घरफिचर्ससारांशममत्वाची गाथा!

ममत्वाची गाथा!

Subscribe

एक आदर्श शिक्षिका, कार्यकर्ती आई म्हणजे स्मृतीशेष ललिता लक्ष्मण दोंदे. ललिता दोंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दर मासिक स्मृतीला अभिनव सामाजिक उपक्रम राबवला आणि वार्षिक स्मृतिदिनी एकंदर ‘सामाजिक आई’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करून काही निधी सामाजिक काम करणार्‍या संस्थांना दान दिला. दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केल्यानंतर आईचं ऋण व्यक्त करण्यासाठी ‘माणुसकी फुलवणारी आई’ हे पुस्तक प्रकाशित केलं. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ललिता दोंदे यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहून जीवन जगत असताना आई ते आदर्श शिक्षिका म्हणून संस्कारक्षम कुटुंब कसं असावं याचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

–प्रदीप जाधव

जन्म आणि मृत्यूच्या बोटीत सर्वांनाच प्रवास करायचा असतो. जन्मानंतर मृत्यूमधील अंतर वाढण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. खरं म्हणजे मृत्यू येऊच नये असंच प्रत्येकाला वाटतं. मृत्यूने आनंद किंवा समाधान मानणारे लोक पृथ्वीवर फारच कमी आहेत. जीवनाला कंटाळणारेच मृत्यूला कवटाळतात, अन्यथा मृत्यूच्या वाटेने कुणीही फिरकत नाही. मृत्यूची भीती प्रत्येकालाच असते. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. असं असलं तरी मृत्यूला सहजासहजी कोणी तयार होत नाही. जन्माला येणं आणि नाश पावणं हा निसर्गाचा नियम आहे. अर्थात जन्मानंतर मृत्यू हे अंतिम सत्य. जन्मानंतर बाल्यावस्था, कुमार अवस्था, तरुण, प्रौढ आणि वृद्धत्व अशी उतरंड होत असते. जीवनाचं आकलन झाल्यापासून आपण कसं आणि काय जगलो यावर आपल्या आयुष्याचं मोजमाप होत असतं.

- Advertisement -

जीवनाचा आलेख मांडला जातो. आपण किती वर्षे जगलो यापेक्षा आपण किती चिरंतन स्मृती मागे ठेवल्या? आपल्या जगण्याने मानवी जीवन सत्कारणी लागलं का? किती लोकांच्या जगण्याची प्रेरणा आपण झालो? खरोखरंच आपण इतरांच्या उपयोगी आलोत का? हे अधिक महत्त्वाचं. नाहीतर जन्माला आला आणि धरतीवर भार होऊन गेला! इतरांना उपद्रव देऊन, असं इतरांनी म्हणण्यापेक्षा पुढची पिढी आपल्या जीवनमूल्यांचा विचार घेऊन मार्गक्रमण करेल असा आदर्श समाजासमोर ठेवणे म्हणजे कायम स्मृतीत राहणे. कोणीही व्यक्ती पद, पैसा, सत्ता, संपत्ती जमा करतोच. सगळं पैशाने विकत घेता येतं. अलीकडे अगदी नावलौकिकसुद्धा. जगत असताना माझ्या मृत्यूनंतर मी लोकांच्या स्मरणात राहावं, माझ्या नावाचा इतिहास व्हावा यासाठी लाडी-लबाडीने धडपडणारे कमी नाहीत. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असली तरी स्रियांचाही तितकाच सन्मान केला जातो. मृत्यूनंतर पुरुषांपेक्षा स्त्रियांचं अधिक स्मरण केलं जातं. आई असेल तर मात्र आईच्या मृत्यूनंतरही काही काळ सहसा ती दूर जात नाही. तिच्या मायेपोटी, प्रेमापोटी ती निरंतर आठवणीत राहते. आई हे असं नातं आहे की त्या नात्यापुढे सगळं जग फिकं पडतं. आईच्या व्याख्या, आई शब्दाचा अर्थ जगात अनेकांनी लावला असला तरी आई म्हणजे संपूर्ण विश्व असंही काहींनी संबोधलं आहे.

आभाळाएवढी माया, विशाल हृदय, आकाशाएवढं काळीज, करुणेचा महासागर, माणुसकी, प्रेमाचा झरा म्हणजे आई. आई या शब्दासाठी आणि नात्यासाठी शब्दकोश, शब्दसाठा ओवी, गाथा संपतात. कोणत्याही आईचं कर्तृत्व हिमालयापेक्षा कमी नाही. आई ही फक्त दोनच पण खूपच ताकदवान अक्षरं. आईविषयी जगात अनेक कथा, कविता, कादंबर्‍या अनेकांनी लिहिल्या आहेत. त्यातून एकच सिद्ध होतं आईची उंची, व्याप्ती मोजता येत नाही. आई! किती उपमा देऊ तुला, तुझ्यासाठी माझा विश्वकोश संपला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आईचं रूप वेगवेगळं असलं तरी ती जेव्हा अपार काबाडकष्ट करून ऊन, पाऊस, वारा, वादळ झेलत कुटुंबाची सावली बनते, कुणी वाकड्या नजरेने आपल्या पिल्लांकडं बघताच वाघिणीसारखी तुटून पडते, कुटुंबावर संस्कार करते, तेव्हा ती समाजाची तद्वतच जगण्याची प्रेरणा ठरते.

- Advertisement -

खरंतर आई हे एक अद्भुत रसायनच असतं. आईविषयी कवी यशवंत, माधव ज्युलियन, लक्ष्मीकांत तांबोळी, फ. मु. शिंदे, श्रीरंग जोशी, ग्रेस, वामन निंबाळकर, ना. धो. महानोर, दया पवार, नारायण सुर्वे आदींनी अनेक कविता केल्या आहेत. त्याचप्रमाणे मॅक्झिन गार्की, साने गुरुजी, उत्तम कांबळे या अनेक लेखकांनी आई समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता सध्या प्रा. प्रशांत मोरे आईच्या, मायेच्या कविता गीतातून सादर करीत असून आईची महती सांगत आहेत. प्रत्येक आईमध्ये मायेचा ओलावा, प्रेम, समर्पण, त्याग, संस्कार यांसारख्या गुणांचा समुच्चय असतो. आई हे एकमेव असं न्यायालय आहे की जेथे तुमच्या चुकांना क्षमा असते व सुधारण्यास संधी दिली जाते. ती आपल्या पिल्लांना हृदयाशी कवटाळते. आईजवळ नसतो तो फक्त स्वार्थ.

आई गरीब असो वा श्रीमंत, पगारदार असो वा गृहिणी, आई गेल्यानंतर मात्र दुःख पेलण्याची क्षमता लवकर येत नाही. आईशिवाय जीवन व्यर्थ. दादा कोंडकेंच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘ज्याला आय नाय त्याला काय नाय’ किंवा ‘आईविना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी’ असंही पूर्वापार म्हटलं जातं. आईचं कर्तृत्व मोजता येत नाही. आई किती मोठी हे आपल्याला इतिहासापासून वर्तमानापर्यंत अनेक आईंची उदाहरणं सांगता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणारी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांच्या संस्कारातून जुलमी सत्तेचा विनाश होऊन माणुसकीचा उदय झाला.

समतेच्या, न्यायाची संकल्पना उदयास आली अन् आई हे नाव इतिहासात अजरामर झालं. आधुनिक काळात हजारो अनाथांची माय माऊली, सावली, आधारवड सिंधुताई सपकाळ यांनी आई! माई! या शब्दांचा सार्थ अभिमान वाढवला. अशी कितीतरी उदाहरणं आपण आईची सांगू शकतो. त्यामुळे आईचं कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व, ममता, संसार, संस्कार, त्याग, प्रेम, प्रज्ञा, करुणा, एका पानात, एका कवितेत, कादंबरी तथा ग्रंथात किंवा एखाद्या खंडात मावू शकणार नाही. आई ही आईच असते. कधी कणखर असते तर कधी मऊ. प्रसंगानुरूप आई आपलं रूप बदलत असते. बहीण, पत्नी, आई, काकू, मावशी, आत्या, मामी, आजी ही नाती जपत सर्वांना मायेच्या ओलाव्यात एकसंध बांधत असते.

अशीच एक आदर्श शिक्षिका, कार्यकर्ती आई म्हणजे स्मृतीशेष ललिता लक्ष्मण दोंदे. ललिता दोंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दर मासिक स्मृतीला अभिनव सामाजिक उपक्रम राबवला आणि वार्षिक स्मृतिदिनी एकंदर ‘सामाजिक आई’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करून काही निधी सामाजिक काम करणार्‍या संस्थांना दान दिला. दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केल्यानंतर आईचं ऋण व्यक्त करण्यासाठी ‘माणुसकी फुलवणारी आई’ हे पुस्तक प्रकाशित केलं. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ललिता दोंदे यांनी आपल्या आयुष्यात अनेक

चढउतार पाहून जीवन जगत असताना आई ते आदर्श शिक्षिका म्हणून संस्कारक्षम कुटुंब कसं असावं याचा उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ललिता दोंदे यांनी आपल्या जीवनात कोणता आदर्श निर्माण केला, त्यांनी संपूर्ण आयुष्यात माणुसकी पेरली, समाजहिताची कामे केली. या सगळ्या आठवणी त्यांचे कुटुंबीय व इतर अनेक मान्यवर, लेखक, साहित्यिकांनी लिहिल्या आहेत. त्या आठवणींचा ठेवा म्हणजे हे पुस्तक होय. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड लिहितात की, आईविषयी किती बोलावं शब्द कमी पडतात. पेनातील शाई संपते नि कागदही अधुरा राहतो. अशी आई तिचं प्रेम, माया असते आभाळभर, अजरामर. जिची असते छाया झाडासारखी. तिचे बोल म्हणजे खडीसाखर. जिच्या आशीर्वादाने मन कसे भरून जाते, जिच्या शब्दाने दुःख हलकं होतं, जिचा स्पर्श परिसापरी. जिच्या शब्दाने रान कसे फुलून जाते, जिच्या बोलण्याने अश्रूंची फुले होतात आणि प्रेमरूपी गंध येतो. अं. नि. स.पत्रिकेचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड यांनी आपल्या लेखातून कार्यकर्ती, कार्यकर्त्यांची आई रेखाटली आहे.

त्याचबरोबर संध्या गायकवाड, रोहणी जाधव, श्रद्धा संजय दोंदे, सुजाता शैलेश दोंदे, रंजना जाधव, अंजना संजय गायकवाड यांच्या लेखातून माणुसकीचा झरा वाहत आहे. कवी संजय इधे, मिलिंद जाधव, उमाकांत दोंदे यांनी कवितेतून माणुसकीचा मळा फुलवला आहे. या सर्व लेख, कवितांमधून सहज लक्षात येतं ते म्हणजे कुठेही कृत्रिमता नसून सर्वच नैसर्गिक आहे. प्रसिद्ध साहित्यिका प्रा. आशालता कांबळे यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लिहिली असून या पुस्तकाची उंची प्रस्तावनेतून वाढवलेली आहे. या पुस्तकाचे संपादन सुरेखा पैठणे आणि शैलेश दोंदे यांनी केलं असून शैलेश दोंदे आपल्या मनोगतात लिहितात, आमचं कुटुंब, गाव कबीर पंथीय असल्याने साहजिकच आमच्या कुटुंबावर आणि गावावर कबीरांच्या दोह्यांचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे समाज आणि माणुसकी यापासून आमची नाळ कधीच तुटणार नाही. संत कबीर आपल्या दोह्यात म्हणतात की, मूल जन्माला आल्यावर सर्वजण हसतात आणि मूल रडतं; आपण असं कर्म करावं की आपल्या जाण्याने जनतेने रडावं.

अशा प्रकारे आपण आपलं कर्तव्य पार पाडावे, माणुसकी पेरावी यासाठी आपला जन्म आहे, असं अंतिम ध्येय असावं. अशीच शिकवण या पुस्तकातून मिळते. केवळ पैशांसाठी माझं जगणं हा स्वार्थ नसावा. आज नेमकं उलट चित्र दिसतं. सुरुवातीच्या काळात चळवळीमध्ये एकत्रित काम करणारे कार्यकर्ते सामाजिक प्रश्नांवर लढे उभारतात, परंतु काहींकडे जेव्हा पैसा, पद, संपत्ती येते तेव्हा मात्र ते आकाशात तरंगतात. त्यांच्याच साथ सोबतीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जो जमिनीवर घट्ट उभा असतो त्याला विसरतात. आपापसातील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांची मनं दुभंगतात. त्यामुळे चळवळी क्षीण झाल्या आहेत. चळवळी ठप्प होण्याचं तेही एक कारण असावं. या पुस्तकातून तेवढा तरी बोध घ्यावा हीच अपेक्षा. पुस्तकाची मांडणी उत्तम दर्जाची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -