घरफिचर्ससारांशवेब 3.0 : खूप बदल होणार आहेत... खूपच...

वेब 3.0 : खूप बदल होणार आहेत… खूपच…

Subscribe

वेब 1.0 येऊन गेले. वेब 2.0 आपण सगळे सध्या अनुभवतो आहोत आणि वेब 3.0 च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्यांना या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांच्यासाठी थोडंसं मागे वळून पाहू. वेब 1.0 हा इंटरनेटच्या सुरुवातीचा टप्पा होता. यामध्ये वेबसाईट सुरू करणे एवढेच प्रमुख काम होते. बेसिक एचटीएमएल कोडिंगच्या साह्याने वेबसाईट सुरू केल्या गेल्या आणि डिजिटलच्या दुनियेत प्रत्येकाने आपले पाऊल ठेवले. याच काळात ई-मेलही आले. जीमेल अकाऊंट काढणे म्हणजे त्यावेळी एखादे रुबाबदार काम केल्यासारखे वाटायचे. त्यावेळी कोणीही उठून जीमेल अकाऊंट सुरू करू शकत नव्हता. ज्याच्याकडे जीमेल आयडी आहे, त्यांनी निमंत्रण पाठवले, तर त्या लिंकच्या आधारेच समोरच्या व्यक्ती स्वतःचे जीमेल अकाऊंट सुरू करू शकायचा. हे मी साधारण 2004-05 मधील सांगतो आहे.

वेब 1.0 जाणार आणि 2.0 येणार हे 2008-09 च्या सुमारास दिसायला लागले. वेब 1.0 आणि वेब 2.0 यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे संवादात्मकता अर्थात इंटरक्टिव्हिटी. केवळ आम्ही सांगू तेवढेच ऐका आणि शांत राहा, हे काही बरोबर नाही. तुम्हाला तुमची मते मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. याला वेब 2.0 मुळे मूर्त रूप मिळाले. त्यातूनच मग सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सची निर्मिती झाली. माहिती मिळवण्यासाठी फक्त माध्यमांवर अवलंबून राहणे कमी होऊ लागले. निर्णय घेणार्‍यांकडून, सेलिब्रिटींकडून थेटपणे माहिती सामान्य लोकांपर्यंत जाऊ लागली. सोशल मीडियामध्ये त्या माहितीवर चर्चा होऊ लागली आणि याच चर्चेचे टोक आता ट्रोलिंगच्या माध्यमातून गाठले गेले. एकेकाळी जाहीर सभांमधून जे साध्य केले जायचे ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यावर सगळेच राजकीय पक्ष जोर देऊ लागले आहेत. डिजिटल मीडियाकडे आता कोणीच दुर्लक्ष करू शकणार नाही, इथपर्यंत परिस्थिती आली आहे. पण सगळं इथेच थांबणार नाही. कारण वेब 3.0 ची सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

वेब 2.0 चे जसे फायदे होते तसे काही तोटेही. यामध्ये तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म्सचा भाग असणे आवश्यकच होते. तुम्ही फेसबुकवर नसाल, ट्विटरवर नसाल, इन्स्टाग्रामवर नसाल, शेअरचॅटवर नसाल, युट्यूबवर नसाल तर तुम्ही जनसमूहापर्यंत पोहोचणार कसे, असा प्रश्नच उभा राहायचा. कारण या प्लॅटफॉर्म्सनी सर्वात आधी काय केले तर जास्तीत जास्त लोक आपल्याकडे असतील, ते आपल्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टिव्ह असतील, अधिकाधिक वेळ ते आपल्या प्लॅटफॉर्मसाठी देतील, यावर लक्ष दिले. या माध्यमातून पैसे कमावणेही अनेकांसाठी शक्य झाले, पण त्याचे नियम आपण ठरवू शकत नव्हतो.

ते नियम या कंपन्या ज्यांच्या मालकीच्या आहेत तेच ठरवायचे. तुम्हाला भलेही ते पार्टनर म्हणून संबोधत असतील. पण पार्टनरशीपचे सगळे नियम तेच ठरवायचे आणि तुम्ही फक्त ते नियम पाळायचे एवढेच होत होते आणि होत आहे. जर तुम्ही नियम ओलांडून काही केले तर तुमचे प्लॅटफॉर्मवरील स्थानही डळमळीत होणार आणि उत्पन्नही बंद होणार. कारण प्लॅटफॉर्म जरी तुमच्यासाठी तयार केला असला तरी तुम्हाला कोणापर्यंत, कधी आणि किती वेळात पोहोचवायचे हे सर्वस्वी त्यांनी आपल्या हातात ठेवले. अल्गोरिदम नावाने ज्याची चर्चा सुरू असते ते याचाच एक भाग. तुम्हाला दाखवणेच कमी केले किंवा बंद केले तर लाईक, फॉलोअर्स, शेअर्स आणि पैसे कसे मिळणार हा प्रश्नच आहे.

- Advertisement -

वेब 3.0 हे सध्याच्या तुलनेत खूपच क्रांतिकारक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वेब 3.0 मध्ये कोणत्याही एका कंपनीच्या हातात नियम ठरवण्याचे अधिकार नसतील. मुळात कोणती एक कंपनी सोशल मीडिया नियंत्रित करते आहे, असे होण्याची शक्यता फार कमी आहे. डिजिटल मीडियाचे विकेंद्रित स्वरुप आणि अधिकाधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हेच वेब 3.0 चे वैशिष्ठ्य असणार आहे. आपण सगळी मेहनत करायची आणि आपला आशय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वैयक्तिक मालकीच्या त्रयस्थ प्लॅटफॉर्मची मदत घ्यायची, असे या रचनेत करावे लागणार नाही. त्यामुळे आपल्या उत्पन्नातील फार मोठी हिस्सेदारीही कोणाला द्यावी लागणार नाही. ज्या प्लॅटफॉर्मवर आपण आपला आशय उपलब्ध करून देत आहोत, तो प्लॅटफॉर्मही आपलाच असेल. खर्‍या अर्थाने आपण या व्यवस्थेत पार्टनर म्हणून कार्यरत राहू.

सध्याच्या व्यवस्थेत सोशल मीडिया कंपनीला वाटले म्हणून एखादा निर्णय घेतला जातो आणि मग तो निर्णय युजर्ससाठी कसा गरजेचा आहे हे पटवून दिले जाते. वास्तविक युजर्सपेक्षा सोशल मीडिया कंपन्या स्वतःच्या फायद्याचा विचार आधी करतात. तसे वेब 3.0 मध्ये होणार नाही. कारण इथे कोणा एका व्यक्तीला किंवा खासगी कंपनीच्या मॅनेजमेंटला वाटले म्हणून काही होणार नाही. लोकशाही व्यवस्थेप्रमाणे एका मोठ्या समूहाला वाटले तर त्याची अंमलबाजवणी होऊ शकते.

क्रिप्टोकरन्सी हे याच वेब 3.0 चे रुप. कोणत्याही भौगोलिक सीमा नाहीत. कोणी कुठूनही कुठल्याही क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करू शकतो. आता आपले सरकार यावर काही निर्बंध आणणार असे सांगितले जात असले तरी त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही आणि हे सगळे सरकार कुठवर जाऊन रोखणार हासुद्धा प्रश्नच आहे. कारण टोकन पद्धती ही येत्या काळात डिजिटलमधील सर्वात मोठी व्यवस्था असेल. सोशल मीडियावर काही प्रमाणात त्याला सुरुवातही झाली आहे. येत्या काही वर्षांमध्ये आपल्यापैकी अनेकांना त्यांची स्वतःची व्हर्च्युअल कम्युनिटी तयार करता येऊ शकते. या कम्युनिटीत व्यवहार कसे होतील, त्याचे टोकन काय असेल हे तेच ठरवू शकतील. थोड्या प्रमाणात का होईना याची सुरुवात झालेली आहे.

वेब 3.0 ने उपलब्ध करून दिलेल्या या नव्या संकल्पनेबद्दल, सध्याच्या व्यवस्थेला हादरवून टाकणार्‍या तंत्रज्ञानाबद्दल पुढील लेखात जाणून घेऊया. तोपर्यंत एवढेच लक्षात ठेवा की खूप बदल होणार आहेत आणि त्याची सुरुवात झालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -