घरफिचर्ससारांशमुकेशदांच्या गाण्यांच्या आठवणींच्या निमित्ताने...

मुकेशदांच्या गाण्यांच्या आठवणींच्या निमित्ताने…

Subscribe

मुकेशदांचा आवाज म्हणजे पंचामृतासारखा सात्विक. अगदी निर्मळ. मुकेशदा जाऊन आज चार दशकं झाली तरी मुकेशदांचा आवाज जागता ठेवणारा एक वर्ग अजूनही आपल्या अवतीभोवती आहे. हा वर्ग आजही मुकेशची गाणी जीवाचे कान करून ऐकतो. कराओकेवर मुकेशदांची गाणी गातो. मुकेशदांच्या आणि त्यांच्या गाण्यांच्या आठवणी काढतो. मुकेशदा होते तेव्हा तर त्यांच्या गाण्याचा चाहतावर्ग अफाट होता.

कोणे एके काळी मुकेशदांच्या चाहत्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे एक नाव होतं. मला आठवतंय, तेव्हाच्या एका साप्ताहिकात मुकेशदांच्या गाण्याचा खास उल्लेख त्यांनी केला होता. ते गाणं होतं, ‘चांद सी मेहबुबा हो मेरी कब ऐसा मै ने सोचा था, हां तुम बिलकूल वैसी हो, जैसा मै ने सोचा था.’ हे गाणं त्यांच्या खास आवडीचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं. ह्या त्यांच्या आवडीतून मुकेश नावाच्या गायकावर असलेलं त्यांचं प्रेम दिसून आलं होतं.

सुनील गावसकरांच्या तेव्हाच्या त्या भारतीय क्रिकेट संघात मुकेशदांचा आणखी एक कट्टर चाहता होता. हा चाहता मैदानाबाहेर तर मुकेशदांच्या गाण्यांवर जीव टाकायचाच, पण क्रिकेटच्या मैदानावरच्या सीमारेषेवर उभं असतानाही सामन्यातल्या एखाद्या रटाळ वेळी मुकेशदांचंच गाणं गुणगुणायचा. आजच्या काळासारखं क्रिकेट तेव्हा फास्ट नव्हतं. क्रिकेटचा चेंडू तेव्हा आततायीपणे, घिसाडघाईने न खेळता तोलून-मापून खेळला जायचा. त्याचाच परिणाम म्हणून सामन्यात एखाद्या वेळी चेंडू एखाद्या ठिकाणी तासन्तास फिरकायचा नाही. अशा वेळी ह्या क्रिकेटपटूच्या ओठावर गाणं यायचं ते मुकेशदांचंच…हा क्रिकेटपटू होता भारताचा फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर.

- Advertisement -

व्हायचं काय की सुनील गावसकरांना मुकेशची गाणी आवडतात हे चंद्रशेखरना माहीत असल्यामुळे मैदानावर कुठूनही जर मुकेशदांच्या गाण्याचे सूर कानावर आले तर चंद्रशेखर सुनील गावसकरांचं लक्ष त्या गाण्याकडे वेधून घ्यायचे. खरंतर सुनील गावसकर हा खेळाडू अर्जुनाचं जसं पोपटाच्या डोळ्यावर लक्ष असावं तसं संपूर्ण लक्ष खेळावर एकवटून खेळणारा खेळाडू. ह्या खेळाडूची पराकोटीची एकाग्रता ही तशी जगप्रसिध्दच. पण तरीही तशाच एखाद्या क्षणी चंद्रशेखर मात्र मुकेशदांच्या गाण्याकडे त्यांचं लक्ष वेधून घ्यायचे. ह्या ठिकाणी एका गोष्टीचा खुलासा आवर्जुन करावा लागेल की तो काळ रेडियोचा होता, संध्याकाळी सुरू होणार्‍या दूरदर्शनचा होता. क्रिकेटचा सामना पहायला येताना प्रेक्षक ट्रान्झिस्टर घेऊन यायचे. त्यांना क्रिकेटचा सामना पहाताना त्याचं धावतं समालोचनही ऐकावंसं वाटायचं. कारण रेडियोवर त्याचं धावतं समालोचन व्हायचं. अशा वेळी कधी कधी एखादा लहरी रसिक सामना बघता बघता ट्रान्झिस्टरवरचं स्टेशन हळुच बदलायचा आणि विविध भारतीवर आणून ठेवायचा. ह्याच विविध भारतीवर एखाद्या चुकार क्षणी मुकेशदांचं गाणं लागायचं आणि सीमारेषेवर उभ्या असलेल्या चंद्रशेखरचं लक्ष वेधून घ्यायचं. चंद्रशेखरच्या बाबतीत ही वेळ अशी असायची की चंद्रशेखरचं लक्ष फलंदाजाकडे असायचं, पण कान मात्र मुकेशदांच्या गाण्याकडे असायचे.

ह्या संदर्भातली खुद्द सुनील गावसकरांनी चंद्रशेखरच्या बाबतीत सांगितलेली एक आठवण अतिशय गमतीदार आहे. झालं असं की ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक सामना सुरू होता. सुनील गावसकर आणि चंद्रशेखर एकमेकांच्या विरोधात खेळत होते. गावसकरांना चंद्रशेखर गोलंदाजी करत होते. गुगली हे चंद्रशेखरच्या भात्यातलं खास अस्त्र होतं. आपलं हे खास अस्त्र चंद्रशेखरनी सुनील गावसकरांविरूध्द वापरलं आणि गावसकर त्यांच्या त्या चेंडूवर सपशेल चकले…आणि सुनील गावसकर चेंडू चकलेल्या ह्या अवस्थेत असतानाच चंद्रशेखरनी त्यांना विचारलं, ‘सुना क्या?’

- Advertisement -

आपल्या फलंदाजीवर पूर्णपणे एकाग्र असलेल्या सुनील गावसकरांना चंद्रशेखरचा तो प्रश्न कळलाच नाही. त्यांनी लागलीच विचारलं, ‘क्या सुना?’
चंद्रशेखर म्हणाले, ‘मुकेश का गाना…क्या गाता हैं ना!’
मुकेशचं असंच एक गाणं चंद्रशेखरना आवडायचं – चांदी की दिवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड दिया, एक धनवान की बेटी ने निर्धन का दामन छोड दिया.
ह्या गाण्याच्या निमित्ताने एक आठवण सांगण्याचा मोह न आवरता येण्यासारखा आहे. हे गाणं आहे ‘विश्वास’मधलं. पण ह्या गाण्याचे गीतकार गुलशन बावरा ‘शहीद’ नावाच्या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री कामिनी कौशलच्या चंदिगढमधल्या आलिशान बंगल्यावर गेले होते.
गुलशन बावरांना पहाताच कामिनी कौशल म्हणाली, ‘मी असं ऐकलं आहे की तुझा प्रेमभंग झाला आहे, पण तरीही तू त्याची जखम म्हणून एक कविता लिहिली नाहीस की गाणं!…असा कसा रे तू कवी? आता तू समोर भेटलाच आहेस तर काहीतरी ऐकव ना प्रेमभंगावर.’

कामिनी कौशलने गुलशन बावराच्या जखमेवरची खपलीच काढली असावी किंवा गुलशन बावरांच्या मनात काही दाटून राहिलेलं असावं किंवा काही साठून राहिलेलं असावं. त्यांनी कामिनी कौशलला तिथल्या तिथे जे शब्द घडा घडा बोलून दाखवले होते ते शब्द होते- चांदी की दिवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड दिया. सगळ्या कडव्यांसकट गुलशन बावरांनी हे गाणं कामिनी कौशलला ऐकवलं. कामिनी कौशल डोळे विस्फारून त्यांच्याकडे फक्त पहात बसली!

असो, इथे आणखी एक गोष्ट सांगायला हवी…गुलशन बावरांचं खरं आडनाव होतं मेहता, पण सदानकदा आपण गोंधळलेले, बावरलेले दिसतो म्हणून ह्या कवीमनाच्या माणसाने आपल्या आडनावाचं बारसं बावरा केलं होतं!
मुकेशदांच्या गाण्याच्या निमित्ताने आज हे सगळं मनात आलं इतकंच…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -