घरफिचर्सएक होकार नकारातला!

एक होकार नकारातला!

Subscribe

राज कपूरना ते अनपेक्षित होतं. त्यांनी शैलेंद्रंसारख्या तत्ववादी कवीसमोर पैशांचा म्हणजे आकर्षक रकमेचा विषय काढून पाहिला. पण शैलेंद्र त्यालाही बधले नाहीत. ते राज कपूरना सरळ म्हणाले, ‘मी काही पैशांसाठी गाणी लिहिणारा कवी नाही...आणि तुमच्या सिनेमात मी गाणी लिहावी ह्यासाठी दुसरं काही कारण मला दिसत नाही. मग तुम्हीच सांगा कशासाठी लिहायचं मी?‘

पारतंत्र्याचा तो काळ. 1946 सालचा. इप्टा नावाच्या डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या लोकांच्या संस्थेचा मुंबईत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात कवी-गीतकार शैलेंद्र त्यांनी स्वत: लिहिलेली आणि त्याला स्वत:च चाल लावलेली एक कविता गात होते.

कवितेचे शब्द होते- मोरी बगिया में आग लगा गयो रे गोरा परदेसी.

- Advertisement -

ह्या कवितेमध्ये पारतंत्र्याच्या आणि ब्रिटिशांनी आपल्या देशाला जे वसाहत केलं, त्यातून दिल्या जाणार्‍या गुलामगिरीच्या वागणुकीबद्दलची वेदना ठसठशीतपणे व्यक्त होत होती. शैलेंद्रंनी लिहिलेल्या त्या कवितेत त्यांनी अनुभवलेल्या घटनेचा संदर्भ होता. पारतंत्र्याच्या त्या काळात आणि स्वातंत्र्याचं आंदोलन ऐनभरात आलेलं असताना, शिवाय आता हा देश सोडावा लागणार हे ब्रिटिशांच्या लक्षात आलेलं असताना गोरे अधिकारी चवताळले होते. अशाच एका काळात शैलेंद्रंचे मिलिट्रीतले वडील आता पाकिस्तानमध्ये असलेल्या कोहमरीत वास्तव्याला होते. शैलेंद्रंचे कुटुंबीय त्यांना तिथे भेटायला गेले. त्यावेळी एका गोर्‍या अधिकार्‍याच्या पोराने भारतीयांबद्दलच्या तिरस्कारातून दगड भिरकावला. हा भिरकावलेला दगड शैलेंद्रंच्या बहिणीच्या कपाळावर येऊन आदळला आणि भळाभळा रक्त वाहिलं. ती घटना शैलेंद्रंच्या मनात रूतून राहिली. अनेक रात्री त्यांना त्या घटनेपायी झोप लागली नाही. एका रात्री मात्र अंथरूणात तळमळताना ते मध्येच उठले आणि त्यांनी कागदावर आपल्या मनातल्या त्या वेदनेला हुंकार दिला आणि शब्द लिहिले – मोरी बगिया में आग लगा गयो रे गोरा परदेसी.

…तर ही कविता इप्टाच्या कार्यक्रमात शैलेंद्र अगदी वेगळ्या नजाकतीत, दर्दभर्‍या स्वरात गात होते. गाता गाता आपल्या बहिणीच्या कपाळावर त्या गोर्‍या पोराने जो दगड मारला आणि काही कारण नसताना ती कुणाच्या तरी द्वेषाची कशी शिकार झाली ह्याचं साद्यंत वर्णन करत होते…आणि हे वर्णन करताना त्यांनी समोरच्या श्रोत्यांना पकडून ठेवलं होतं किंबहुना ताब्यातच घेतलं होतं.

- Advertisement -

श्रोत्यांनी तुडुंब भरलेल्या त्या सभागृहात पृथ्वीराज कपूर ह्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राज कपूर होता. त्यावेळी राज कपूर हे नाव भारतीय सिनेसृष्टीच्या क्षितिजावर उगवलंही नव्हतं. पण आपल्या कलावंत वडिलांच्या सहवासात त्यांना कलेतलं, कवितेतलं मर्म नेमकेपणाने कळू लागलेलं होतं. त्याच वेळेस ह्या तरण्याबांड राज कपूरनी त्यांच्या पहिल्यावहिल्या सिनेमाची जुळवाजुळव सुरू केली होती. आग हे त्या सिनेमाचं नावही ठरवून टाकलं होतं.

देशाच्या फाळणीबद्दलचा प्रश्न इथल्या लोकांच्या मनात घोळू लागला होता. आग ह्या सिनेमाच्या कथेतून राज कपूरना ह्याच विषयावर भाष्य करायचं होतं. असं भाष्य करताना आपल्या त्या सिनेमासाठी गाणीही तशीच लिहून हवी होती. त्यामुळे ते तशाच कवी-गीतकाराच्या शोधात होते…आणि त्यांचा हा शोध सुरू असतानाच शैलेंद्रंची ही कविता त्यांच्या कानावर पडली. त्या कवितेने ते ज्या सिनेमाच्या निर्मितीच्या प्रयत्नात होते त्या प्रयत्नांना बळ मिळाल्यासारखं त्यांना वाटलं. त्यांनी मनात ठरवलं, हाच आपल्या सिनेमातली गाणी लिहू शकतो. हाच माणूस आपल्या सिनेमाच्या त्या विशिष्ट कथेला न्याय देऊ शकतो.

इप्टाचा तो कार्यक्रम संपल्यानंतर राज कपूरनी लगोलग कवी शैलेंद्रंची भेट घेतली.

ते शैलेंद्रंना म्हणाले, ‘मी पृथ्वीराज कपूरजींचा मुलगा राज कपूर. मी एका सिनेमाची निर्मिती करतोय, तुम्ही जी आता कविता वाचलीत तशाच विषयावरचा माझा हा सिनेमा आहे, आग नाव आहे त्या सिनेमाचं, मला माझ्या ह्या सिनेमासाठी तुम्ही अगदी योग्य कवी वाटता, तुम्ही माझ्या ह्या सिनेमासाठी गाणी लिहाल का?‘

शैलेंद्रंनी राज कपूरचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि काही घटका ते राज कपूरकडे एकटक बघत बसले.

राज कपूरना वाटलं की आपण असं काही आपलं म्हणणं मांडलं आहे की ते ऐकून शैलेंद्र नावाचा कवी पटकन हो म्हणेल!
पण झालं उलटंच. शैलेंद्रंनी राज कपूरना चक्क नाही म्हणून टाकलं. राज कपूरच्या प्रस्तावाचा एका शब्दात निकाल लावून टाकला.

राज कपूर तसे निराश झाले होते; पण हट्टाग्रही शैलेंद्रंच्या आणखी मिनतवार्‍या करण्यात काही अर्थ नाही हे राज कपूरना तात्काळ उमगलं. मुंबईसारख्या मायानगरीत सिनेमात गाणी लिहिण्याची संधी स्वत:च्या पायापंखांनी चालून येऊनही ती नाकारणार्‍या शैलेंद्रंबद्दल त्यांना जास्त ममत्व वाटलं. त्या ममत्वाच्या पोटीच राज कपूर शैलेंद्रंना म्हणाले, ‘ठीक आहे, निर्णय तुमचा आहे, पण कधीकाळी सिनेमासाठी गाणं लिहावंसं वाटलं तर कधीही या माझ्याकडे. माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कधीही खुले आहेत!‘

शैलेंद्र आणि राज कपूर दोघंही तिथून निघून गेले. आग हा सिनेमाही झळकला. शैलेंद्रंची गाणी त्यात असणं शक्य नव्हतंच. पण काळ कसा असतो पहा. राज कपूर आपल्या पुढच्या बरसात ह्या सिनेमाच्या तयारीला लागलेले असतानाच शैलेंद्र एके दिवशी अचानक राज कपूरच्या ऑफिसात आले आणि म्हणाले, ‘तुम्ही एके दिवशी मला तुमच्या सिनेमासाठी गाणी लिहायला सांगितली होती ते तुम्हाला आठवतंय का?‘

राज कपूर म्हणाले, ‘हो, चांगलं आठवतंय!‘

शैलेंद्रं लगेच म्हणाले, ‘…तर मी आज हेच सांगायला आलोय की मला पैशांची गरज आहे, आणि आज मला गाणं लिहिण्यासाठी ते कारण वाटतंय. तुमच्यासाठी गाणी लिहायला मी तयार आहे. मला पाचशे रुपयांची गरज आहे!‘

शैलेंद्रवर तशीच काहीतरी परिस्थिती ओढवली होती. ते थोडेसे निराश दिसत होते.

पण राज कपूरनी शैलेंद्रमधला खोल कवी कधीच ओळखला होता. त्यामुळे शैलेंद्रंना ते नकार देणं शक्यच नव्हतं. पुढे ‘बरसात में. हम से मिले तुम’ हे गाणं तयार झालं…आणि राज कपूर आणि शैलेंद्र हा सिनेसृष्टीतला अध्यायच सुरू झाला हे सांगायला नकोच. थोडक्यात काय तर एक नकारात दडलेला होकार दोन कलावंतांना कायम एकत्र घेऊन आला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -