घरफिचर्ससारांशनदी...जीवनदायी जननी!

नदी…जीवनदायी जननी!

Subscribe

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय सध्या लौकिकार्थाने चर्चेत आहेत. कायदे, नियम आणि अभिनव योजनांबरोबर त्यांनी नदी संवर्धनाच्या कार्यात कृतीशील सहभाग घेतलाय. त्यासाठी ते चक्क नाशिकच्या गोदावरी नदीवर दररोज पहाटे जाऊन स्नान करतात. ही घटना तशी पोलिसांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ म्हणावी लागेल. एखादा आयपीएस अधिकारी नदीपात्रात स्नान करतो ही बाब सरळसोटपणे धार्मिकतेशी जोडली जाऊ शकते. त्यातच जर तो मूळचा उत्तर भारतातील रहिवासी असले तर धार्मिकतेशिवाय अन्य पर्यायांचा विचारही केला जाणार नाही. पण पाण्डेय यांचे नदीस्नान वेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनांना उजाळा देते. हे दृष्टिकोन नक्की काय आहेत, ते आजच्या ‘जागतिक नदी दिना’च्या निमित्ताने सांगताहेत स्वत: दीपक पाण्डेय!

नदी.. मानवाचे जीवन प्रवाहित करणारी.. जीवसृष्टीला जीवन देणारी.. आध्यात्मिक समाधानाबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ प्राप्त करुन देणारी नदी. नदी म्हणजे केवळ खळखळत वाहणारे पाणी नव्हे. नदी म्हणजे केवळ पाण्याचा स्त्रोत नव्हे. तर नदी म्हणजे संपूर्ण जीवन.. नदी म्हणजे समृद्धी.. भारताच्या संविधाना अंंतर्गत राज्य व केंद्र शासनाने नदीच्या संवर्धनाबाबत दिशानिर्देश निश्चित केलेले आहेत. त्यादृष्टीने शासनाने धोरणही जाहीर केले आहे. नद्यांसाठी प्राधिकरणांची निर्मिती झालेली आहे. तिच्याशी संबंधित वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. नदीतील पाण्यासाठी जलसंधारण विभाग आहे. माती व वाळूसाठी महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण नियंत्रण बोर्ड, सांडपाणी आणि मलनि:सारणाच्या नियोजनासाठी महापालिका, औद्योगिक सांडपाण्यासाठी एमआयडीसी कार्यरत आहे. या विभागांच्या मदतीने नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरुच आहेत.

मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार नदी संवर्धनाचे अधिकार पोलीस आयुक्तांना आहे. या अधिकारांचा वापर करुन मी माझ्या कार्यक्षेत्रातील नद्यांच्या संवर्धनासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहे. माझा मुळ मुद्दा असा आहे की, नदी संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची आहे का? नदीप्रती आपले काहीच कर्तव्य नाही का? खरे तर, मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नदीच्या काठी झाला. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे. जगभरात प्रमुख सर्व शहरे नदीच्या काठी वसल्याची व विकास पावल्याचे आढळून येते. आदिम काळापासून माणूस नदीची पूजा करीत आला आहे. आजही काही समुदायांमध्ये नदी, झरे यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. मानवाच्या विकासात नदी ही अपरिहार्य बाब होती आणि आजही आहे. मात्र, आज नळाने पाणीपुरवठा होणार्‍या आपल्या या समाजाला नद्यांचे महत्व वाटेनासे झाले आहे. खरे तर, प्रत्येक नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिकमधील गोदावरीला गोदाई, गोदामाई म्हणतात. तर उत्तर भारतात गंगेला गंगामैया म्हणतात. आपण नदीला आई का म्हणतो याचा विचार केला आहे का? आई ही जीवन देणारी असते. आईमुळेच आपण हे जग बघू शकतो. ती आपले पालनपोषन कायमस्वरुपी करते. आईचे हेच साधर्म्य नदीत आहे. नदीच्या सानिध्यात येणार्‍यांचे आयुष्य इतरांच्या तुलनेने सुखमय असते. आपण नदीपात्रात अंघोळ करतो म्हणजे स्वत:ला सपूर्द करतो. त्यातून नदी आपले आरोग्य संवर्धन करते. मानसिक मनोबल वाढवते. बौध्दिकदृष्ठ्याही परिपक्व करते. आई जसे तिच्या बाळाचे प्रश्न कुणाला काहीही न सांगता मिटवत असते, तसेच नदीही करते. म्हणून या नदीला आई म्हटले जाते. जीवन देणारी, प्राण देणारी, काळजी घेणारी, पाठराखण करणारी, ती आई म्हणजे नदी. हाच दृष्टिकोन समोर ठेऊन मी नदी स्नानाला दहा महिन्यांपूर्वी प्रारंभ केला.

अर्थात त्यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. कर्मकांडही नाही. त्यामागे केवळ आणि केवळ आहे तो वैज्ञानकि दृष्टिकोन. आधुनिकीकरण आणि शहरीकरणाने पाईप्स आणि नळांना जन्म दिला. त्यातून येणारे पाणी तसे दुय्यम दर्जाचे असते. त्यात पंचमहाभूतांचा लवलेशही नसतो. पंचमहाभूत ही धार्मिक संकल्पना नाही हेदेखील जाणून घ्यावे. सूर्यमंडलातील कोणतीही वस्तू आणि मानवीय शरीर हे पाच मूल तत्वांचे बनलेले आहे. त्यात पृथ्वी (माती किंवा जमीन), आप (पाणी), तेज (अग्नी, ऊर्जा), वायू (हवा, वारा) आणि आकाश यांचा समावेश असतो. या पंचमहाभूतांची शक्ती तुम्हाला नळातून येणार्‍या पाण्यात अगदी त्रोटक प्रमाणात मिळते. नदीच्या पाण्यात मात्र पंचमहाभूतांचा वास असतो. निसर्गाचे मित्र तिच्या सोबत राहतात. म्हणूनच स्वच्छ नदीपात्रात किंवा स्वच्छ तलावात अंघोळ करणे हे आरोग्यदायी ठरते.

- Advertisement -

पूर्वीची सिंधू किंवा मगध संस्कृती ही नदीकिनारी वसलेली संस्कृती होती. त्यातूनच समृद्धीने जन्म घेतला. नदीत अंघोळ करण्यामागे शरीर स्वच्छ करणे हा एकमेव हेतू अजिबातच नसावा. किंबहुना, शरीराची स्वच्छता हा दुय्यम भाग मानायला हवा. नदीपात्रात स्नान केल्याने शरीरात जी अतिरिक्त ऊर्जा साठलेली असते ती पात्रात विसर्जीत केली जाते. थोडक्यात ऊर्जेची देवाणघेवाण नदीपात्रात होते. अंघोळ केल्याने नदी कधीही अस्वच्छ होत नाही. अनादी काळापासून मानव समाज नदीपात्रात अंघोळ करीत आला आहे. त्यातून त्याचे जीवन अधिक समृद्ध होत गेले आहे. वैज्ञानिकदृष्ठ्या विचार केला तर जल, वायू आणि सूर्य हे डॉक्टरांचे काम करत असतात.

नदी स्नानातून प्रथमत: आपली भेट डॉ. जल आणि त्यानंतर डॉ. वायू आणि डॉ. सूर्याशी होते. ते आपले जीवन आरोग्यदायी करतात. थोडक्यात काय तर एकाच वेळी आपल्याला तीन स्पेशालिस्ट डॉक्टरांची चिकित्सा मिळते. आरोग्यदायी होण्याच्या दिशेने ही मोठी वाटचाल असते. मी स्वत: याची अनुभूती घेतली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून मी नदीत अंघोळ करतोय. नदीपात्रातील दगड-गोटे हे तळपायांसाठी अ‍ॅक्युप्रेशरचे काम करतात. त्यातून नवी ऊर्जा अनुभवयाला मिळते. नदीमार्गातील दगड गोटे, खडक यांची झीज होऊन माती तयार होत असते. वाहत्या पाण्यात मृत वनस्पती, प्राण्यांचे अवशेष असे जैविक तसेच खनिजे, ऑक्सिजन असे अजैविक घटक मिळतात. या घटकामुळे नदीपरिसरातील माती सुपीक बनत असते. दगड गोटे व खडकापासून बनलेली माती नदी सपाट प्रदेशात आणून सोडते. नदी जेव्हा वाहत असते तेव्हा पाणी स्वच्छ व पिण्यासाठी आरोग्यदायी ठरेल अशी क्रिया करीत असते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण यातून वाढत असते.

वेगवेगळ्या आकाराचे दगड गोटे, जाड, मध्यम व बारीक आकाराची वाळू यातून नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि वाहत्या राहिल्या तर नदीचे आरोग्य, पाण्याचे आरोग्य टिकून राहते. यातून नदी परिसरातील माणसाचे, इतर सजीव सृष्टीचे आरोग्य चांगले राहते. वाहती नदी जेव्हा वेगवेगळ्या पाणथळी जागेला मिळते तेव्हा त्यामधील मासे, खेकडे इतर जलचर यांना पोषक अन्नद्रव्य त्यामध्ये येत असतात. समुद्रातील मासे आणि इतर जलचरांसाठीही महत्वाचे अन्नद्रव्य नदीच घेऊन येत असते. पाण्याचे पावसापासून समुद्रापर्यंतचे जलचक्र नदीमार्फतच पूर्ण होते. नदीस्नानावेळी जलचरांशी आपल्याला मैत्री करावी लागते. त्यापूर्वी ज्यांना नदी पात्राची पूर्णत: ओळख आहे, त्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. नदी स्नानाची सवय नसेल तर सुरुवातीचे काही दिवस अडचणीचे वाटू शकतात. पण दहा-बारा दिवसात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नदीकडूनच मिळतात आणि त्यानंतर आपले आणि नदीचे नाते अतुट बनत जाते.

लहानपणी माझे वडील मला छत्रपतींची गोष्ट सांगायचे. छत्रपती आई भवानीची पूजा करायचे. तिच्या हातात असलेली तलवार आई भवानी आपल्याला देत नाही तोपर्यंत आपण लढाईला जाणार नाही असा निश्चय छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. तेव्हा मला ही दंतकथा वाटायची. पण गोदामाईला अनुभवल्यानंतर छत्रपती आणि आई भवानी यांच्यातील नाते मी समजू शकलो. त्यामागील भावार्थ मला उमगला. माझ्या वडिलांचे वय आज 90 इतके आहे. ते गेल्या 50 ते 60 वर्षांपासून उत्तर भारतातील गंगा नदीत स्नान करतात. त्यामुळेच त्यांना आजवर कोणतीही व्याधी नाही. आजही ते नदीत चांगल्या रितीने पोहतात. त्यांनीच माझ्यात नदी स्नानाची गोडी निर्माण केली. सुदैवाने प्रथमच मला गोदावरी नदीच्या गावात पोस्टिंग मिळाली. या संधीचा फायदा मी नदी स्नानाच्या माध्यमातून घेत आहे. खरे तर गोदावरी नदी जीवनदायी आहे. ती गंगा नदीची बहीण आहे. हिमालयाच्या आधीपासून ती वाहते. किमान दहा लाख वर्षांपासून अधिक काळ ती वाहत आहे. गोदावरीत स्नान करण्यापूर्वी सुरुवातीला मला संकोच वाटत होता. मी इतक्या मोठ्या पदावर असल्यामुळे माझ्यावर मनोसामाजिक दबाव हा होताच. पण मी नदीशी मोकळेपणाने संवाद साधला.

गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असलेला मी अवघ्या दहा-बारा दिवसात नदीच्या पाण्याशी एकरुप झालो. नदीस्नानाने मला शारीरिक आणि मानसिक स्वाथ्य लाभले. उत्तमात उत्तम निर्णय घेण्याचे बळ मिळाले. अतिशयोक्ती नाही, परंतु कोणताही निर्णय घेताना मी नदीकिनारी जाऊन नदीसमोर व्यक्त होतो. इतकेच नाही तर कधी दु:खी असलो तरी आपली व्यथा नदीकडे मांडतो. लोकांना हा वेडेपणा वाटू शकतो. पण नदी आणि आपल्यातील नातं दृढ करण्याची ही प्रक्रिया आहे. खरे तर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी ही अतिशय खडतर आहे. खूप टेंशनचे काम आहे. अनेक वेळा तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण मी हे अवघड आव्हान लिलया पेलवू शकलो ते केवळ गोदास्नानामुळे. लोकांना चांगली सेवा देण्याचे मनोबल नदीमुळेच वाढले आहे. नदीस्नानामुळे मला काम करताना कधीही थकवा जाणवत नाही.

यापुढील काळात माझ्यासारखे असंख्य अधिकारी नदीत स्नान करतील. त्यात नवलाई काही नाही. पण नदीने माझ्यासारख्या पोलीस आयुक्ताच्या जीवनात जो बदल केला आहे तो मी कधीही विसरु शकत नाही. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर नदी संवर्धनाच्या चळवळींमध्ये सक्रिय भाग घेण्याचे मी ठरवले आहे. आपणही असंच काही ठरवा. भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आर्टिकल 51-ए मध्ये दिले आहे. त्यात नदी संवर्धनाचे कर्तव्य प्रत्येकाचेच असल्याचे म्हटले आहेे. संवर्धनाच्या फार मोठमोठ्या गप्पा मारण्यापेक्षा नदीपात्रात स्नान करण्याची सवय करा. तुम्ही स्नान कराल तेव्हा तुमच्या प्रदूषण आणि तत्सम बाबींविषयी तक्रारी वाढतील. तुम्ही तक्रारी कराल तेव्हा त्यांची सोडवणूक होईल. थोडक्यात तुमच्या स्नानाने नदीपात्र हे स्वच्छ होईल. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाने नदीपात्रात स्नान करावे. हीच आपली संस्कृती आहे.

–दीपक पाण्डेय

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -