घरफिचर्ससारांशआनंदाची शाळा...

आनंदाची शाळा…

Subscribe

जवळपास 20 वर्षांपूर्वी आनंद गायकवाड आणि मी गावाकडच्या कॉलेजात बीएला शिकत होतो. आनंदाने ए ग्रेड मिळवत बी ए केलं.  आणि मी नोकरीच्या शोधात शहरात आलो. एका खासगी कंपनीत ट्रेनी बिझनेस कौन्सिलर म्हणून रुजू झालो.  पण आनंदने एम ए साठी छत्रपती शिवाजी विद्यापीठातून दूरस्थ अभ्यासक्रमात मराठीसाठी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बेताची होतीच. आई वडील ऊसतोडणी कामगार त्यातही बेभरवशाच्या शेतीमुळे आनंदा उस्मानाबादहुन कापूस दाबायला माता पित्यांसोबत औरंगाबाद, नगरकडे नातेवाईक आणि भावकीसोबत निघाला.  तर कामगार आईवडील  उसतोडणीसाठी सातारा सांगलीत दाखल झाले. दिवस एम ए करत असताना आनंदसमोर तीन पर्याय होते. पहिला होता शेतीचा, घरातली अर्धा एकर शेती भावकीतून वाट्याला आलेली. त्यात कोरडवाहू असल्याने पोटापुरतं पेरावं आणि घरीच एम ए चा अभ्यास करावा. पुढं यथावकाश नेट सेट देऊन प्राध्यापक बनण्याचं स्वप्न आनंदा पाहत होता. आठ वर्षे कठोर मेहनत केली.

कमालीचा कमी निकाल लागणाऱ्या नेट परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. पण तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातही खास करून मराठी विषयाच्या महाविद्यालयात जागा निघत नव्हत्या. ज्या जागा होत्या किंवा ज्या ठिकाणी त्याचा विषय शिकवलं जात होता. ती महाविद्यालये प्रामुख्याने पुण्या मुंबईतच होती. इथंही अनेक शाळा महाविद्यालयात पुढच्या तीन वर्षात जागा निघतील तेव्हा बघू असं आश्वासनचं त्याला मिळत होत. या दरम्यान बी एड साठी नंबर लागला.

- Advertisement -

एम ए ची डिग्री हाती होतीच. बी एड केल्यावर एम ए बी एड अशा मजबूत अर्हतेने जिल्हा परिषद, अनुदानित संस्थेत नोकरीचं स्वप्न पूर्ण होईल असा त्याला विश्वास होता. झालं लगोलग शेतीत पेरायला घेतलेल्या उसनवरीतून बी एड साठी मराठवाड्यातल्या शिक्षक घडवणाऱ्या संस्थेत कसाबसा नंबर लागला. अभ्यास करून प्रसंगी पोटाला पीळ देऊन बी एड पूर्ण केलं. 60 किमीवरच्या तालुक्याच्या साहेबराव जाधव शिक्षण संस्थेत प्राथमिक शाळा मास्तरांची मराठी विषयाची जागा रिकामी असल्याचं समजल्यावर स्वारी तिथं निघाली. शाळेच्या हेड सरानी आस्थेने विचारपूस केली आणि म्हणाले.

आनंदराव, शिक्षण तर तुमचं गरजेपेक्षा जास्त आहेच. पण कसं है ना…संस्थेला अजून पूर्ण अनुदान मंजूर झालेलं नाही..त्यासाठी वरच्या विभागात प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत महिना अडीच हजारावर काम करायला तयार असाल तर मी संस्था चालकांकडे शब्द टाकतो, तोपर्यंत करायला काही हरकत नाही. बघा विचार करा, फक्त पाच वर्षांचा प्रश्न आहे. अडीच हजार लैच कमी सर, नेट पास झालोय. आता पुन्हा पाच वर्षे…आनंदाने साभार नकार दिला. शाळेच्या अर्धवट बनवलेल्या गेट मधून बाहेर पडताना हेड सर, म्हणाले, शासनाने काही जुन्या संस्थांचीच अनुदाने कमी किंवा बंद केलीत. आनंदराव नव्या शाळांना मंजुरी नाही.

- Advertisement -

शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्नीही आहेच. वर्षाला राज्यात 50 हजार शिक्षक तयार होतात आणि संस्था कितीशा तर प्रत्येक तालुक्यात मुश्किलीने एखादी, विचार करा, आनंदानं मागे वळून नकळत मान हलवली आणि एस टी स्टँडला निघाला. ईष्टीत खिडकीतून सूर्य मावळतीला झुकत असताना आनंदाची नजर शून्यात गेली, वाटलं, अडीच हजारात बनावं मास्तर की अजून वाट पाहावी अनुदानिताकडून बोलावनं येईल, राज्यातल्या चार जिलह्यात शाळा कॉलेज चालवणारे माणिकराव जाधव साहेब मोठी आसामी, मुंबईतल्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांत कायम उठबस…तिथं जाऊन भेटावं, ठरलं तर मग उद्याच पहाट नागोबावरून पहिली बस पकडून जावच…मनांत ठरत असताना आनंदा घरी आला.

जवळही सर्टिफिकेटची मेनकापड पिशवी दिवाळीत सरकली, दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या जिल्हा तालुक्यात, गावात अशा फेऱ्या सुरू, अखेर एक दिवस बरीच वाट पाहिल्यावर संस्थाचालक माणिकरावांची भेट झाली. साहेब झेड पी ची मिटिंग आटपून पुण्याकडे निघालं होतं, कुठलं तुम्ही…माणिकरवाचा मराठवाडी हेल… सुरडी धाराशिव जवळ गाव. आईवडील, आई घरीच है..बाबा सातारला गेलेत.

ऊस तोडायला. तुम्ही नै गेलात का…समोरच्या टेबलवरचा मोटारपानपुडा खोलत सुपारी कातरत माणिकरावाचं भेसूर हसणं..तसं न्हाई..म्हंजी ऊस तोडायला जेवढे पैशे मजुराला चारदिवसात रोजानं मिळतात तेव्हढा पगार बी नसतोय प्राथमिकच्या शाळा मास्तरला…काय, पण साहेब मी नेट पास केलंय आणि एम ए बि एड झालंय फस्ट क्लास…कोन विचारतय राव किती बुकं शिकलात त्यायला… हे बघा आधी मुंबईतलं शैक्षणिक अनुदान देणारं डिपार्टमेंट, मग संस्थानचे संचालक मंडळ, त्याऊन फुडं हिकडचे असिम्बलीतले नेते, त्याउपर शाळेची इमारत चढवणारं पैका मोजणारं आमिर उमरावांच्या लेकरांना नोकऱ्या मिळनात, त्यांच्या वाटण्या झाल्यावर मग उरलं तर तुमचा विचार होईल.. तो पर्यंत कराकी अणासाहेबांच्या संस्थेत.

काय हरकत है…नाय तर जावं औरंगाबादला कापूस दाबायला फॅक्टरीत…आता आनंदासमोर एकमेव पर्याय होता अडीच हजारात शाळामास्तार होण्याचा..आनंदाने नाईलाजाने पर्याय स्वीकारला. आज 10 वर्षांनी तो तालुक्याच्या शाळेत प्राथमिक शाळा मास्तर झालाय.

उसाच्या शेतात बाप साप चावून मेल्याला आठ वर्षे झाली. आई पार थकून गेलीय, नाय म्हणायला  आनंदाला आता चार हजार पगार मिळतोय. पण मराठी पोरं इंग्रजीच्या नादाला लागून मराठी शाळेत फिरकना झाल्याती. शाळा ओस पडू लागल्यात. त्यामुळे शाळावर्ग शिक्षक आणि त्याचा पगारही आटत चाललाय, अनुदानाची मंजुरी 20 वर्षे झाली रखडलीय, आता कायमस्वरूपी विनाअनुदानित म्हणून काम करावं ठरतंय, आता सगळ्या  पंचक्रोशीत आनंदाला प्राध्यापक आनंद गायकवाड म्हणून ओळखलं जातं.

यथावकाश त्यानं पीएचडी पण पदरात पाडून घेतली, गावी गेल्यावर आनंदा घाटसावळीचा एसटी पाटीवर भेटला…म्हटलं कसं चाललंय, तर म्हणाला विद्यार्थी बागायती शेतकाऱ्याची पोरं पोत्यांनं वर्षभराची. जवारी टाकत्यात घरात, दोनचार शिकवन्या घेतो…चाललंय बरं, आनंदाने अजून लग्न केलेलं नाही, बिनपगारी मास्तराला मुलगी कुणी द्यावी, आणि मी तरी का आणावी…असं काहीतरी तंबाखूचा बार तोंडात भारत बोलून गेला स्टँडवरल्या टपरीवर च्या घेऊ म्हटलं तर आनंदा म्हणला शाळेचं ठोकं पडलीत..तिकडं लेकरं वाट पाहत असतील बोलून बांधावरून शाळेकडे निघाला… शाळेची घंटा हळू हळू निवत असताना मुंबईला जाणारी एसटी फाट्यावर आली…त्या बसच्या धुराळ्यात आनंदा दूरवर दिसेनासा झाला आणि मी मुंबईकडे यायला बस पकडली, मोबाईलमध्ये ऑफीसचा मेल चेक करत असताना एक आरचा मेसेज दिसला सॅलरी इन्क्रीमेंट आणि वेळेआधी बिझनेस टार्गेट कॅम्पलीट केल्याने इनसेन्टीव्ह मिळाल्याचा, शाळेच्या घंटेचा नाद…हळू हळू क्षीण होत ऐकेनासा झाला…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -