Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश वेब सिरीजचा विळखा!

वेब सिरीजचा विळखा!

Subscribe

वेब सिरीजमध्ये काही सिन असे दाखवले जातात, की जे प्रत्येकजण बघू शकत नाही किंवा बघणार्‍याचा हाच गैरसमज होतो की हीच लाईफ आहे, हीच आजकालची फॅशन आहे, पण मला कळकळीने सांगावसं वाटतं, की ही असली फॅशन आत्मसात करू नका. मनोरंजनासाठी तुम्ही हे बघा, पण हे केवळ आपल्या मनोरंजनासाठीच फक्त बनवलंय याची जाणीव ठेवा. काय बघायचं आणि काय सोडायचं किंवा त्यातून काय अर्थ घ्यायचा हे ठरवा. कारण वेबसिरीजमध्ये वाहून जाण्याचा धोकाही असतो, हे लक्षात ठेवा.

–अर्चना दीक्षित

गेली काही वर्षे आपण बघतोय आजकाल वेब सिरीजचा जमाना आलाय. जमाना काय फॅशनच म्हणाना. वाईट काहीच नाही. आपल्याच मनोरंजनासाठी हे विविध उपक्रम पुढे येत आहेत तितकच खरं आहे आणि या वेब सिरीज एकच काय पण अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत असतात. बाहेरच्या देशातल्या वेब सिरीज, बाहेरच्या विविध भाषांमधल्या वेब सिरीज या आजकाल खूपच प्रचलित झाल्या आहेत किंवा त्याची खूपच फॅशन सुरू झाली आहे.

- Advertisement -

इंग्रजी, इटालियन, स्पॅनिश, जर्मनी अहो एक काय अनेक भाषांमध्ये या वेब सिरीज बनत आहेत आणि विविध विषय निवडून त्यावर काही एपिसोड्स बनवले जातात आणि मग गरजेनुसार त्यांचं भाषांतरही केलं जातं. जेणेकरून इतर भाषिकांना त्या समजाव्यात किंवा त्या बघता याव्यात. यानुसारच आपल्या देशातदेखील या वेब सिरीजची फॅशन फारच मोठ्या प्रमाणात पसरत आहे असे दिसते. आपल्या देशात भाषा तर अनेक आहेतच, तर जवळजवळ प्रत्येक प्रांतात त्या त्या भाषेनुसार वेब सिरीज बनत आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. एवढेच काय मगाशी लिहिल्याप्रमाणे त्यांचं भाषांतरही फार मोठ्या प्रमाणात होत आहे. जेणेकरून त्यांची वेब सिरीज जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचावी.

यात घरगुती विषयांपासून ते देशभक्तीपर्यंतचे अनेक विविध विषय हाताळण्यात येतात. याप्रमाणेच काही हसवणारे, काही सिरीयस, तर काही रहस्यमय असेदेखील विषय या वेब सिरीजचे असतात. हे विषय लोकांपुढे मांडण्यासाठी नक्कीच खूप मोठा अभ्यास करावा लागतो आणि तो करतही असतील. जेणेकरून या वेब सिरीज घरातील प्रत्येकजण बघू शकेल. असेदेखील विषय मांडण्याचा प्रयत्न असतो. लहान मुलापासून ते मोठ्या अगदी आजी-आजोबांपर्यंत विविध स्तरावर हे विषय पोहोचावेत, यासाठी या वेब सिरीजची निर्मिती होत असते.

- Advertisement -

नाही हो मनोरंजनाच्या या माध्यमांवर आक्षेप घेणारी मी कोण? पण कधी कधी एवढं मात्र नक्कीच वाटतं. त्यातलं जे कंटेंट आहे, ते महत्त्वाचं. विषय चांगला असतो, पण कंटेंट मांडण्यात कुठे काही गफलत होते का? असाही विचार करायला या वेब सिरीज भाग पाडतात. म्हणजे विषय चांगला असतो, हो पण कंटेंट किंवा त्या वेब सिरीजमध्ये वापरलेली भाषा ती कोणाची असो, लहान मुलाची असो किंवा मोठ्या नटाची असो, ती भाषा योग्य आहे की नाही, याचा थोडासा विचार करायला पाहिजे असं मनापासून वाटतं. मी सगळ्याच वेब सिरीजबद्दल हे मत मांडत नाहीये, पण काही वेब सिरीज अशा असतात, की जिथे आपण वापरलेल्या भाषेचा योग्य वापर केला पाहिजे, असं मला वाटतं.

कारण काय या वेब सिरीज बघून कित्येकांना वाटतं सध्या अशीच भाषा प्रचलित आहे. असेच अपशब्द प्रचलित आहेत. ते अपशब्द वापरणे म्हणजे ‘वी आर कूल’ असं मानलं जातं नाही, तर ‘यु आर सो आऊट डेटेड’ असं म्हणणारेही आहेत. लहान लहान मुलांनादेखील वाटतं की असे काहीतरी अपशब्द युज केले किंवा वापरले म्हणजे आपण कूल ड्यूड आहोत, असा त्यांचा एक गोड गैरसमज झालेला दिसून येतो. त्यामुळे शाळांमध्ये किंवा आपापसात खेळताना ही लहान मुलंदेखील असे काहीतरी अपशब्द वापरतात आणि त्यांना विचारलं हे कुठलं वापरता रे हे कुठून ऐकता असे शब्द तर त्यांचे उत्तर साहजिकच असतं मग काय टीव्हीवर बघितलं होतं ना, ते त्याच्यात ते असंच म्हणतात.

एवढेच काय तर काही सिन पण असे दाखवले जातात, की जे प्रत्येक जण बघू शकत नाही किंवा बघणार्‍याचा हाच गैरसमज होतो, की हीच लाईफ आहे, हीच आजकालची फॅशन आहे, पण मला कळकळीने सांगावसं वाटतं की, ही असली फॅशन आत्मसात करू नका. मनोरंजनासाठी तुम्ही हे बघा, पण हे केवळ आपल्या मनोरंजनासाठीच फक्त बनवलंय याची जाणीव ठेवावी. असं नाहीये, पण काय बघायचं आणि काय सोडायचं किंवा त्यातून काय अर्थ घ्यायचा याची जाणीव नक्कीच ठेवा.

अशाप्रकारच्या वेब सिरीज बनवताना त्या बनवणार्‍यांनीदेखील काळजी घेतली पाहिजे आणि बघणार्‍यानेदेखील योग्य काळजी घेतली पाहिजे एवढंच मला मनापासून वाटतं हो. या वेब सिरीज बघताना, विशेषत: पालकांनी आधी त्याचा गुगल मातेकडून थोडासा सारांश घेतला, तर योग्य माहिती मिळू शकते. थोडेसे ट्रेलर बघून म्हणा, या विषयावर माहिती गोळा करून, वेब सिरीजविषयी थोडी माहिती मिळू शकते आणि त्यानुसार ही वेब सिरीज बघायची की नाही हे ठरवणं तितकंच गरजेच असतं. विशेषत: जेव्हा आपण एखादी वेब सिरीज आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर बघणार असू, त्यावेळेस याची जाणीव ठेवणं हे महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. आपलं काय मत आहे हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.

- Advertisment -