घरफिचर्ससारांश‘हायपरऑटोमेशन’चा स्ट्रॅटेजिक ऑक्सिजन!

‘हायपरऑटोमेशन’चा स्ट्रॅटेजिक ऑक्सिजन!

Subscribe

‘हायपरऑटोमेशन’ हे निर्णय प्रक्रियेशी संबंधित तंत्रज्ञानाचे क्रांतीकारी नवे दालन आहे. खरंतर ‘हायपरऑटोमेशन’ हे नैसर्गिक बुद्धिमत्ता (एनआय) असणार्‍यांना रोजगाराच्या संधींचा ‘कुबेरी’ खजानाच होय! ‘हायपरऑटोमेशन’ हा एक केवळ वाणिज्य किंवा विज्ञान तंत्रज्ञान शाखांच्या मर्यादेत कैद करता येणारा विषय नाही, तर ‘हायपरऑटोमेशन’ हा व्यवसायाला चालना देणारा शिस्तबद्ध, सृजनात्मक, कलात्मक व नाविण्यपूर्ण रंजक दृष्टिकोनही आहे. वोट बँकचे राजकारण असो की शिक्षण वा अर्थकारण, सर्वत्र ‘हायपरऑटोमेशन’चा वापर जगभर केला जातोय.

लवकरच ‘हायपरऑटोमेशन’ तंत्रज्ञान आपल्या सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होत मानवी सभ्यतेच्या मूलभूत गरजा भागवत आव्हानांशी एकजुटीने दोन हात करताना दिसेल. जगाच्या नकाशात असा कुठलाही प्रदेश शिल्लक नाही जिथे व्यावसायिक व उद्योगधंदा वृद्धिंगत करण्यासाठी ‘हायपरऑटोमेशन’रूपी स्ट्रॅटेजिक ‘ऑक्सिजन’ची गरज नाही.

‘हायपरऑटोमेशन’ ह्या शब्दाचा उगम व संकल्पनेचा जन्म झाला तो अवघ्या दोन वर्षापूर्वी! ‘हायपर-ऑटोमेशन’ हा शब्दप्रयोग गार्टनर ग्रुप इंक. या आयटी सल्लागार व संशोधन कंपनीचे संस्थापक गिडॉन यशया गार्टनर (१३ मार्च, १९३५ – १२ डिसेंबर २०२०) यांनी २०२० साली सर्वप्रथम केला. धोरणात्मक-व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापनातील नंबर एकवर असलेला ट्रेंड असे त्यावेळी म्हटले गेले. डिजिटल प्रोसेस ऑटोमेशन (डीपीए) किंवा बुद्धिमान म्हणजेच इंटेलिजन्स ऑटोमेशन (आयए) किंवा अ‍ॅग्युमेंटेड ह्युमन (एएच) किंवा व्हॅल्यू अ‍ॅडेड ह्युमन (व्हीएएच) असादेखील ‘हायपरऑटोमेशन’चा उल्लेख होतो.

- Advertisement -

स्ट्रॅटेजिक डिसिजन्स!

‘स्ट्रॅटेजिक डिसिजन’ म्हणजे एखादी घटना अथवा समस्या निर्माण होण्याची सर्व संभाव्य कारणे पाहून तसे होऊच नये यासाठी उचलावयाची पावले व घ्यावयाचे एक किंवा अधिक निर्णयांची श्रृंखला होय. यात महत्वाचे म्हणजे टाइम स्केलवर या निर्णयांची अंमलबजावणी कोणी कशी व कोणत्या परीस्थितीत किती वाजता किती मिनिटांनी किती मायक्रो किवा नॅनो सेकंदांनी करावयाची इतके अचूक स्वयंचलीत अंमलबजावणीचे यांत्रिकीकरण म्हणजे ‘हायपरऑटोमेशन’ होय. यांत्रिकीकरणाच्या या प्रक्रीयेत सॉफ्टवेअर व हार्डवेअर असा दोघांचा मिलाफ म्हणजे एम्बेडेड सिस्टिम, मॅनेजमेंट कौशल्य व कसब तसेच बदलत्या भोवतालचे रियल टाईम (घटना घडत असतानाच) ज्ञान अद्यावत होणे, बिझनेस इथिक्स व पॉलिसी अशा कितीतरी गोष्टींचा समावेश होतो. परिणामी ‘इंटरडिसिप्लिनरी’ असेच हे ‘हायपरऑटोमेशन’ डिजाईन अँड इंम्लिमेंटींग अँड अपडेशन तंत्रज्ञान आहे.

- Advertisement -

नफा रे नफा रे !

कुठलाही बिझिनेस किंवा व्यवसाय म्हटला की नफा किंवा रेव्हेन्यू महत्वाचा असतो. परंतु फक्त जास्त नफा मिळाला म्हणजे व्यवसाय सुरळीत आहे असे दरवेळी होत नसते, कारण उत्पादन साखळी, कार्य प्रवाह, वस्तू व सेवेचा दर्जा, विपणन म्हणजे मार्केटिंग प्रक्रिया, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेट आदी असंख्य घटक एखादा उद्योगधंदा विश्वासार्हतेने शतकानुशतके सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक असतात. उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ यांचा कमीवेळेत सुयोग्य पद्धतीने पुरेपुर (ऑप्टीमम) वापर करीत ध्येय गाठण्याचे तंत्र-मंत्र आणि दृश्य-अदृश्य यंत्र म्हणजेच ‘हायपरऑटोमेशन’ हे होय! कुणी याला संकल्पना म्हणते तर कुणी याला टेक्नॉलॉजी म्हणते, परंतु यामुळे याचे महत्व जरादेखील कमी होत नाही हे विशेष!

स्मार्ट पॅकेजिंग!

‘हायपर’ म्हणजे उच्च तर ऑटोमेशन म्हणजे जगण्यासाठी आवश्यक गरजेपेक्षा, जास्तीत जास्त सुख-सुविधा त्याही कमीत कमी वेळात तसेच कमीत कमी परिश्रमात मिळवण्यासाठी केलेली धडपड जेव्हा यशस्वी होत स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित होते ते म्हणजे ‘ऑटोमेशन’ होय. ‘हायपरऑटोमेशन’ म्हणजे असेच अत्युच्य तंत्रज्ञान होय. ‘हायपरऑटोमेशन’ हे एम्बेडेड कॉग्नेटिव्ह अ‍ॅबेलिटी (एकत्रित संज्ञानात्मक क्षमता) आणि बुद्धिमत्तेसह ऑटोमेशन साधनांचे हे ‘स्मार्ट पॅकेजिंग’च होय.

संधींचा कुबेरी खजाना!

‘हायपरऑटोमेशन’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल) आणि रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए), इव्हेंट-ड्रिव्हन सॉफ्टवेअर आर्किटेक्चर, व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (बीपीएम), बिझनेस लॉजिक टूल्स, डेटा अ‍ॅनालिसेस आणि बुद्धिमान व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन सूट, सेवा म्हणून एकीकरण प्लॅटफॉर्म, प्रोसेस मायनिंग, डिजिटल इम्यून सिस्टिम, क्लायंट अ‍ॅक्शन टाईम आयडेंटीफिकेशन, लो-कोड/नो-कोड साधने, पॅकेज केलेले सॉफ्टवेअर आणि इतर अनेक प्रकारचे निर्णय, प्रक्रिया आणि कार्य ऑटोमेशन साधने आदींचा समावेश होतो. यांच्या उपयोगाने व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलित करीत ‘इफेक्टिव्हनेस’ व ‘इफिशियन्सी’ वाढविणे ह्या उद्देशाने परिवर्तनासाठी पावले उचलली जातात. परिणामी हायपरऑटोमेशन हे रोजगार संधींचा कुबेरी खजानाच आहे.

तुम्हाला ही गरज आहे!

‘हायपरऑटोमेशन’चा वापर कुठलीही संस्था शक्य तितक्या व्यवसाय आणि आयटी प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने जलद करण्यासाठी करतात. ‘हायपरऑटोमेशन’मध्ये अनेकविध तंत्रज्ञान, साधने किंवा प्लॅटफॉर्मचा समावेश सुसंगम साधण्यास होतो. कुठलाही व्यवसाय ही एक जटिल व टीमवर्कने काम करणारी तसेच विखुरलेल्या स्वरूपात असलेली परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असते. हायपरऑटोमेशन याच परिसंस्थेवर व तिच्या संसाधनांवर पुनरावृत्ती होणार्‍या प्रक्रिया आणि परंपरागत पायाभूत सुविधांचा भार (लोड) कमी करते व सुलभ साधी सरळ बनविण्याचे निरंतर कार्य करते. हायपरऑटोमेशन परिसंस्थेला परवडणारे किंबहुना झेपणारे परिवर्तन करते व तिला अधिक सुव्यवस्थितपणे वेगवान व कमी खर्चिक कार्य करण्यास सक्षम करते. परिणामी उद्योगधंद्यात कॉम्पिटेटर्सच्या तुलनेत स्पर्धात्मक स्थिती मजबूत होते.

‘हायपरऑटोमेशन’च्या सहाय्याने नवनव्या शक्यता व संधी तसेच आगामी धोके व ते टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच कार्यपद्धती व कार्यक्षमतेनुसार कोणत्या कर्मचार्‍याला नोकरीत किती काळ ठेवायचे व कोणाला ताबडतोब नोकरीतून कार्यमुक्त केले तर एकंदर कंपनीला किती व कसे नफा-नुकसान होईल याची जणू हायपरऑटोमेशन सातत्याने कुंडलीच मांडत दिशादर्शन करते. मॅन्युअल प्रयत्नांना ऑटोमेशनसह बदलण्याच्या दरम्यान योग्य संतुलन राखण्याचे महत्व ‘हायपरऑटोमेशन’ हा दृष्टिकोन अधोरेखित करतो.

तुमची ‘झोप’!

जगात एवढं सर्व घडतंय हे मला माहीतच नाही. मला जर आधी कळले असते तर मीदेखील माझा बिझनेस छान चालवित ‘चैन की निंद’ घेतली असती हा विचार हायपरऑटोमेशन देतो. आता तुम्हालाही आपल्या क्षेत्रात ‘हायपरऑटोमेशन’ची गरज आहे असे निश्चितपणे वाटत नाही का?…. कदाचित तुमच्या प्रोफेशनमध्ये ‘बिझनेस रायव्हल’ ने तुमच्या आधीच ‘हायपरऑटोमेशन’चा वापर सुरू केलादेखील असेल आणि तुम्हाला याची भनकदेखील नाही!… जर हा विचार तुमची झोप उडवत नसेल तर निश्चितपणे एक दिवस तुमचा बिझनेस कायमचा झोपलेला असेल हे विदारक वास्तव तुम्ही ‘अ‍ॅक्सेप्ट’ करावे लागेल.

गुंतवणुकीवर अधिक परतावा (आरओआय) आणि अधिक गतिमान अनुभवांसह, साध्या कारकुनी व बाबूशाही नियमांना छेद किंवा फाटा देत ज्ञानाधारित कार्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘हायपरऑटोमेशन’ आहे. जर ‘कुछ नहीं होगा, मुझे सब पता है’ हा विचार तुम्ही करत नसाल तर तुम्ही खरोखर स्ट्राँग (?) आहात असेच म्हणावे लागेल आणि तुम्हाला ‘हायपरऑटोमेशन’ची गरज नाही तर अभिनंदन!

बदलत्या वातावरणात व स्पर्धेत टिकून रहात केवळ अस्तित्वाची लढाई न लढता खर्‍या अर्थाने वाढ होण्यासाठी ‘हायपरऑटोमेशन’ हा जणू आज प्रत्येक ठिकाणी ‘स्ट्रॅटेजिक ऑक्सिजन’ आहेच. मानवी संस्कृती व सभ्यतेसाठी ‘ग्रहांतर’ करतानादेखील निश्चितपणे ‘हायपरऑटोमेशन’ वरदानदेखील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -