्ट्रॉनिक मनीऑर्डर सेवेतून एक रुपया ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या प्राप्त करता येणार आहे.

२. पूर्वीप्रमाणे घरातून बाहेर जाऊन, बँकेच्या वेळेतच बँकेत जाऊन, रांगेत उभे राहून आणि स्लिप भरून व्यवहार करण्याचा हा सारा त्रासदायक प्रवासाचा जमाना तंत्रज्ञानामुळे इतिहासजमा झाला असून बँकिंग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्याने अधिकाधिक लोकांना विविध प्रकारच्या सेवा देणे बँकांना शक्य झाले आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. नेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे घरात बसून आता आपण बँकेचे व्यवहार करू शकतो. टेक्नॉलॉजीमुळे एटीएम, कोअर बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि आरटीजीएस सेवेमुळे बँकिंग क्षेत्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे.

एम पेसा
मोबाईल तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित पद्धतीने पैसे हस्तांतर करण्याची ‘एम-पेसा’ ही आधुनिक सेवा काही मोबाईल सेवा पुरविणार्‍या कंपन्यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्रात व्होडाफोनची एम-पेसा योजना सुरू झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने पैशांचे हस्तांतरण करू शकणारी एम-पेसा ही वैशिष्ठ्यपूर्ण सेवा व्होडाफोनच्या वतीने येथे सादर करण्यात आली. या योजनेसाठी व्होडाफोन इंडियाने आयसीआयसीआय बँकेशी सहकार्य करार केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर भागीदारीमध्ये रिलायन्स उद्योग, एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस, आदित्य बिर्ला नुवो, वोडाफोन एम पेसा, टेक महिंद्रा आणि पोस्ट विभागाला रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवहार सुरू करण्यास तत्त्वतः परवानगी दिली आहे.

फायदे आणि उपयोग
बँकेच्या सहकार्याने सुरू करण्यात असलेल्या या सेवेमुळे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पैसे पाठविणे, मोबाईल रिचार्ज खरेदी करणे, डीटीएच सेवेचे रिचार्ज अशा निरनिराळ्या मोबाईल पेमेंट सुविधेचा लाभ घेता येतो. ‘एम-पेसा’ ही सेवा बँकिंग सेवा नसलेल्या व बँकिंग सेवा अपुर्‍या असलेल्या लोकसंख्येला मोबाईल फोनमार्फत वित्तीय सेवा उपलब्ध करून देते.
रोजगारासाठी घरातील कमावती व्यक्ती बाहेरगावी राहत असताना आपल्या कुटुंबीयांना घरी पैसे पाठवण्यासाठी ही सेवा अतिशय उत्तम ठरणारी आहे. आर्थिक सर्वसमावेशकता हा देशातील प्राधान्यक्रमाचा विषय आहे आणि तो साध्य करण्यासाठी ‘एम-पेसा’ हे आदर्श साधन आहे. आपण कोणत्याही मोबाईल फोनवर पैसे पाठवू शकता. आपण कोणत्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकता. मोबाईल रिचार्ज, बिले भरा आणि डीटीएच सेवा सदस्यता अदा करू शकता. आपण एकाच स्टोअरमध्ये खरेदी निवडू शकता. एम-पेसा एक अद्वितीय पैसे हस्तांतरण आणि पेमेंट सेवा आहे.

३. विविध बाजारपेठ आणि ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय आल्याने नामांकित ब्रँड्स एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागले आहेत. ऑनलाईन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातली गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते.

मोबाईल कॉमर्स
ऑनलाईन खरेदीने मोठा वेग घेतला आहे. यामध्ये मोबाईल अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे हे मोबाईल कॉमर्स ई-कॉमर्स क्षेत्राला मागे टाकेल असे दिसतेय. मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर जास्त लक्ष केंद्रित करीत आहेत. मोबाईल कॉमर्स बाजारावर पकड मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि क्विकर यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशातील लहान ‘स्टार्ट अप्स’ची खरेदी करताना दिसत आहेत. तसेच मोबाईल तंत्रज्ञानावरही मोठी गुंतवणूक केली जात आहे. कारण येणार्‍या काळात मोबाईल शॉपिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग बनणार आहे. कारण सर्वात जास्त ऑर्डर मोबाईलद्वारे येत आहेत.

मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल फोनच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी अतिशय कमी पैसे मोजावे लागत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येतही मोठी वाढ झालेली आहे आणि यापुढेही होणार आहे.

यापुढे व्हर्चुअल रियालिटी या तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन शॉपिंगची वस्तू वास्तवात कशी असेल हे अनुभवता येणार आहे.

४. पूर्वी लग्नासाठी मुलगी अथवा मुलगा शोधण्याकरिता अनेक अडचणी यायच्या, परंतु आजच्या काळात मॅट्रिमॉनिअल (ऑनलाईन) किंवा ऑर्कुट्/फेसबुकवर फ्रेन्ड्स रिक्वेस्ट टाकून लग्नासाठी जोडीदार शोधताना अनेक मुले-मुली आढळतात. तंत्रज्ञानामुळे आता सध्या आणि यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुला-मुलींना प्रत्यक्षात भेटल्याचा अनुभव मिळणार आहे.

५. सोशल नेटवर्कमुळे संपर्क शक्य
कॉलेज ग्रुप एकत्र नसेल तरी कोण काय करतंय ते कळण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी साधनं आहेत. सोशल मीडियाचा फायदा घेण्यात तरुणाई सर्वात पुढे आहे. या सोशल नेटवर्कमुळे सर्वाना एकमेकांच्या संपर्कात राहणं शक्य असतं, मात्र त्याचा गैरवापर होताना दिसतोय. सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा. जाहिरात करणं, महत्त्वाची माहिती किंवा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो. संपूर्ण जगभरातली महत्त्वाची माहिती, घडामोडी हे सगळं अगदी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे माहिती, बातम्या पोहोचवण्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर होतो. विशेष म्हणजे एका कॉलसाठी जितके पैसे खर्च करावे लागतात, त्यापेक्षा अगदी कमी पैशांत एकमेकांशी जोडल्याचा आनंद यामुळे मिळतो.

६. ऑनलाईन नोकरीच्या ऑफर्स
पूर्वी नोकरी शोधण्याकरिता वर्तमानपत्रांचा वापर केला जात असे. पदवीच्या अंतिम वर्षाची शैक्षणिक परीक्षा संपल्याबरोबरच वर्तमानपत्रातून नोकरी शोधण्याची मोहीम सुरू होत असे. आता या बदलत्या काळात नोकरी शोधण्याच्या पद्धतीत थोडा बदल झाला आहे. वर्तमानपत्रांतून आपल्या शिक्षण आणि अनुभवाला साजेशा नोकर्‍या शोधणे आता इतिहासजमा झाले आहे आणि कॉम्प्युटरवर संकेतस्थळांवर नोकरी शोधण्याचा हा जमाना आहे.

नोकरीच्या जाहिराती आता केवळ ऑनलाईन देण्यावर कंपन्यांचा भर आहे. मोठ्या उद्योग समूहांबरोबरच आता अनेक छोट्या कंपन्यांनीही त्यांची संकेतस्थळे विकसित केली आहेत. मोबाईल अ‍ॅपही मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाईन जॉब उपलब्ध करून देण्यार्‍या कंपन्यांमध्ये आणि त्याचा लाभ घेणार्‍या तरुण वर्गाच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळते.

कंपन्या ऑनलाईन अर्ज घेऊन विशिष्ट जागेसाठी उमेदवारांची छाननी करतात. ऑनलाईन पद्धतीने नोकरीविषयी अर्ज करणे आणि स्वीकारणे यात कंपन्या आणि अर्जदार या दोघांचाही वेळ वाचतो.
ऑनलाईन नोकरी शोधण्याचे खाली नमूद अनेक फायदे आहेत.

* दररोज हजारो नोकर्‍यांच्या नवीन जाहिराती असतात.
* शिक्षण, आवड आणि अपेक्षेनुसार गटवारी केलेली असते.
* उमेदवारांना नोकरी सांभाळून इतर ठिकाणी अर्ज करता येतो व निवड चाचणीच्या प्रक्रियेला सामोरे जाताना वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते.
आता तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या पद्धतीचा अनेक कंपन्या अवलंब करीत आहेत.

७. ऑनलाईन बिल भरणे
पूर्वी आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीचे बिल भरण्याकरिता घरातून बाहेर जाऊन त्या विशिष्ट ऑफिसच्या वेळेतच रांगेत उभे राहून आणि स्लिप भरून बिल भरावे लागे, पण हा सारा त्रासदायक प्रवासाचा जमाना तंत्रज्ञानामुळे इतिहासजमा झाला असून घरातील सर्व गोष्टींची बिले उदा. वीज बिल, डिश कनेक्शनचे बिल, मोबाईल बिल, फोन बिल,
महानगरपालिका व नगरपालिका यांचा टॅक्स इत्यादी इंटरनेटवरून ऑनलाईन भरता येते. यामध्ये आपल्या वेळेची बचत होते.

–प्रा. योगेश हांडगे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -