व्हावे लहानाहून लहान …

माणूस मोठा झाला की त्याच्या मनावर विकारांची पुटे चढत जातात. ही पुटे मूर्तीवरील शेंदरासारखी पुन्हा खरडून काढता येतात का? मूळ निरागस रुपात आपणास येता येते का? हे मात्र विकारशून्य झाल्याशिवाय सांगता येत नाही. तो अधिकार मिळवणारे महात्मे तसे खूपच दुर्मिळ. पण असे महात्मे होऊन गेले हे मात्र खरे. त्यांच्याकडे पाहिले की लहान मुलांची निरागसता आपल्या पुढ्यात मूर्तिमंत होते. भगवान बुद्ध, महावीर, ज्ञानोबा, तुकाराम यांच्या ध्यानस्थ रूपातून मला नेहमीच अशी लहान मुलांची निखळता भेटत आलीय.अहंतेचा कोणताही दर्प नसलेले हे बालपण झुळझुळणार्‍या निर्झरासारखेच प्रवाही आणि नितळ असते.

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, असे आपण नेहमीच ऐकत आलेलो. किंबहुना, हे निरागस रूप म्हणजे ईश्वराचेच प्रतीक. लहान मुलांइतकी निरागसता कोणात बरे दिसेल? याचे कारण म्हणजे त्यांना लाभलेले सर्वांगसुंदर बालमन. बालपण आणि बालमन या आपल्या आयुष्यातील नितांत सुंदर, खेळकर, निर्व्याज अवस्था. कसलेच टेन्शन नाही. निखळ वर्तमानात जगणे हे बालमनाची आणि बालपणाची सर्वांगसुंदर अवस्था. त्यामुळेच आपल्या जीवनातून ही अवस्था निघून गेली तरी कायमच या अवस्थेचा हेवा वाटत रहातो. बालपण पुन्हा-पुन्हा अनुभवावे वाटते. यातून आपले महात्मेही सुटले नाहीत. तुकोबांसारख्या संतानाही पुन्हा या अवस्थेचा हेवा वाटून या अवस्थेतील साखरेचा रवा पुन्हा चाखावा वाटला. लहानपण देगा देवा..असे म्हणत या अवस्थेला त्यांनी साद घातली. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, असे म्हणत या थोरपणातील निर्मम यातनांचे दर्शनही त्यांनी घडवले.

माणूस मोठा झाला की त्याच्या मनावर विकारांची पुटे चढत जातात. ही पुटे मूर्तीवरील शेंदरासारखी पुन्हा खरडून काढता येतात का? मूळ निरागस रुपात आपणास येता येते का? हे मात्र विकारशून्य झाल्याशिवाय सांगता येत नाही. तो अधिकार मिळवणारे महात्मे तसे खूपच दुर्मिळ. पण असे महात्मे होऊन गेले हे मात्र खरे. त्यांच्याकडे पाहिले की लहान मुलांची निरागसता आपल्या पुढ्यात मूर्तिमंत होते. भगवान बुद्ध, महावीर, ज्ञानोबा, तुकाराम यांच्या ध्यानस्थ रूपातून मला नेहमीच अशी लहान मुलांची निखळता भेटत आलीय.अहंतेचा कोणताही दर्प नसलेले हे बालपण झुळझुळणार्‍या निर्झरासारखेच प्रवाही आणि नितळ असते.

असे मन सदैव लाभणे आपल्या भागध्येयात नसले तरी आपल्यातील चांगुलपणाच्या, संवेदनेच्या पार्श्वभूमीवर ते जपता येते. अशी किती तरी मोठी माणसे होऊन गेलेली. लहान मुलांत ती खूप रमायची, आपले थोरपण विसरून लहान व्हायची. लहान होण्यासाठी एक नाममात्र अट असते. तिथे आपल्या मनातील मोठेपण, अहंता, गर्व, विकार सांडून द्यावे लागतात. आपल्या स्वरूपाशी रत व्हावे लागते. हे सहजी जमणारे नसते. कारण माणसे आपल्या कोशात मश्गुल असतात. आपल्या तथाकथित अहंतेला इतके कुरवाळत असतात की याने त्यांच्यातील सहजता, स्वाभाविकता हरवलेली असते. अशी स्वाभाविकता हरवलेली माणसे मला मुखवट्याप्रमाणे भासतात. ती हसत नाहीत, रुसत नाहीत, रडत नाहीत, बोलत नाहीत.

काही वर्षापूर्वी एका अंत्ययात्रेला मी गेलेलो. हा लेख लिहिताना नेमका तोच प्रसंग आठवतोय. अशी आपल्या मनात स्मरण साखळी असतेच ना? तर एका लहान भावाचा अंत्यविधीसाठी मोठा भाऊ दुसर्‍या शहरातून आलेला. तो प्रतिष्ठीत, त्याच्या शिस्तीची, विद्वत्तेची, थोरपणाची महती सर्वदूरपर्यंत पसरलेली. त्यामुळे तो भावाच्या अखेरच्या प्रवासातही त्याची ही प्रतिमा सांभाळताना दिसत होता. त्याच्या चेहर्‍यावर ना दु:खाची रेष दिसत होती, ना स्मृतींचा लवलेश. हिमालयाच्या शिखरावरील बर्फासारखा त्याचा थंड चेहरा. कपड्यांची घडीही मोडू न देता तो इथे सहभागी झालेला. असे म्हणतात की हिमालय कितीही उंच असला तरी त्याच्या बर्फाछादित शिखरावर कोणतेही झाड उगवत नाही. पायथ्याशी मात्र किती हिरवळ असते? असेच नेहमी माणसाला जमिनीवर राहता आले पाहिजे. मी विचार केला. हे दोन भाऊ, लहानपणी एकत्र वाढले असतील.

किती खेळले बागडले असतील. एकत्रच मोठे झाले असतील. आईच्या हातचा दुधभात दोघांनीही एकाच ताटात खाल्ला असेल. हे या क्षणी आठवत नसेल का? नाही हुंदका, पण आतून गलबलून तर येत असेल ना? असा उमाळा, दु:खाचा कढ दाबता येतो का? रडावे वाटते पण? रडता येत नाही. लोक काय म्हणतील ? आपल्या इमेजला ते शोभते का? या प्रसंगी माणूस असा विचार करतो का? की याला उच्चतम आध्यात्मिक अवस्था समजायचे. पण मग ज्ञानोबांच्या समाधीला शिळा लावताना तिथे उपस्थित असलेल्या निवृत्तीसह सकळ संताची काय अवस्था झाली होती, याचे वर्णन संत नामदेवांनी किती उत्कटतेने लिहून ठेवलेय. त्याचे काय? त्यांनाही हा विरह, हा वियोग सहन झाला नाही, तर सामान्य माणसांचे काय? पण माणसे आपले सत्व, आपले माणूसपण विसरून इतके प्रौढ होतात की जगण्यातील स्वाभाविकता हरवून बसतात. शिखरावर पोहचल्यावर पायथ्याचा विसर पडलेला असतो तो असा.

‘लहानपण देगा देवा’ हा संत तुकारामांचा अभंग कालजयी असाच. कोणत्याही काळात तो तितकाच सुंदर आणि संवादी. एका महाकवीच्या प्रतिभेतून अभिव्यक्त झालेले हे काव्य म्हणजे मानवी जीवनाच्या आणि मनाच्या आनंदी जगण्याचे महासुक्तच जणू! पंडित कुमार गंधर्वांच्या आवाजातून हा अभंग ऐकणे म्हणजे तर परमानंद ! अर्थाचे अनेक पदर उलगडत तुकोबा किती सहज संवादित होतात. लहान असणे म्हणजे सर्वसुखाशी समरसून जाणे. जी एक मुंगी साधू शकते ते ऐरावतालाही साधत नाही. मुंगीसाखरेचा रवा चाखायचा असेल तर हे मुंगीचे लहानपण आपल्या अंगी बाळगायला हवे. ही प्रतीकात्मता किती अर्थपूर्ण. परंतु जगण्याच्या गतिमानतेत असे लहान होणे माणूस विसरून गेलेला. किंवा प्रौढत्वाची झुल पांघरल्यावरही असे होत असेल. चारचौघात गंभीर मुखवटा चढवून वावरावे लागते, पण ही हूल असते हेच माणूस विसरतो.

मुळात विश्वाच्या या पसार्‍यात माणूस लहानच असतो. एक मात्र खरे की माणूस जेव्हा परस्वाधीन जरठ होतो तेव्हा त्याचे हे लहानपण अगदी उफाळून बाहेर आलेले असते, परंतु या संध्याछायेत जगण्यातला आनंद संपलेला असतो. त्यामुळेच आपले केशवसुत खूप मार्मिक सार सांगून गेले आहेत. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असे बाणेदारपणे म्हणणारे केशवसुत एकूणातच प्रतिभावंताच्या भावविश्वाबद्दलच बोलत होते. आनंद देणे आणि घेणे हे निरागस मनाचेच श्रेयस असते. म्हणून तर बालकांच्या सहवासात आपण फुलून जातो.आनंदी होतो. लहान मुलं आवडत नाहीत अशी माणसे असतील का? संवेदनाक्षम माणूस या आनंदास पारखा नसतो. मी कित्येक मोठी माणसे लहान मुलात लहानाहून लहान झालेली पहिली आहेत. मोठ्यापेक्षा लहानात मिसळणे तसे अवघड असते.

कारण इथे मुखवटा बाजूला सारावा लागतो. ही बाब तशी अवघड असते. सर्वांनाच ते शक्य नसते. लहान मुलांना शिकवणे तर कॉलेजातील मुलांपेक्षा मला नेहमीच अवघड वाटत आलेय. किती निरागसतेने सामील झालेली असतात ती मुले? संकोच, भीती, लाज, अपराधीभाव, असे कोणतेच गंड तिथे नसतात.असतो तो केवळ आणि केवळ निखळ आनंद. त्यांच्या हासण्या इतकीच रडण्यात ही एक निरागसताच असते. त्यांना उद्याची फिकीर नसते. चालू वर्तमान त्यांना महत्वाचा असतो. प्रौढ माणसांना मात्र वर्तमानात जगण्यासाठी उसने सल्ले, पुस्तकी ज्ञान घ्यावे लागते. जे आपल्यात असतेच; परंतु मधल्या अवस्थांतरामध्ये आपण ते विसरलेलो असतो. म्हणूनच वर्तमानापेक्षा भूत-भविष्याच्या हिशोबात प्रौढ माणसे आपला वर्तमान हरवून बसतात. हा हरवलेला वर्तमान पुन्हा आनंदी करता येतो. त्यासाठी तुकोबांच्या या शब्दांच्या वाटेवर जायला हवे. तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान । तेव्हाच ते निरागस मन आपणास पुन्हा भेटण्यास पुढ्यात उभे असते.

–डॉ.अशोक लिंबेकर