घरफिचर्सबदलाचा आत्मशोध !

बदलाचा आत्मशोध !

Subscribe

थिएटर ऑफ रेलेवन्सचा३ दशकांचा नाट्यप्रवास...

सायली पावसकर आणि तिचे सहकारी प्रभावी अभिनय करत असताना तितकेच उत्कटपणे आपले विचार ‘आपलं महानगर’मधून मांडत असताना ‘माय महानगर’च्या फेसबूक लाईव्हमध्ये त्यांचा दीड एक तासांचा नाट्यछटांचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला. संवाद आणि नाट्य प्रवेश अशा मांडणीतून सादर केला गेलेला हा प्रयोग तनामनाला भारावून टाकणारा होता. स्त्रीच्या भावना, तिच्या वेदना, आजही तिच्याकडे समाजाची बघण्याचा दृष्टीकोन, त्याचबरोबर देशातील श्रमिक, आदिवासी, कामगार यांचा आक्रोश आणि देशाच्या राजकीय भवतालाची केलेली शस्त्रक्रिया या सार्‍या नाट्यछटा घुसमटून टाकणार्‍या होत्या… गेली तीन दशके ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे संस्थापक मंजुल भारद्वाज आणि त्यांचे युवा रंगकर्मी हेच काम नाटकांच्या माध्यमातून मुंबईसह देशभर आणि परदेशात करत आहेत.

‘मंजुल भारद्वाज यांनी थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून गेली तीन दशके देशभर चालवलेल्या नाट्यप्रक्रियेचा मला एक भाग होता आले, याचा मला एक रंगकर्मी म्हणून आनंद तर आहेच; पण.. येथे मला एक मुलगी नाही तर माणूस म्हणून पहिल्यांदा पाहिले गेले. नाटक म्हणजे विचार हे बीज रुजवले. या प्रवासात माझ्या चेहर्‍यावरील खोटे मुखवटे गळून पडले. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला. माझा खरा चेहरा शोधण्यास मार्गदर्शन केले. माझ्यातल्या नव्या बदलाची सुरुवात झाली. हा बदल होता नव्या विचारांचा…स्थिरतेचा आणि आत्मशोधाचा! विशेष म्हणजे “राजगती” या नाटकाने तर माझ्यात देशाविषयी जाणीव निर्माण केली. नाटकातील माझी भूमिका, माझे विचार, तो संघर्ष मी जगू लागले. देशाविषयीची कळकळ मला जाणवू लागली…’

- Advertisement -

या भावना आहेत युवा रंगकर्मी सायली पावसकरच्या. सायली आणि माझी ओळख झाली ती छायाचित्रकार प्रवीण काजरोळकर यांच्यामुळे. एके दिवशी संध्याकाळी काही युवकांना प्रवीण ‘आपलं महानगर’च्या कार्यालयातून घेऊन आला. एखाद्या कार्यक्रमाची बातमी द्यायची असेल म्हणून मी आधी फार लक्ष दिले नाही. पण या चार एक जणांच्या ग्रुपमधील एक छोट्या चणीची चुणचुणीत मुलगी पुढे आली आणि ती म्हणाली, आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे आणि तिने काही मिनिटांत थिएटर ऑफ रेलेवन्सचा प्रवास इतक्या प्रभावीपणे मांडला की मी पाहत राहिलो. हे युवक शाश्वत असे काही तरी सांगू पाहतायत हे लक्षात आले. ‘आपलं महानगर’च्या रविवार ‘सारांश’ पुरवणीत या तरुणांना त्यांच्या नाट्य प्रवासाविषयी काही मांडू दिले तर तो वेगळा प्रयोग ठरेल, असा विचार करून सायलीला लिहायला सांगितले. शिवाय तुम्ही पाच एक जणांनी मिळून लिहा, अशीही सूचना केली आणि गेले अनेक रविवार सायलीसह अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, कोमल खामकर, तुषार म्हस्के आणि स्वतः मंजुल भारद्वाज यांनी अतिशय मनापासून “तिसरी घंटा” हा स्तंभ लिहिला. रविवारी स्तंभ प्रसिद्ध झाल्यानंतर दर सोमवारी सकाळी सायलीचा फोन ठरलेला. आमचा पुढचा विषय हा असेल, त्याचे फोटो आणि लेखक अशी मांडणी करून बुधवारपर्यंत तो ‘आपलं महानगर’कडे पोहचलेला असे… सर्व काही नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे आखीव रेखीव. कुठेही माझ्याकडून सायलीला फोन गेला आहे, असे कधी झाले नाही.

सायली आणि तिचे सहकारी प्रभावी अभिनय करत असताना तितकेच उत्कटपणे आपले विचार आमच्या दैनिकातून मांडत असताना “माय महानगर”च्या फेसबूक लाईव्हमध्ये त्यांचा दीड एक तासांचा नाट्यछटांचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला. संवाद आणि नाट्य प्रवेश अशा मांडणीतून सादर केला गेलेला हा प्रयोग तनामनाला भारावून टाकणारा होता. स्त्रीच्या भावना, तिच्या वेदना, आजही तिच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन, त्याचबरोबर देशातील श्रमिक, आदिवासी, कामगार यांचा आक्रोश आणि देशाच्या राजकीय भवतालाची केलेली शस्त्रक्रिया या सार्‍या नाट्यछटा घुसमटून टाकणार्‍या होत्या… गेली तीन दशके नाटकांच्या माध्यमातून हेच काम भारद्वाज आणि त्यांचे हे युवा रंगकर्मी मुंबईसह देशभर आणि परदेशात करत आहेत.

- Advertisement -

एक आठवड्यापूर्वी शिवाजी मंदिराला या नाट्य मंडळींचा दीड पावणे दोन तासांचा “राजगती”चा प्रयोग मला अनुभवता आला. स्वातंत्र पूर्व आणि स्वातंत्र मिळल्यानंतरचा काळ, सोबत आजच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारा हा प्रयोग तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा नव्याने राजकीय आणि सामाजिकदृष्ठ्या भानावर आणणारा आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याच्या आणि संविधान वाचवण्याच्या या काळात राजगतीचे महत्त्व खूप मोलाचे आहे. धाडसीपणे ते हे प्रयोग करत आहेत. नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा या पलीकडे जात राजगतीच नव्हे तर थिएटर ऑफ रिलेवन्सची सर्वच नाटके तुम्हाला भिडतात. कारण येथे विषय महत्त्वाचा आहे. आपल्या चारी बाजूला काय चालले आहे, याचे भान देणारे हे प्रयोग आहेत. त्यात कपडे, सामानसुमान, भडक मेकअपला कुठेही थारा नाही. आणि कलाकार म्हणजे एकापेक्षा एक. सायली, यामिनी, अश्विनी, कोमल, तुषार आणि त्यांचे इतर सहकारी यांचा फक्त चेहरा नाही तर सर्व देहबोली बोलत असते. अशा प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक नाटकांमध्ये नटांचा आवाज हा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक शब्द तितकाच प्रभावीपणे आणि बदलाच्या अंगाने प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवा आणि ते काम हे सर्व रंगकर्मी अचूकपणे करतात… तुमच्या मनावर ते ठसवतात.

प्रेक्षकांचे आत्मभान जागृत करण्याच्या या प्रक्रियेत यातील प्रत्येक कलाकाराने आधी त्याला स्वतःला त्या पातळीवर नेले आहे आणि म्हणून लेखक मंजुल भारद्वाज यांना काय म्हणायचे ते प्रेक्षकांपर्यंत सहज घेऊन जातात. यावर अभिनेत्री योगिनी चौक हिचे भाष्य मला महत्त्वाचे वाटते. ‘नाटक, सीरियल आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांत काम केल्यानंतरही काही अपूर्ण वाटत होते. ती रिकामी जागा ठोस भरली थिएटर ऑफ रेलेवन्सच्या नाटकांनी आणि तत्वज्ञानाने! कारण इथे मला अर्थपूर्ण कला, विचार, स्वातंत्र्य, समाधान आणि सात्विकता मिळाली जी याआधी इतर कुठेही मिळाली नव्हती म्हणून मी या प्रक्रियेशी जोडले गेले आणि कलात्मकतेचा अभ्यास सुरू केला”. तर टीव्ही मालिका आणि नाट्य अभिनेत्री कोमल खामकर आणखी वेगळा विचार मांडते. “नाटक म्हणजे शरीराच्या प्रदर्शनापलीकडे विचार आणि व्यक्तित्व घडवण्याची प्रक्रिया आहे. खोटे मुखवटे घालून अभिव्यक्तीच्या नावाखाली पाखंड करण्याऐवजी माणसाला माणुसकीशी जोडणारी कलात्मक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया माझ्यात थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या माध्यमातून रुजली आणि मी या प्रक्रियेशी जोडले गेले”.

२७ वर्षांपूर्वी १२ ऑगस्ट १९९२ रोजी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्य संस्थेची स्थापना झाली. ‘‘जागतिकीकरणाचा अजगर प्राकृतिक संसाधनांना गिळंकृत करण्यासाठी आपला फणा जगभरात पसरवत होता. भांडवलशाहीने जगाला ‘खरेदी आणि विक्री’ पर्यंत मर्यादित केले होते. भांडवलशाही सत्तेचे जागतिकीकरण हे विचारांना मिटवण्याचे काम करत होते.तंत्राच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांचा विनाश करण्याचा हा एक कट होता. मानव विकासासाठी पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतिशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामध्ये बदलण्याचा हा कट आहे, असे सरळ दिसत होते. अशा भयावह काळात माणुसकी टिकवणे एक आव्हान असल्याने ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लोकांसमोर नाट्य सिद्धांत घेऊन उभे झाले, असे मंजुल भारद्वाज सांगतात तेव्हा त्यामागची त्यांची तळमळ लक्षात येते.

२७ वर्षांपासून सतत कुठल्याच सरकारी, निम सरकारी, कॉर्पोरेट फंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय ही नाट्य चळवळ सुरू आहे. प्रेक्षकांचे आर्थिक आणि मानसिक पाठबळ, सामाजिक संस्थांचा हातभार, दानशूर व्यक्तींचा आधार, कार्यशाळा, शिबिरे अशा माध्यमातून हा नाट्य रथ ओढला जात आहे. मुंबईपासून मणिपूरपर्यंत!राजगतीबरोबर ‘दूर से किसी ने आवाज दी’, बालमजुरीवर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’, ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवर बी-७ , मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी गर्भ, शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या होणार्‍या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणार्‍या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स, शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार न्याय के भंवर में भंवरी हे विविध विषयांच्या गाभ्याशी जाणारे प्रयोग सायली, अश्विनी आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

मुख्य म्हणजे या सार्‍या प्रवासात ते माणूस म्हणून घडत आहेत. ‘महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून काम करत होतो.आयुष्यात एक उदासीनता निर्माण झाली होती. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताबरोबर मी जोडला गेलो तो रंगकर्मी अश्विनी नांदेडकर यांच्यामुळे. या प्रक्रियेत आल्यावर मी स्वतःचा शोध घेऊ लागलो. स्वतःचा शोध घेताना माझा स्वतःकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन माझ्यात निर्माण झाला’, अभिनेता तुषार म्हस्केची ही भावना म्हणूनच खूप बोलकी आहे. तर अश्विनी नांदेडकर आपला विचार मांडले,”जीवन कसे जगावे? अस्तित्व म्हणजे काय? आयुष्याला आकार देणे म्हणजे काय? या प्रश्नांच्या शोधात असतानाच ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या प्रक्रियेशी जोडले गेले आणि या प्रक्रियेने या प्रश्नांची ठोस जाणीव आणि उत्तरांची दिशा दिली. अभिनयासोबत आयुष्याच्या बारकाव्यांवर म्हणजेच मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ठ्या मी सक्षम झाले”.

रंगमंच म्हणजे फक्त नेपथ्य आणि चकचकाट नव्हे. मराठी रंगभूमीने प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या मेंदूत हे ठामपणे बसले आहे की रंगमंचावर बॉक्स सेट नसेल तर ते पथनाट्य होऊन जाते. मात्र थिएटर ऑफ रेलेवन्सने अभिनयाच्या माध्यमातून एक आकार, आकृती निर्माण केली आहे. तिथे लाकडाचा बॉक्स सेट निरर्थक ठरतो. ताई, माई, नवरा बायको, प्रियकर, प्रेयसी छाप नाटके आणि टायमिंगच्या नावाखाली उगाचच पंच काढून सादर केलेल्या विनोदी फार्सच्या पलीकडे एक जग आहे, ही भावना, कळकळ, एक जाणीव प्रेक्षकांपर्यंत पोहचवली पाहिजे, हे ते लोकांच्या मनावर ठसवतात आणि आजच्या घडीला तेच सर्वात महत्त्वाचे आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -