घरफिचर्ससारांशलग्नाची बेडी...

लग्नाची बेडी…

Subscribe

लग्नाच्या प्रक्रियेमध्ये चांगला साथीदार निवडणे हा एक महत्वाचा भाग आहे. प्रेम करताना प्रेमाचे रूपांतर नकळत लग्नापर्यंत येऊन पोहोचते. त्यातून जोडीदार निवडण्याची चूक घडल्यास समाजातील ‘अबताफ’ सारख्या प्रवृत्तींना सामोरे जावे लागते. प्रेम (लव )याची व्याप्ती पुढे जाऊन लव (जिहाद) पर्यंत अर्थ लावून पोहोचवली जाते. त्यामुळे सज्ञान व्यक्तींनी लग्नाचा निर्णय घेताना तो तितकाच काळजीपूर्वक आणि जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. नाही तर लग्नाची बेडी ही पोलिसांच्या बेडीत रुपांतरित होण्याची दाट शक्यता असते.

लग्न हा हिंदू कायद्यानुसार माणसाच्या जीवनातील एक महत्वाचा संस्कार आहे, तर मुस्लीम कायद्याप्रमाणे तो करार, निरनिराळ्या धर्मानुसार, वेगवेगळ्या पद्धतीने जरी अर्थ लावले तरी विवाहास मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. सध्या तरुणांसमोर बेरोजगारीपेक्षाही लग्न करण्याचे मोठे आव्हान होऊन बसले आहे. त्यामुळे लग्न जमावणार्‍या संस्था, मॅरेज ब्युरोना मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. पूर्वी पेपरमध्ये येणार्‍या वधु-वर पाहिजे आहे,अशा जाहिराती कधीच बंद होऊन आता फक्त नवरी मिळेल का हो, नवरी अशी विचारणा करणारे अनेकजण गल्लोगल्ली दिसत आहे. एकेकाळी घरोघरी मालमत्ता विकणारे एजंट तयार झाले होते, आता गावा गावात लग्न जमून त्यात लाखो रुपयांचे कमिशन खाणारे एजंट तयार झाले आहेत. मोठ्या शहरात ऑनलाइन विवाहस्थळ शोधून देणारे अनेक जण हेच काम करतात. ते वधू-वराच्या घरच्यांकडून कमिशन उकळतात. पण ते फार संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घेतात. त्यामुळे वधू-वरांना आणि कुटुंबीयाना एकमेकांना जाणून घेण्यास वेळ मिळत नाही, आणि फसवणूक होण्याची शक्यता असते.

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे वकील म्हणून एक मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडपे सल्ल्यासाठी आले होते. दोघेही थोडे घाबरलेले होते, त्याच्या पत्नीने सांगण्यास सुरुवात केली की, मुलीचे लग्न सात आठ महिन्यांपूर्वी परराज्यातील व्यापारी कुटुंबातील एका मुलाशी लावून दिले. लग्न झाल्यानंतर तिसर्‍या दिवसानंतरच त्यांच्या मुलीच्या लक्षात आले की नवरा मुलगा कोणाशी तरी फोनवर ती चॅटींग करत होता. तो झोपल्यानंतर त्याचा फोन मुलीने तपासला असता, त्याला समोरून एक तरुण अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ पाठवत असल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीने हे व्हिडिओ तिच्या नातेवाईकांच्या फोनवरती पाठवून तिच्या नवर्‍याच्या कृत्याची माहिती दिली. या मुलाने लग्नानंतर आपल्या पत्नीशी संबंध ठेवण्यास नकार दिला, तो समलिंगी संबंध ठेवणारा असल्याचे कळल्याने नवरी मुलीला धक्काही बसला, परंतु परराज्यात एकटी मुलगी असल्यामुळे कोणतीही तक्रार न करता या सर्व गोष्टीचा त्रास आठ-पंधरा दिवस सहन केला. लाखो रुपयांचा खर्च होऊन असा पती मिळाल्याने मुलीची आणि तिच्या कुटुंबाची मोठी फसवणूक झाली होती. त्यामुळे काहीच सुचत नव्हते, म्हणून कुठली कायदेशीर कारवाई करता येईल यासाठी हे जोडपे आले होते.

- Advertisement -

दुसर्‍या एका प्रकरणात मुलगी मिळेना म्हणून कंटाळलेल्या मुलाच्या घरच्यांनी एजंटमार्फत लग्नाला मुलगी पाहिली. मध्यस्थाने तीन लाख खर्च मुलीच्या घरच्यांना द्यावा लागेल असे सांगितले. मुलाच्या घरच्यांनी शेतीची विकून रक्कम जमवली होती. मध्यस्थी लोकांनी रक्कम स्वीकारून मंदिरात माळ घालून समोर नोटरी वकीलासमोर प्रतिज्ञापत्र करुन विवाह लावून दिला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी मुलगी घरातून दागिने घेऊन फरार झालेली होती. मध्यस्थाने हात वर केले. रक्कम परत मागितली असता, मुलीवर अत्याचार केल्याबाबत खोटी फिर्याद करण्याची धमकी दिली, यामुळे मुलाच्या कुटुंबाची मोठी फसवणूक झाली होती, अशा प्रकारची अनेक प्रकरणे पाहायला मिळतात. त्यामुळे लग्न जमवताना काळजी न घेतल्यास कायद्याच्या कचाट्यात दोन्ही बाजूचे कुटुंबीय व नातेवाईक तसेच मुलगा मुलगी अडकू शकतात.

‘खरंतर शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’, असे म्हणणार्‍यावर कधी ना कधी कोर्टामध्ये जाण्याची वेळ येते. घटस्फोटाचे प्रमाण शारीरिक, मानसिक छळ, सोडून जाणे/त्याग करणे, नपुसकत्व/दुर्बलता, गुप्तरोग ह्या कारणावरून खटले दाखल होतात. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. समाजामध्ये हल्ली भादंवि कलम ४९८अ, व कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली मुलाच्या कुटुंबियांना गुंतवले जाते. खरंतर लग्न होईपर्यंत मजा नंतर ‘जन्मठेपेची सजा’ वाटू लागते. तीही न सुटणारी आणि न तुटणारी.

- Advertisement -

वरील दोन्ही उदाहरणांमध्ये फसवणूक झालेली आहे. फसवणुकीचा बदला म्हणून एकमेकावर केस दाखल केल्या जातात. मुला-मुलींनी आर्थिक क्षमता ओळखून लग्न करण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. अनेकदा मुलामुलींना लग्न करायचे नसते, एकमेकांना पसंत नसतात, दुसर्‍यावर प्रेम असते, परंतु घरच्यांच्या आग्रहास्तव बळजबरीने सामाजिक दडपण म्हणून लग्न करायला भाग पाडले जाते. मुलामुलींची शारीरिक-मानसिक क्षमता, वयाची परिपक्वता, ओळखून नातेवाईकांनी त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे. मुलगा कमवता नसेल तर घरच्यांच्या भरोशावर लग्न झाल्यानंतर विभक्त होतो, आर्थिक कारणामुळे नवरा बायकोमध्ये वाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. त्यामुळे मुलाची लग्न करताना बायको सांभाळण्याची क्षमता आहे का? याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे नाहीतर ही गोष्ट अनेक वेळा मुलगा व कुटुंबीयाच्या अंगाशी येते. दोघांनीही लग्न करताना विवाहपूर्व समुपदेशन घेणे गरजेचे आहे. मुलामुलींची एकमेकांची मने जुळतात का हे पाहणे तितकेच गरजेचे आहे, मुलामुलींची मानसिकता लक्षात न घेता पालक लग्न ठरवून टाकतात, पुढे वाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते.

अनेक वेळा शिक्षण, मालमत्ता, नोकरी, पूर्वीचे प्रेमसंबंध, पुनर्विवाह यासंदर्भात चुकीची माहिती दिल्यामुळे लग्नानंतर पतीपत्नीत वाद होतात. त्यामुळे खरी माहिती देऊन वादविवाद टाळले पाहिजे. घटस्फोट होण्याचे प्रमाण लग्नानंतर १ते २ वर्षांच्या आत जास्त असते, यामागील खरे कारण एकदा पतीपत्नी दोघांचे शारीरिक संबंध व्यवस्थित असतात तोपर्यंतच ते एकत्र राहतात. एकदा पतीपत्नीमधील शारीरिक आकर्षक संपले की मने तुटायला वेळ लागत नाही. त्यानंतर कोणतीही व्यक्ती मध्यस्थ, नातेवाईक, वकील, न्यायाधीश हे दोघांना एकत्र आणण्याची शक्यता फार कमी असते. मुला-मुलींचे लग्न जमावताना घरचे लोक जास्तीच्या अपेक्षा ठेवतात. त्यानंतर अपेक्षाभंग झाल्याने दोघात वैचारिक मतभेद होतात. त्यामुळे विवाह जास्त काळ टिकत नाहीत. हल्ली मुला-मुलींना स्वतंत्र विचार व स्वतंत्र राहणीमान हवे असते. त्यामुळे एकत्र कुटुंबात ते राहत नाहीत, त्यामुळे आई-वडिलांना संभाळण्यावरून वाद होतात.

घटस्फोटाच्या ७० ते ८० टकके प्रकरणात मुलामुलींपेक्षा त्यांचे नातेवाईक प्रकरण घटस्फोटापर्यंत नेण्यात पुढे असतात. ते फूस देऊन वाद वाढवतात. ही गोष्ट प्रेमविवाहामध्ये जास्त दिसून येते, त्यामुळे सामाजिकदृष्ठ्या मुलामुलींची समजूत काढून त्यासाठी विवाह झाल्यानंतर व विवाहपूर्व समुपदेशन घेणे गरजेचे आहे. भविष्यात वाद उपस्थित होऊ नये म्हणून मुला-मुलींना त्यांचे आचार विचार जुळवून घेण्यासाठी लग्न करण्याअगोदर एकत्र येण्यास संधी देणे गरजेचे आहे, अन्यथा लग्नाची बेडीत अडकल्यानंतर ह्याच बेडीचे रूपांतर पोलिसांच्या हातातील बेडीमध्ये होऊ नये तितकेच गरजेचे आहे.

–अ‍ॅड. गोरक्ष कापकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -