घरफिचर्ससारांशभाकरीच्या भूगोलाचा प्रश्न !

भाकरीच्या भूगोलाचा प्रश्न !

Subscribe

संपूर्ण जग दोन वर्षे कोरोना या संंसर्गजन्य आजाराचा सामना करत होतं. यातूनदेखील आज बरेचजण सावरू शकले नाहीत. प्रत्यक्ष हातावर ज्यांचे पोट होते त्यांच्या हाताला काम नव्हते, त्यांच्या जगण्याचा प्रश्न आजही ते सोडवू शकले नाही. सरकारी मदत मिळणार तरी किती..? रोजच्या जगण्याचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी अंधार पसरलेला असतो. कधी कमी आणि कधी जास्त पाऊस यामध्ये अडकलेला शेतकरी ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी मन सुन्न होऊन जातं. इकडे पोटाचा प्रश्न सुरू आहे आणि तिकडे काही लोक आपल्या इतिहासाबद्दल आणि धर्माबद्दल गप्पा मारतात, परंतु भाकरीच्या भूगोलाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत.

नव्या आशा, आकांक्षा, नवी क्षितिजे धुंडाळत असताना येणार्‍या वर्षात खूप काही करायचं असं म्हणत सरत्या वर्षाला आपण अवघ्या काही दिवसांनी निरोप देणार आहोत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी मावळणार्‍या सूर्यासोबत एखादी सेल्फी घेऊनदेखील आपण अपलोड करू. पण त्या आभासी परिभ्रमणामुळे आपण आपल्या सभोवतालचा निर्माण झालेला आभासदेखील बाजूला सारत चालूया. या वर्षात काय कमावलं? काय गमावलं? याची गोळाबेरीज करत असताना खूप काही हातातून सुटलं, आणि खूप काही करायचं राहून गेलं असंच प्रत्येकांना वाटणार. खरंतर आपण खूप वेगवेगळे संकल्प केलेले असतात. ते पूर्ण करण्यासाठी तशी धावपळदेखील केलेली असते.

परंतु एकाच वेळी एकच व्यक्ती प्रत्येक ठिकाणी काम करू शकत नाही. त्यामुळे जो मूळ हेतू आहे तो कधीकधी बाजूला राहतो. त्यातच आजच्या बाबतीत बोलायचे झाले तर काही गोष्टी शक्यदेखील नाहीत. तुम्ही आणि आम्ही रोज एका नव्या समस्येचा किंवा संकटाचा सामना करत जगत आहोत. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काहीतरी नवीन असे ऐकायला मिळते ज्यातून आपण निराश होतो, हताश होतो. तो हताशपणा काही काळापुरता जरी असला तरी त्यावेळी मात्र आपला उत्साह मावळणारा ठरवत असतो. त्यातही ज्यांच्या खांद्यावर या देशाची धुरा देण्याची स्वप्न किंवा भाषा आपण करतो. त्या युवकांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली पाहायला मिळते.

- Advertisement -

वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढती बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या तुमच्या आणि आमच्या समोर आहे. यावर मात करत असताना सर्वांचीच दमछाक होताना दिसते. प्रत्येकवेळी नवीन नियम, नवीन कायदे लागू होतात आणि त्यासोबत जुळवून घेताना आजचा युवक हवालदिल होत आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे किंवा युवकांच्या कला कौशल्यांमध्ये वाढ व्हावी आणि त्यातच त्याचे करिअर घडावे हा अजेंडा आपल्यासमोर ठेवला जात आहे. परंतु ज्या क्षेत्रात करिअर करायचे ते शिक्षण घेऊन किंवा ती डिग्री हातात असून देखील करिअर मात्र भलत्याच क्षेत्रात करावे लागत आहे. हातातल्या डिग्रीच्या भरवशावर आजचे करिअर ठरत नाही. हे स्पष्टपणे दिसत आहे. मग पीएचडी धारकांना देखील चहाची टपरी, वडापावची गाडी किंवा पाणीपुरी यासारखा व्यवसाय करावा लागतो. शेवटी नको असताना कोई भी धंदा छोटा नही होता, असेच म्हणावे लागते.

एकूणच काय तर आपल्या जगण्याच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसते. याबाबतीत समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत देखील चिंता व्यक्त करतात. परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते त्यावेळी प्रत्येक जण मूग गिळून गप्प बसतात. (अपवाद वगळता) मग तुमच्या आणि आमच्यातला माणूस आहे कुठे? हा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर आज आपण पाहतो की, जगण्याची दिशा देणारे लाखो मोटिवेशनल व्हिडिओ व्हायरल होतात. ते व्हिडिओ पाहून त्या काळापुरतं असं वाटूनही जातं की, नक्की आपण फिनिक्ससारखी भरारी घ्यायला हवी किंवा घेऊ शकतो. परंतु जेव्हा आभासी जगाच्या बाहेर आपण येतो. त्यावेळी मृगजळाचा पाठलाग करणार्‍या हरणासारखी आपली अवस्था होते. हातात काहीच शिल्लक राहत नाही आणि आपण फक्त आशेवर जगावे. बरं धावावं तरी किती काळ..? हा देखील आपल्यावर एक प्रकारचा मोठा अन्याय समजला जातो. आणि याच मानसिक ताणतणावात जगत असताना काही युवक स्वत:ला संपवतातदेखील. आजचं हे वास्तव अत्यंत भयावह आहे. यातून मार्ग काढणे ही आजच्या काळाची गरज आहे.

- Advertisement -

काळाच्या ओघात सर्व काही मागे पडून जातं. किंवा काळासोबतची भाषा आपण बोलतो. परंतु आज जे होत आहे त्याचे परिणाम समोर कित्येक वर्षे आपल्याला पाहायला मिळतात. जागतिक स्तरावर जे काही सुरू आहे त्याची झळ आपल्या प्रत्येकाला बसत असते. डाव्या उजव्या संघटना एकमेकांसमोर उभे राहत आरोप प्रत्यारोप लावतात. तिकडे युक्रेन आणि रशियाचे युद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक, राजकीय ताणतणाव निर्माण करत आहे. भारतासारख्या देशाला शेजारील असणारा पारंपरिक शत्रू शांततेने राहू देत नाही. त्यामुळे बदललेली धोरण त्यातून झालेलं आर्थिक नुकसान. अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर नकळतपणे परिणाम करून जातात.

संपूर्ण जग दोन वर्षे कोरोना या संंसर्गजन्य आजाराचा सामना करत होतं. यातूनदेखील आज बरेचजण सावरू शकले नाहीत. प्रत्यक्ष हातावर ज्यांचे पोट होते त्यांच्या हाताला काम नव्हते, त्यांच्या जगण्याचा प्रश्न आजही ते सोडवू शकले नाही. सरकारी मदत मिळणार तरी किती..? रोजच्या जगण्याचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी अंधार पसरलेला असतो. कधी कमी आणि कधी जास्त पाऊस यामध्ये अडकलेला शेतकरी ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी मन सुन्न होऊन जातं. इकडे पोटाचा प्रश्न सुरू आहे आणि तिकडे काही लोक आपल्या इतिहासाबद्दल आणि धर्माबद्दल गप्पा मारतात, परंतु भाकरीच्या भूगोलाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत.

स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता कागदावरच्या अक्षरांमधून सुटून प्रत्यक्ष लोकांच्या जीवनात कधी येईल याचेदेखील उत्तर आज मिळत नाही. वणवण फिरणार्‍या पालं बांधून राहणार्‍या भटक्यांना आजही त्यांच्या गावाचा पत्ता मिळत नाही. बिलो पॉव्हर्टी लाईन ठरवलेली आहे, परंतु राशनच्या दुकानात रोज लाईनमध्ये उभे राहून होणारी फरपट तशीच सुरू आहे. लोकशाही वगैरेच्या गप्पा मारणारे न्यूज चॅनल रोज प्रत्येकाच्या जगण्याचे कटपीस निर्माण करत आहे. टीआरपीसाठी चालू असलेला प्राईम टाईम गल्ला भरण्यात दंग आहे. कुणाचे टी-शर्ट, कुणाचे जॅकेट, कुणाचा बुट तर कुणाचा कुत्रा यावर चर्चा करणार्‍यांकडून अपेक्षा तरी कोणती करावी..? असा सर्वत्र डोळ्यात धूळ फेकणारा एक समूह आपल्याकडे तयार झाला आहे. या समूहाच्या कृतीला आपण हळूहळू बळी पडत जातो. एकूणच काय तर आपलेच खरे असे सांगणारी वृत्ती बळावत आहे. याला वेळीच आळा घालणे हे आपले कर्तव्य आहे.

असं सगळीकडे अस्ताव्यस्त सुरू असताना आपल्याला समस्यांवर उत्तरं स्वत: शोधावी लागणार हे मात्र सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. पाठीमागे वळून पाहताना त्या समस्यांवर आभासी जगाच्या बाहेर येऊन मात करावी लागणार आहे. हे वर्ष तयारी करण्यासाठी घेतलं असेल तर येणार्‍या वर्षात प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. प्रत्येक दिवशी नवनवीन अनुभव येत असतात त्या अनुभवातून शिकणे महत्त्वाचं असतं. खरंतर शिकणे ही आपली रोज चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. आपल्या नवीन कल्पना आणि संकल्प समोर घेऊन जात असताना रोज नवीन वर्ष सुरू होत आहे असे म्हणायलादेखील हरकत नाही. शेवटी काय ‘आने वाले साल को सलाम’ असं म्हणत आपण स्वत:ची वाट निर्माण करावी. जेणेकरून किमान येणारे आणखी नवीन वर्ष हे आपलेच असेल. तूर्तास येत्या नव्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -