अंधारगुहेतील अंधारवाटा !

‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ या नाटकातील माणसं रोज गटारगंगेत उतरतात, त्यांना त्यांची भाकरी गटारातून मिळवावी लागते, या ठिकाणीही कामाचा एक्सपिरियन्स लागतो, नाही म्हणायला ‘हातभट्टीची चपटी’ मारून मोठ्या शहरातल्या डंपिंग ग्राऊंडवर कचर्‍याच्या डोंगरापालिकडे उगवणारा सूर्य डोळ्यात साठवण्याची ताकद असणार्‍यांनाच इथं काम मिळतं. पण मॅनहोल आणि गटारात सूर्य किरणांचा संबंध नसतो. या सफाई कामगार म्हणून नाव दिलेल्या माणसांच्या तुलनेत दुसर्‍या महायुद्धात डोकं नि भुवया भादरून हिटलरच्या छळछावणीत राहिलेल्या, आणि वर्षानुवर्षे प्रकाश कवडशांच्या शोधात या अंधारकोठडीतल्या छळछावणीतून सुटकेचा धूर सोडणार्‍या गॅस चेंबरच्या चिमणीकडे आशाळभूतपणे पाहणारे थोडे तरी सुदैवी म्हणावे लागतील.

‘अंधे जंहा के अंधे रास्ते’ची लेखिका उर्मी अतिशय निर्दय असते. ती प्रेक्षकांच्या बकोटीला धरून या नाट्यानुभवाच्या मॅनहोलमध्ये प्रेक्षकात रांगेत बसलेल्या एकेकाला ढकलत जाते आणि मग मॅनहोलचं लोखंडी झाकण दाणकन आपटून बंद करते, आता पुढचे पावणे तीन तास या घुसमट (बर्‍यापैकी पांढरपेशी चांगला साहित्यिक शब्द) त्याही पलिकडे नरक, मिथेन वासाची अंधारगुहा (मानवी विष्ठा पुन्हा साहित्यिक प्रमाण शब्द ) काहीही म्हणा….चालतंय, मात्र उर्मी त्याला नाटकातल्या माणूस असून नसलेल्यांच्या संवादात थेट, गू, गदळ असं म्हणते…ती मराठी संस्कृती, भाषेसोबत प्रेक्षकांनाही ही वेदना उजागर करणारा शब्द दिला नसल्यानं माफ करत नाही….नाही म्हणायलाही माणसांनीच खोदलेल्या अंधार्‍या जमिनी खालच्या नरकात उतरलेल्या माणसाची ‘सैतानी अवमूल्यनता’ मांडणारा पर्यायी शब्द मराठीत तरी सापडत नाही, फार फार किंवा त्याहीपलिकडे ढसाळच्या गोलपीठातली ‘माणसांची असोशी वाहणारी गटारांचं’ नाटक असं ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ ला म्हणता येईल.

ही गटारं जमिनीखाली सरळ रेषेत जुन्या दक्षिण मुंबईतल्या कामगार वस्त्यांमधल्या बावडीसारखी लंबगोलाकृती नसतात, ती खाली तिरपी, वक्राकार, अनेक तोंड फुटलेल्या अजगरासारखी वेडीवाकडी होत जातात. हा अजगर सफाई कामगार नावाच्या ‘खिजगणतीतही माणूस नसलेल्या’ माणसांना सकाळी रोज गिळतो आणि रात्री शेपटीखालच्या पार्श्वभागातून विष्ठा बनवून टाकून देतो. ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ नाटकातली माणसं लहान मुलाच्या संडासात वळवळणार्‍या हट्टी जंतासारखी असतात. जे औषधं घेऊनही पोटात मरत नाहीत. या जंतांचं जगणं, झोपणं, वागणं, राहाणं, बोलणं, खाणं, पिणं सगळंच मानवी विष्ठेच्या भवतालानं भरलेलं असतं. ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’तली माणसं रोज गटारगंगेत उतरतात, त्यांना त्यांची भाकरी गटारातून मिळवावी लागते, या ठिकाणीही कामाचा एक्सपिरियन्स लागतो, नाही म्हणायला ‘हातभट्टीची चपटी’ मारून मोठ्या शहरातल्या डंपिंग ग्राऊंडवर कचर्‍याच्या डोंगरापालिकडे उगवणारा सूर्य डोळ्यात साठवण्याची ताकद असणार्‍यांनाच इथं काम मिळतं.

पण मॅनहोल आणि गटारात सूर्य किरणांचा संबंध नसतो. या सफाई कामगार म्हणून नाव दिलेल्या माणसांच्या तुलनेत दुसर्‍या महायुद्धात डोकं नि भुवया भादरून हिटलरच्या छळछावणीत राहिलेल्या, आणि वर्षानुवर्षे प्रकाश कवडशांच्या शोधात या अंधारकोठडीतल्या छळछावणीतून सुटकेचा धूर सोडणार्‍या गॅस चेंबरच्या चिमणीकडे आशाळभूतपणे पाहणारे थोडे तरी सुदैवी म्हणावे लागतील. त्यांच्यासाठी विषारी गॅस सोडून छळसुटका करण्याचा पर्याय असतो. या कामगारांचं रोजचं जगणंच गटारी, मॅनहोलचा विषारी गॅस छातीत भरून घेऊन असतं. सिग्रेट बिडीसोबत विषारी गॅस छातीत भरल्यानं छातीचा धूर, गॅस भरलेला पोकळ खोका झालेला असतो, गटारात उतरताना अशा छातीत जगण्याचा दम भरणं खूपच कठिण असतं, मात्र ही माणसं विषारी गॅसचा उच्छवास टाकून रोजच्या रोज उमेदीच्या जगण्याचा दम भरतात. या मॅनहोलच्या बंदिस्त झाकणाच्या छिद्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रवर्तन, परिवर्तनाचा एक कवडसा त्यांच्यापर्यंत येऊ पाहतो, हा एकमेव प्रकाश किरण त्यांच्या आंधळ्या अंधारगुहेला माणूस म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रकाशात बदलू शकतो.

जमिनीखालच्या घाणीत प्राण्यांपासून ते ‘सफेदपोश’ माणसांच्या पार्श्वभागातून सोडल्या जाणार्‍या मरणाशी रोजच्या रोज लढणार्‍या या सफाई कामगारांना माणूस म्हणायला मात्र मॅनहोलच्या पृष्ठभागावर वसलेला पांढरपेशी माणसांचा समुदाय परवानगी देत नाही. मग नाईलाजानं पुन्हा त्याच गटारात वळावं लागतं, या मॅनहोल आणि गटारातही पृष्ठभागावर राहाणार्‍या माणसांसारखाच किड्या, अळी, उंदीर घुशींचा समाज असतो, अरेरे… हे काय जगणं, वाईट आहे हे…‘हाऊ डर्टी पिपल्स आर धिस’ असं म्हणणारा हा समाज नसतो. या जमिनीवरच्या माणसांच्या शहराने जमिनीखाली वाढवलेल्या वेड्यावाकड्या वाढलेल्या या गटारजगराच्या पोटात विविध प्रकारच्या अळ्या असतात, गोम, उंदीर, घुशी, वळवळणार्‍या किड्यांच्या नामदेवच्या कवितेतल्या ‘माणसांची करुणा भाकणार्‍या आणि असोशी वाहणार्‍या’ वसाहती असतात, विविधरंगी डासांचा समाज असतो तर झुरळांचं हत्यारबंद सैन्य असते, ही मंडळी माणसांवर एकजात हल्ले करतात, जमिनीखाली पाताल लोकांत सुरू असलेलं हे युद्ध ‘अंधे जहा के, अंधे रास्ते’ च्या प्रयोगात पाहता अनुभवता येतं, पण या नरकाबाहेरची वसुंधरा म्हणून ओळखली जाणार्‍या सुंदर हरित, छान छान भूपृष्ठावर राहणारी सफेदपोष दुनिया या नरकातल्या किड्यांपेक्षा जास्त विषारी असते. गटारातला किडा चावल्यावर, सळई लागल्यावर झालेली जखम चिघळून बरी होते किंवा अखेरीस हात पाय कापायला लावते.

मात्र माणूस नावाचा परंपरावादी, जातीयवादी, संस्कृतीवादी आणि माणूसवादी म्हणवून घेणारा विषारी किडा समाज नावाच्या वसाहतवादी गटारीत या सफाई कामगार माणसांना हळूहळू आतून पोखरत असतो. हे पोखरण माणसांकडून माणसांसच सुरू असतं, या हळुवार पोखरण्यामुळे मनुष्याच्या मन मेंदू आणि शरीरावर झालेली चिघळवलेली जखम लेखिका आणि दिग्दर्शक उर्मी नाट्यगृहात खुली करते. ती या जखमेवरचे पट्टीचे एकेक पदर नाटकातल्या मंचावरच्या पडद्यासारखी बाजूला सारत जाते. या दोन प्रवेशामध्ये असलेला काळाकुट्ट ब्लॅकआऊट आणि मॅनहोलमधला अंधार यात फरक राहात नाही. अंधे जहाँ के अंधे रास्तेची लेखिका आणि दिग्दर्शक आणि सर्वच कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकार्यांचं हे यश आहे. बाई आणि पुरुषाच्या देहाला विशिष्ट प्रकारचा गंध निसर्गानं बहाल केलेला असतो, त्यामुळे सहवास, लैंगिकतेतून नवनिर्मितीसाठी नर मादींना तो आवश्यक असतो. अंधे जहाँ के नाटकातल्या सर्वच बाई माणसांना केवळ आणि केवळ गदळाचाच वास मारतो, त्यामुळे बाई आणि माणसातले शृंगारिक, मोगर्‍याच्या सुगंधीत रोमँटीसिझमचे सगळेच नियम निकालात निघतात आणि केवळ शरीराची गरज मागे उरते.

नाटकाच्या सुरुवातीला मॅनहोलमध्ये गदळ उपसणार्‍या नामदेवाला गटारीत सळई लागून झालेल्या जखमेच्या दुर्गंधी वेदनेतून प्रेक्षकांची सुटका होत नाही, मग नामदेवासोबतच गटारीच्या हातभट्टी दारूचा अनेस्थेशिया ताबडतोब नामदेवला दिला जात असताना प्रेक्षक त्याच्या नशेने थोडा थोडा बधिर होत जातो, हे खर्‍या अर्थानं बधिर होणं नसतं, खरं तर प्रेक्षक माणूस म्हणून थोडा थोडा मरत असतो किंवा मेलेला असतो, अंधे जँहा के… हे नाटक मरणार्‍याला खसकन केस ओढून या नशेतून जागं करतं आणि शुद्धीवर आणतं. ज्या वस्ती, शहरात आजही माणसांचा मैला डोक्यावरून वाहून नेला जातो. त्या शहरातली माणसं कधीचीच मेलेली असतात, हे माणसांचं जिवंत स्मशान लेखिका उर्मी ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ या नाटकातून दाखवते. या स्मशानात इतरांची चिता पेटवायलाही कुणी जिवंत नाही, इथली वस्ती आंधळी, रस्ते आंधळे, माणसंही ठार आंधळी झालेली असतात.

प्रकाशाचा लवलेश नसलेला हा भेसूर काळोख नाट्यगृहाच्या काळोखात मिसळल्यावर प्रेक्षक नावाच्या माणसाची यातून सुटका होत नाही, लेखिका उर्मीनं नाट्यगृहाचं मॅनहोल बनवून त्याचं झाकण घट्ट बंद केलेलं असतं..अडीच तीन तासांनी नाटक संपल्यावर हे झाकण उघडल्यावरही हा काळोख मनात साचलेला असतो आणि भवतालचं जग हे भेसूर गटार झाल्याचं या अंधारातही स्पष्ट दिसू लागतं… या गटारातला अंधार कवडश्यांचा खेळ गडदपणे रंगवण्यात प्रकाशयोजना करणार्‍याचं कौतुक, पार्श्वसंगितातल्या जाणिवांचे भेसूर आवाजाचे सूर बनवणार्‍या संगीत संयोजनाची जाणीव जिवंत करण्यात मोलाचा वाटा आणि मंचावर नाटकातल्या अंधारात हरवलेला माणूस म्हणून कधीच्याच मेलेल्या व्यक्तीरेखांच्या जिवंत सावल्या उभ्या करणा-या सर्वच अभिनेत्यांमुळे हा जिवंत अनुभव अंगावर येतो, हेच अंधे जहाँ के अंधे रास्ते नाटकाचं यश…निश्चितच स्वतःला माणूस समजणार्‍या हरेक माणसाने पाहायला हवं.