घरफिचर्ससारांशगर्दीतल्या एकांताची भूमिती

गर्दीतल्या एकांताची भूमिती

Subscribe

साहित्याच्या सर्व प्रांतांत मुलुखगिरी करणारे प्रसिद्ध लेखक म्हणून आपल्याला ज्ञात असलेले श्री. महावीर जोंधळे यांचे नवे पुस्तक ‘एकांताची भूमिती’ या नावाचे आहे. ललित-गद्य असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. पुस्तकात एकूण 17 लेख आहेत आणि प्रस्तावना श्री. दिलीप चव्हाण यांची ‘गर्दीतल्या सृजनसोहळ्याचे एकांतशास्त्र’ या नावाची आहे. हे लेख कधी चिंतन, कधी त्याचे अस्वस्थपण, पडलेली कोडी, एखाद्या प्रसंगानंतर मनात आलेले विचार, कधी एखाद्या कथेसारखे (तिळमात्र, भयचिंब होण्याची गोष्ट, सोटमूळ) वाटणारे, तर खडावा, निःशंक, भयचिंब होण्याची गोष्ट, हे लेखन तर वेगळेच आणि किंचित गूढ वाटावे आणि चिं. त्र्यं. खानोलकरांची आठवण व्हावी असे आहेत.

‘पियूच्या डोळ्यातील पाणी’, या लेखाला कारुण्याची झालर आहे. बायकोला वाढदिवसाचे सरप्राइज देण्याचा लेखकाचा बेत कसा पुरता फसतो हे सांगणारा ‘डूब’ हा लेख विनोदी अंगाने जाणारा आहे, तर देव देखणा गाभारी, एकांताची भूमिती आणि बाकी लेख हे चिंतनपर किंवा मनात उठलेल्या विचारांच्या वावटळीला शब्दरूपात पकडण्याचा प्रयत्न करणारे आहेत. म्हणूनच ते कोणत्याही प्रकारात टाकता येण्यासारखे नाहीत, तरीही वाचनीय, खिळवून ठेवणारे आणि अस्वस्थ करणारे आहेत. त्यांची दखल श्री. चव्हाण यांनी प्रस्तावनेमध्ये घेतली आहे.

लेखक हा कवीदेखील आहे, हे आपल्याला माहीत आहे. कदाचित त्यामुळेच अनेकदा त्याची लेखणी काव्यात्मकच लिहिते आणि ते सारे सहज आणि चित्रदर्शी असते. ते सहज आणि उत्स्फूर्त असल्याने, कृत्रिम वा ओढून ताणून आणल्याप्रमाणे वाटत नाही. काही गोष्टींचे वर्णन करताना ते लेखक अगदी तपशीलवार करतो आणि तरीही ते कंटाळवाणे वाटत नाही, हे त्याचे यशच म्हणावे लागेल. भोवती जे काही घडते ते बारकाईने पाहायला आणि त्यातील नाट्य दिसायला जी वेगळी दृष्टी लागते, ती या लेखकाकडे आहे, आणि त्याबरोबरच थेट नेणिवेत जाऊन बसलेले हे विविधांगी पण अस्पष्ट धूसर अनुभव शब्दांत मांडायला जी टोकदार भाषा वापरायला लागते तीदेखील त्याच्याकडे आहे, हे आपल्याला जाणवत राहते.

- Advertisement -

पाऊस या विषयावरच ‘चैतन्यस्रोत’ हा लेख असून पावसाची बहुविध रूपे त्यात आहेत. तो म्हणतोः कधी मुसळधार, कधी कधी पातळपातळ, रुद्ररूपी धनदांडगा. धसमुसळ्या. थरीही तो वाटतो अपत्यवत. अनवाणी पायाला सुखद स्पर्श देणारा. पर्वतीच्या पायरीवर बसून नवलाई अनुभवावी तसा. घरात घुसून दांडगाई करणारा पाऊस नकोसा होत नाही कधी. म्हणून तो म्हणतोः

पाऊस सोसायचा असतो,
पाऊस भोगायचा असतो
मातीच्या कणाकणात
हळूहळू सोसायचा असतो.

- Advertisement -

याबरोबरच पानांची सळसळ ही त्याला उद्याच्या हिरव्या गाण्यांची, शुचिर्भूत होणार्‍या मनाची, रंगांची मस्ती वाटते. निसर्ग कुंचल्याची ही अनुभूती नवनिर्मितीचीच असते, असेही तो सांगतो.

प्रस्तावनेत श्री. चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे, एकाकीपणा आणि एकांत यातला गुणात्मक फरक या लेखांतून ठसठशीतपणे समोर येतो. नात्यांची रया गेल्याने येणारे अघोरी एकाकीपण आणि कलावंत आणि त्याच्या सर्जनशील कल्पकतेचा समागम घडवून आणणारा एकांत हे दोन वेगळे ध्रुव आहेत. जोंधळे हे एकांताचे कैवारी आहेत. कारण निसर्गाचे कळशास्त्र याच एकांतात उमगते. ते एकांताला चिंतनशील व्यवहार करण्याची अगम्य जागा मानतात. अध्यात्माच्या अंगणातला एकांत हा एकसुरी असल्याचे त्यांचे निदान असल्याने गर्दीतही त्यांना एकांत अनुभवता येतो आणि तीच त्यांना त्यांच्या नवनिर्मितीची जन्मभूमी वाटते. म्हणून लेखक म्हणतो, ज्यांना एकांताची भूमी कळली, त्यांना एकांताची भूमिती कळते आणि तेच विचार गतीवर ताबा ठेवू शकतात. अपायकारक आणि उपायकारक यांची ओळख घट्ट व्हावी लागते त्यासाठीच. ती झाली की एकांत अधिकाधिक प्रिय होत जातो. एकांताचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो.

म्हणून वाटत राहातं
एकांतातून मिळते ऊर्जा
वाट संधी-प्रकाशाची
ज्याच्या त्याच्या पायाखाली.

आणि त्यातूनच गर्दीतल्या सृजनसोहळ्याचे एकांतशास्त्र आकार घेऊ पाहते, ही गोष्ट विलक्षण वाटते असेही श्री. चव्हाण त्यामुळेच म्हणतात. पुस्तक वाचत पुढे जाताना त्यांचे हे म्हणणे प्रत्ययाला येते.

‘भिंतीवर टांगलेल्या सावल्या’, या लेखात जोंधळे अखेरीस म्हणतातः तोच समुद्र, तीच झाडं. तीच पानं-फुलं. त्याच मासे विकायला बसलेल्या कोळणी. त्यांचं आंबट-चिंबट बोलणं. न कळणारं. दृश्य तेच पण करकरीत. निळेभोर. वेगळा रंगपट आणि वेगळे रंगपटल. खेळही वेगळा. पण ज्याचा त्याचा. डोळ्यात पेटलेल्या ज्योतीसारखा. मनाचा तळ हातावर घेऊन गिरकी घ्यावी असं वाटतंही काही काळ. पण तसं करणे जमत नाही, अजून कुणालाही. हे एक कोरडं समाधान. तेच एक सत्य. वार्‍यावर उडणार्‍या पाल्यापाचोळ्यासारखं. काळे झाले मन, अवतरे प्रकाश, किरणांचा बाज, ज्याचा त्याचा.

‘आभाळ ढवळी वारा’, या लेखात तो वेगळं काही तरी करून बघण्याचा मनसुबा घेऊन नदीकिनारी येतो. लहानपणीचे खेळ त्याला आठवतात आणि तो म्हणतो विश्वाची ओळख पटल्यावरही हे मृगजळी खेळ खेळायचे कशासाठी? आणि मग त्याला प्रश्न पडतो. खेळ म्हणजे नेमके काय? विरंगुळा की मनोरंजन? आत्मसमाधान की काहीतरी विसरण्यासाठी काहीतरी करणं. खेळाला वय असतं आणि खेळणार्‍यांनासुद्धा. यश आलं तर श्रेय आपलं. अपयश आलं तर नियतीचा खांदा असतो, तुमच्या अपयशाचं ओझं पेलायला. आणि मग सोमनाथ प्रभू आणि शेवंता यांची कहाणी सांगतो. ती प्रत्यक्ष वाचायला हवी.

शेवटी पुन्हा श्री. चव्हाण यांचेच शब्द देतो. या तीळमात्र या लेखातील देशमुखांच्या मुलीच्या, तुला घोड्यांचा इतिहास छान जमला आहे. खंत एकाच गोष्टीची वाटते, घोड्याला सांभाळणार्‍यांची नावे कुठे आली नाहीत. का? या प्रश्नाचा दाखला देऊन ते म्हणतात ः हा प्रश्न ललित-गद्याचा प्रखर बौद्धिकतेचा लखलखीत वारसा स्पष्ट करतो. यातील तत्वचिंतन उपरे नाही, तर अंगभूत बांधिलकीतून आपसूकच उमललेले आहे. म्हणून त्यात चराचरांविषयीची करुणा आणि समग्र मानवी जीवन कवेत घेऊन त्यातल्या व्यथावेदनांचा, सुखदुःखाचा शास्त्रार्थ करू शकणार्‍या प्रज्ञेचा अनोखा संगम आहे.

यामुळेच पुस्तक वाचून संपवल्यावर ते अरे मानसा मानसा, कध व्हशील मानूस? असा परखड सवाल विचारणार्‍या बहिणाबाई चौधरी या द्रष्ठ्या माऊलीस अर्पण केले आहे, ते किती यथार्थ आहे, हे आपल्याला उमगते.

-आ. श्री. केतकर
एकांताची भूमिती
लेखक : महावीर जोंधळे
प्रकाशक : नूतन मनोहर वाघ, आर्ष पब्लिकेशन्स, कोथरुड, पुणे 411 038
पाने : 108, किंमत : 125/- रुपये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -