घरफिचर्ससिंगापूरचा निर्माता - सर थॉमस स्टॅम्फर्ड रॅफल्स

सिंगापूरचा निर्माता – सर थॉमस स्टॅम्फर्ड रॅफल्स

Subscribe

सिंगापूर शहराचा निर्माता सर सर थॉमस स्टॅम्फर्ड रॅफल्स यांची आज जयंती आहे.

सिंगापूर… आग्नेय आशियातील सर्वात छोटे पण पर्यटकांचे हक्काचे ठिकाण! गगनचुंबी इमारती, सर्वधर्मीय लोकांचे वास्तव्य यामुळे सिंगापूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रिटीशांच्या वसाहतवादीधोरणातून जन्मलेल्या सिंगापूर शहराची कथाही रंजक आहे. चौदाव्या शतकात सिंगापूर हे तमासेक नावाचे बेट होतं. त्यावेळी या बेटावर श्रीविजयाचे साम्राज्य होते. तमासेक बेटावर भ्रमंतीसाठी आलेल्या श्रीविजया साम्राज्याच्या सांग निला उतमा याला या राजपुत्राला सिंह दिसला व त्यावरून त्याने या बेटाचे नामकरण सिंहपूर-सिंगापुरा केल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून महत्त्वाचे बंदर असलेल्या सिंगापूरवर १५८७मध्ये पोर्तुगीजांनी आक्रमण केले. यावेळी सिंगापूर बेटावरील वसाहती उध्वस्त झाल्या. त्यानंतर सिंगापूर जवळपास दोन शतकं विस्मृतीत गेलं. १८व्या शतकात ब्रिटीशांच्या पूर्वेकडील देशांशी सुरू झालेल्या व्यापारात सिंगापूर महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. तोपर्यंत विस्मृतीत गेलेल्या सिंगापूरला आधुनिक रूपात जगाच्या नकाशावर पुन्हा आणण्याचे श्रेय सर थॉमस स्टॅम्फर्ड रॅफल्स यांना जाते.
साल १७८१. ब्रिटिशांच्या वसाहतीतून मुक्त होण्यासाठी अमेरिकनांचा संघर्ष सुरू होता. याचवेळी कॅरिबियन बेटांमधून इंग्लंडला निघालेल्या एका इंग्लिश व्यापारी जहाजावर ६ जुलै १७८१ रोजी कप्तान बेंजामिन रॅफल्सची पत्नी अ‍ॅनने जहाजावरच पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव थॉमस ठेवण्यात आले. थॉमसच्या लहानपणीच बेंजामिन रॅफल्स यांचे निधन झाले. त्यामुळे कुटूंबाची जबाबदारी आणि आर्थिक कर्जाचे ओझे लहानग्या थॉमसवर येऊन पडले. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे थॉमसला त्याचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. १४ वर्षाचा थॉमस रॅफल्स ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडनमधील कार्यालयात कारकून पदावर रुजू झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्यामुळे थॉमस रॅफल्स यांनी कोणतेही रितसर शिक्षण न घेता स्वतःला स्वाध्याय करण्याची सवय लावली. ईस्ट इंडिया कंपनीत कारकूनपदी काम करताना थॉमसची बुद्धिमत्ता व त्याचा कामाचा झपाटा पाहून कंपनीतील वरिष्ठ मंडळींवर थॉमस रॅफल्सची छाप पडली. कंपनीच्या संचालक मंडळावरील सदस्य असलेल्या विल्यम रॅम्से यांनीही थॉमस रॅफल्सच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. १८०५ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या पेनांग ठाण्यावरील सहायक सचिवाच्या जागेसाठी विल्यम रॅम्से याने अनेक इच्छुक अधिकार्‍यांमधून चोवीस वर्षांच्या रॅफल्सालाच निवडले. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांचा प्रवास करत १८०५ साली रॅफल्स पेनांगामध्ये दाखल झाला. या सहा महिन्यांच्या समुद्री प्रवासात त्याने मलय भाषा शिकून घेतली. त्याच्या या अभ्यासाचा त्याला पेनांगमध्ये उपयोग झाला. कार्यकुशलता व मलय भाषेचे ज्ञान यांच्या बळावर रॅफल्सने मुख्य सचिवपदावर बढती मिळवली. हवापालटासाठी मलाक्क्यात आलेल्या रॅफल्सने मलाक्क्याचे व्यापारी महत्व ओळखले. त्याबाबत कंपनीचे भारतातील तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना त्याने पत्र लिहिले. गव्हर्नर जनरल मिंटोवर त्याच्या दूरदृष्टीची चांगली छाप उमटली. त्यामुळेच मिंटोनेसुद्धा फ्रेंचांच्या कब्जातून जावा घेण्याची मोहीम त्याच्यावरच सोपवली. त्याने आखलेल्या योजनेनुसार कंपनीच्या नौदलाने ऑगस्ट १८११ मध्ये जाकार्ता काबीज केले. आग्नेय आशियात आपले ठाणे पक्के करण्यासाठी ब्रिटिशांनी पेनांग, मलाक्का, बेंकुलू, रियाऊ असे अनेक पर्याय पडताळून पाहिले. मात्र रॅफल्सच्या मुत्सद्दीपणामुळे सिंगापूरच्या तत्कालीन राजांबरोबर तह करून ब्रिटिशांनी आग्नेय आशियातील मोक्याचे ठिकाण सिंगापूरवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर विविध सोयी सुविधा राबवून थॉमस रॅफल्स यांनी सिंगापूरचे रूपडे पालटले. आणि म्हणूनच आजही थॉमस स्टम्फर्ड रॅफल्स सिंगापूरची ओळख आहेत. सिंगापूर हे त्यांचेच शहर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -