घरफिचर्ससारांशएका अंडरवर्ल्ड डॉनची ट्रॅजेडी...

एका अंडरवर्ल्ड डॉनची ट्रॅजेडी…

Subscribe

अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी.राहणार दगडी चाळ भायखळा... सध्याची स्थिती शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी. पत्नी आशा गवळीच्या आजारपणामुळे तुरुंगातून मिळालेली पॅरोलची सुट्टी कुटुंबासह घालवतानाच सोबतची साडेतीनशे कुटुंब लवकरच नव्या पुर्नविकसित घरात विसावतील याच्या समाधानाची भावमुद्रा घेऊन पोलीस व्यवस्था आणि राजकारण यात व्यवस्थित भरडून निघालेला एक अंडरवर्ल्ड डॉन. जो २०१० पर्यंत अनेक गुन्ह्यात पहिला आरोपी असूनही कायद्याच्या कचाट्यात न सापडलेला. मात्र त्याचवेळी अंडरवर्ल्डच्या वाटेवरून विधानसभेच्या हिरवळीवर काहीसा वेगात जाताच राजकारणानं घेतलेला एक मोठा बळी.

लॉकडाऊन असला तरी भायखळाच्या पूर्वेला दाटीवाटीच्या दुतर्फा अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांच्या गर्दीतून आणि रस्त्यांवरुन बिनधास्त फिरणार्‍या दुचाकीच्या कर्णकर्कश गदारोळातून आपण दगडी चाळीत पोहचतो. ही दगडी चाळ म्हणजे हिंदू डॉनचा किल्लाच जणू. इथल्या नव्यानं बनलेल्या लसीकरण केंद्राच्या मागच्या बाजूने अत्यंत निमुळत्या जिन्यांनी आपण वर पोचतो. तिथेही लोखंडी दरवाजाची टाळेबंदी तटबंदी. आपल्या बद्दलची खात्री झाली, आतून परवानगी आल्यावरच आपण आत शिरलो. अनेक राकट नजरांनी- कटाक्षांनी आपलं व्यवस्थित ’स्कॅनिंग’ झालं की आपण काचेचा दरवाजा असलेल्या एका ऑफिसवजा खोलीजवळ पोचतो. तिथेही पुन्हा थांबा. आत निरोप जातो…परवानगी येते आणि आपण प्रवेश करताच साधारण पाच फूट उंचीची मूर्ती आपलं स्वागत करते. ’जय शिव-शंभो’ !… होईपर्यंत सर्रकन पुढे येत आपण कुठे, कसं बसायचं याच्या सूचना दोन व्यक्तींकडून येतात. ’इथल्या’ नियमांचं पालन केल्यावर पांढरा पायजमा, कुडता आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पेहराव केलेली छोट्या चणीची व्यक्ती आपल्याला हालहवाल विचारते आणि त्यानंतर सुरु होतो एक संवाद…जो आपल्याला सांगू पाहतो एका वाल्याचा वाल्मिकी होतानाचा प्रवास जो पुन्हा त्याला वाल्या बनवून सोडतो… अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी. राहणार दगडी चाळ भायखळा… सध्याची स्थिती शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी.

पत्नी आशा गवळीच्या आजारपणामुळे तुरुंगातून मिळालेली पॅरोलची सुट्टी कुटुंबासह घालवतानाच सोबतची साडेतीनशे कुटुंब लवकरच नव्या पुर्नविकसित घरात विसावतील याच्या समाधानाची भावमुद्रा घेऊन पोलीस व्यवस्था आणि राजकारण यात व्यवस्थित भरडून निघालेला एक अंडरवर्ल्ड डॉन. जो २०१० पर्यंत अनेक गुन्ह्यात पहिला आरोपी असूनही कायद्याच्या कचाट्यात न सापडलेला. मात्र त्याचवेळी अंडरवर्ल्डच्या वाटेवरून विधानसभेच्या हिरवळीवर काहीसा वेगात जाताच राजकारणानं घेतलेला एक मोठा बळी. त्यामुळे याच प्रश्नाच्या उत्तरासाठी त्याला छेडल्यावर तो सांगतो, राजकारणात पडलो आणि अडचणीत आलो. राजकीय पक्ष बनवून आमदार होणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी घोडचूक ठरलीय. मला लोकांसाठी काम करायचं होतं. कारण मी आणि माझा भाऊ किशोर उर्फ पापा गवळी नगर जिल्ह्यातून मुंबईत आलो तेव्हा खूप अडचणींचा सामना करावा लागला. नोकरीसाठी धडपड करावी लागली. हळदणकर नावाच्या एका गृहस्थाने गोदरेजमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर नोकरी लावली. तिथे ब्रेक मिळायचा पण पुन्हा बोलवायचे. काही वेळ तिथे नोकरी केल्यावर दिव्याच्या गोपीनाथ म्हात्रे यांनी क्रॉम्प्टन ग्रीव्हजमध्ये नोकरी लावली.

- Advertisement -

दोन्ही कंपन्यांमध्ये कॉण्ट्रॅक्टवरच होतो. पगारही खूपच कमी होता. त्यामुळे जगण्याचा संघर्ष काय असतो हे मला माहीत होतं. नोकरी, गरीबी, कौटुंबिक जबाबदार्‍या, सामाजिक समस्या या सगळ्यांची जाण होती म्हणून गरीबांसाठी काही करावं असं वाटत होतं. मग त्यासाठी अखिल भारतीय सेना नावाची एक सामाजिक संघटना काढली. नव्वदच्या दशकात मुंबईत शिवसेना जोरात होती. मराठी माणसांसाठी काम करत होती. त्यांच्या शाखांमध्येगरजू लोकं जायची. त्यातल्या काहींची कामं व्हायची तर काही निराश होऊन परतायचीत. अशा काही निराश लोकांचे प्रश्न आमच्या संघटनेच्या माध्यमातून सुटू लागले. लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. आणि बघता बघता अखिल भारतीय सेनेचे कार्यकर्ते राज्यभरात कामाला लागले कार्यालयं झाली. लोकांचं प्रेम मिळू लागलं. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार श्रद्धा आणि आकर्षण होतं. मी त्यांना एकदा भेटलो होतो. त्यांची निर्णय क्षमता आणि कामाची पध्दत याच्यावर मी जबरदस्त फिदा होतो. आमच्या लोकांनी सेनेच्या मंडळींसारखं लोकांचं काम करावं असं मनापासून वाटत होतं.

कामं होत होती. पण तिथेच गडबड झाली. कोणीतरी बाळासाहेबांचे कान भरले. मी आमची अखिल भारतीय सेना शिवसेनेला स्पर्धा करण्यासाठी बनवली असल्याचं त्यांच्या डोक्यात उतरवण्यात आलं. पण ते खरं नव्हतं. कारण बाळासाहेब इतके महान होते की आम्ही काय कोणीच त्यांच्या पायाजवळ पण जाण्याच्याही क्षमतेचे नव्हतो. पण अभासेनेला मिळणारा लोकांचा पाठिंबा कोणालातरी अस्वस्थ करत होता. मी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूकही जिंकली. मी अभासेनेचा आमदार म्हणून विधान भवनात पोचलो. माझा स्वत:चा पक्ष होता तरी मला मनापासून वाटतं होतं मी शिवसेनेचा आमदार व्हायला हवं. पुढे तर मला असंही वाटलं आपला पक्ष सेनेतच विलीन करायला हवा. पण मला आणि सहकार्‍यांना भीती वाटत होती की आमचं राजकीय अस्तित्वच कोणीतरी संपवून टाकेल. बाळासाहेबांचंही माझ्यावर प्रेम होतं. पण तिथल्या कुणाला तरी मी नको होतो. असं सांगताना गवळी काहीसा भावुक होतोय, असं दिसताच ’हिंदू डॉन’चा मुद्दा छेडताच सावध होत तो सांगतो, बाळासाहेब ठाकरे विद्याविहारच्या एका जाहीर सभेत म्हणाले, “तुमचा दाऊद तर आमचा गवळी…” मग इंग्लिश मिडियाने लगेच मला ’हिंदू डॉन’ केलं. बाळासाहेबांनी जाहीरपणे मला ’आपला’ म्हटलं हा त्यांचा मोठेपणा. ते ग्रेटच होते. माझ्या अनेक सहकार्‍यांचा त्यांच्यावर जीव होता.

- Advertisement -

आपण या माणसासाठी, त्यांच्या संघटनेसाठी काही करायला हवं असं वाटायचं पण कुणीतरी मला त्यांच्याकडे पोहचू देत नव्हतं. त्यांच्यासाठी काही करु देत नव्हतं. तो मौका मला मिळाला २००७ च्या महापालिका निवडणुकीत. तेव्हा मी दोन नगरसेवक सेनेला दिले आणि मराठी माणसाच्या संघटनेचा भगवा वाचवला. याचं आजही मला खूप समाधान आहे’. गवळीचा चेहरा समाधानाने खुलला आहे आणि समोरचे त्याचे दोन सहकारी ’रिलॅक्स’ आहेत हे बघून त्याला शिवसेनेचे नेते यशवंत जाधव, संजय पोतनीस यांनी आणून दिलेल्या खोक्यांबद्द्ल विचारताच काहीसा खसकत दगडी चाळीचा हा डॉन म्हणाला, ऐ कसले खोके? कोणी दिले ? कोणी घेतले? ते खोके बिके काय नाय…आता पहिल्यांदाच मला कोणीतरी ओपनली विचारलंय म्हणून सांगतो, नारायण राणे शिवसेनेतून गेले होते. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती. बाळासाहेब ठाकरे दु:खी होते. कारण त्यांना आवडणारी दोन माणसं बाजूला गेल्यावर सगळ्यांनी उध्दवना टार्गेट केलं होतं. महापालिकेत शिवसेना अडचणीत आली होती. सेनेची सत्ता जाईल अशीच परिस्थिती होती. अभासेनेकडे दोन नगरसेविका होत्या. माझी मुलगी गीता आणि भावजय वंदना. तेव्हा उध्दव ठाकरेंचा पीए मिलींद नार्वेकर फोन करुन माझ्याकडे आला. त्याने सगळी परिस्थिती सांगितली.

ते सगळं मी ऐकून घेतलं… एकदम ’वन टू वन…’ त्याने बाळासाहेब आणि उध्दवजींशी फोनवर बोलणं करुन दिलं. बाळासाहेब म्हणाले, ’अरुण उध्दवला मदत कर, मराठी माणसासाठी… भगव्यासाठी! त्यासाठी तुला काय पाहिजे ते माग! मी लगेच म्हणालो, ’साहेब फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या… त्यानंतर उध्दवजी बोलले. मला बोलण्यावरूनच त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे असं वाटलं. मला राज ठाकरे पण आवडायचे. राज, जबरदस्त डॅशिंग लिडर. एकदम राजा माणूस… मला भेटलेत खूप आधी… माझ्या मुलीच्या गीताच्या लग्नाचं आमंत्रण त्यांना दिलं होतं. तर आवर्जून लग्नाला पण आले होते. माझ्या फॅमिलीला खूप बरं वाटलं. पण एक सांगू मिलिंद नार्वेकर मला इमानदार वाटला. जे काय आहे ते ओपनली करणारा वाटला. कदाचित त्याच्याऐवजी कोणी दुसरा असता तर तेव्हा मला मनवू शकला नसता. कारण आम्हांला तेव्हा खूपच निरोप येत होते. खूप जण काय काय सांगत होते. पण मी गीता आणि वंदनाला लगेच पत्र बनवायला सांगितलं आणि ताबडतोब मिलिंदच्या हातात देऊन पण टाकलं. ते फक्त उध्दवजी, मिलिंद आणि मी यांच्यातच होतं.

कोणाला माहिती नव्हतं, पत्र दिल्याचं. त्यात यशवंत जाधवचा वगैरे काही संबंध नव्हता, संजय पोतनीसला तर मी ओळखत पण नाही. तो कुठे राहत़ो ते पण मला माहित नाही. ते काय खोके देणार? मग ही खोक्यांची स्टोरी आली तरी कुठून ? आणि उध्दवजी , बाळासाहेब बोलतात तर बाकी कोणावर काय विश्वास ठेवायचा? असा मी विचार केला. पण मिलिंदने डायरेक्ट बोलणं करुन दिलं. म्हणूनच शिवसेनेची सत्ता टिकली…याचं मला समाधान आहे. पण त्याच शिवसेनेच्या नगरसेवकाच्या कमलाकर जामसंडेकरच्या खूनात मला अडकवून ’लाईफ’ लागली ह्याचा खूप वाईटपण वाटतंय. मला त्यात सपशेल खोटं अडकवलंय. मी ३० लाखांसाठी कशाला मर्डर करु? ऐंशीच्या दशकात दाऊद इब्राहिम, छोटा राजन, सुनील सावंत उर्फ सावत्या, छोटा शकील, दिवाकर चुरी यांच्यासह अनेक डॉन आपला जीव वाचवण्यासाठी परदेशात पळाले. तेव्हा अरुण गवळी मात्र मुंबईत राहिला. दगडी चाळीचा व्याप आणि राजकीय- सामाजिक क्षेत्रातील मोठ्या संख्येनं असणार्‍या सहकार्‍यांना घेऊन परदेशी जाणंही गवळीला शक्यच नव्हतं. परदेशात आणि देशातही प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून जीवाला धोका असलेला गवळी राजकारणात गेल्याच्या चुकीनं पस्तावतोय. २००८ साली विधान परिषद निवडणुकीत तत्कालीन आमदार असलेल्या गवळीला राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्याने राष्ट्रवादीला मतदान करायला सांगितलं.

तसा निरोपही सचिन अहिरसह अनेकांकरवी देण्यात आला होता. पण गवळींनी त्या निवडणुकीत सेना-भाजपला मतदान केलं. त्यानंतर मात्र त्या मंत्र्यानं गृहमंत्री आर.आर. पाटलांना सांगून गवळीचा काउंटडाऊन सुरु केला. आता गवळीला कुठलाच पक्ष नकोय, की झेंडाही नकोय. झटपट नेता व्हायच्या झमेल्यात अडकलेला हा डॉन आपल्या मुलांसह कुटुंबियांवरही कोणत्याही अपेक्षा लादायला तयार नाही. मुलगी गीता आणि भाचा सचिन अहिर यांच्या राजकारणाची शैली आणि ध्येयांचे टप्पेही वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये तुलना करायचं टाळून गवळी सांगतो, मी आता अध्यात्मात रमतो. त्यातून मला आनंद मिळतो. मी रोज देवपूजा करतो. त्यातून मला मन:शांती मिळते. मला फक्त मानसिक शांती हवीय. मी गीतेची शिकवण आत्मसात करतोय. गांधींवरची पुस्तकं वाचतोय. तुरुंगात गांधी आणि गीतेची परिक्षा झाली. त्यात मी पहिला आलोय. माझी पत्नी आशा आजारी असते. तिला आराम पडावा म्हणूनच मी देवाची प्रार्थना करतो. मला पत्नीबरोबर वेळ घालवायचाय. पण ते कधी जमणार माहीत नाही. आता दगडी चाळ डेव्हलप होऊन लोकांना घरं मिळाली की मला खरं समाधान मिळेल.

कारण माझ्या चाळीला काही पोलीसांनी आणि ठराविक मीडियाने बदनाम केलंय. त्यामुळे माझ्या चाळीतील रहिवाशांना खूप भोगावं लागलंय. विशेषतः तरुणांना नोकरीच्या वेळी खूपच त्रास झालाय. चाळकर्‍यांच्या उपकारातून मला उतराई व्हायची संधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पवार साहेबांनी दिलीय. आता फक्त लवकर घरं मिळायला हवीत.’ असा आशावादही साठीच्या वाटेवरचा हा डॉन व्यक्त करतोय. अरुण गवळीचं राहणीमान इतर डॉन सारखं मुळीच ग्लॅमरस नाहीय. किंवा त्याला बॉलीवूडचा चसका नाहीय. त्याच्या आयुष्यावर दोन चित्रपट बनले. एक दगडी चाळ आणि दुसरा डॅडी…यातला दगडी चाळ मधला मकरंद देशपांडे गवळीला भावला पण अर्जून रामपाल चा ’डॅडी’ त्याने अजून पाहिलाच नाहीय…अरुण गवळीच्या कंपनीचे आता पर्यंत शेकडो गुंड पोलीसांनी चकमकीत मारले. यात प्रामुख्याने कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील तरुण होते. सेना-भाजप युती सरकारच्या काळात गृहमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आदेशाने अनेकांना कंठस्नान घालण्यात आले. काहींच्या चुका होत्या, तर काही भरडले गेले. त्यांची कुटुंबं अक्षरशः रस्त्यावर आली. त्यांना गवळीने पेन्शन योजना सुरु केली. अनेकांच्या लेकी-बाळींची लग्नं गवळीने लावून दिली. श्रीकृष्णाचा भक्त असलेल्या डॅडीला पुढे पुढे हा खर्चाचा गोवर्धन पेलवेनासा झाला.

गरीबांच्या आयुष्यात गवळी रॉबिनहूड झाला होता . पण, पोरांना वाटायला लागलं हे अनावश्यक आहे. त्यातून अनेकांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या. कोण केबल, रेती, हॉटेल, वसूली, खंडणी, सिक्युरिटी मध्ये घुसले. गवळी गँग विभागतेय हे लक्षात येताच पोलीस आणि प्रतिस्पर्ध्यांनी डॅडीच्या पोरांची ’कामं’ काढली. कंपनीवरचा कंट्रोल सुटला. एव्हाना ८०-९० च्या दशकातले ’भाय’ उतरणीला लागले होते. जागोजागी बनलेल्या भाईंच्या मित्र मंडळांच्या विषयावर क्राईम ब्रँचने कामं सुरु केलं होतं. डॅडीच्या पोरांची पांगापांग झाली. कोण वाशी- पुण्यातल्या ’दादा’ला सरेंडर झाले तर कोण ठाण्यातल्या ’दाढी’ला शरण गेलेत. त्यातून आलेला दिवस ढकलायचा अशी परिस्थिती झाली. आता फिल्म इंडस्ट्रीपासून रिअल इस्टेट सगळंच ’कॉर्पोरेट’ झालंय. त्यांना डायरेक्ट भायगिरीची गरज नाहीये. एक अख्खी पिढी बदलली. त्यामुळे अंडरवर्ल्डचा बाज पण बदलतोय. साहजिकच या दुनियेतले अनेक ’वाल्या कोळी’ आता ’वाल्मिकी’ व्हायच्या वाटेवर लागलेत… पण आता उशीर झालाय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -