Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स अजून येतो वास फुलांना

अजून येतो वास फुलांना

आयुष्य म्हणजे हे चार क्षण नव्हेत किंवा लॉकडाऊनचे चार महिनेही नव्हेत. रखरखीत उन्हाळे येतात तसेच बहारदार पावसाळेही असतात जगण्यात. जगणं हा एक्स्प्रेसवेवरचा वनवे नाही. डेड एंड नसतो जगण्यात. मार्ग असतात. मार्ग निघतात. उत्तरं सापडतात. ती उत्तरं शोधण्यासाठी हातात हात घ्यायला हवा. सारं काही संपलं असं समजायची अजिबात आवश्यकता नाही, कारण मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं तर - अजून येतो वास फुलांना...

Related Story

- Advertisement -

भयंकर पोकळी वाटतेय. मी स्वतःहून कौंसिलरकडे गेलो. झोपेच्या गोळ्याही घेतोय. गेले चार महिने मी स्वतःपासूनच तुटलोय, असं वाटतंय.
एक मित्र फोनवरुन बोलत होता.

त्याच्या आवाजात अगतिकता होती. हतबलता होती. भीतीनं आणि चिंतेनं त्याला पूर्णपणे पोखरुन टाकलं होतं. मी बराच वेळ बोलत राहिलो. काही सकारात्मक सांगण्याचा मी प्रयत्न केला खरा; पण तो कितपत यशस्वी झाला, माहीत नाही.
अलीकडच्या बातम्या चाळल्या तरी आपल्याला या नैराश्याचं सार्वत्रिक रुप दिसेल. एका विवाहित जोडीनं नुकतंच मुलांची हत्या करुन आत्महत्या केली. एका हॉटेलचालकानं आत्महत्या केली. कला शिक्षकानं स्वतःचं रेखाचित्र करुन त्यावर जन्म-मृत्यू तारखा टाकून स्वतःला संपवलं. अशा हृदयद्रावक घटना घडत आहेत.

- Advertisement -

या काळात घरगुती हिंसाचारात झालेल्या वाढीला ‘शॅडो पॅन्डेमिक’ असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं संबोधलं तसंच मानसिक ताणतणावातून घडणार्‍या या घटनांना साथीचं रूप येईल की काय, अशी भीती वाटावी, एवढी अवस्था भयंकर होत चालल्याबाबत चिंताही व्यक्त केली.

हे केवळ भारतातच नव्हे तर जगभर घडतं आहे. लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून जगभर मानसशास्त्रीय तणावाची साथ आहे. या वर्षाच्या एप्रिल अखेरीस अनेक मानसशास्त्राच्या संदर्भात काम करणार्‍या संघटनांनी आणि तज्ज्ञांनी ‘आत्महत्यांची साथ’ निर्माण होऊ शकते, असं भाकीत केलं होतं. दुर्दैवाने ते खरं होण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. कोरोनाच्या साथीमुळे आर्थिक ताण आणि सामाजिक दुरावा वाढला आणि त्यातून आत्महत्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसतं आहे.

- Advertisement -

सहसा आत्महत्यांकडे त्या ‘वैयक्तिक घटना’ असल्याप्रमाणे पाहिलं जातं पण मुळात आत्महत्या ही एक ‘सामाजिक घटना’ आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आत्महत्या ही व्यक्तीनं या समाजात राहण्याबाबतची व्यक्त केलेली असमर्थता असते. तिला वैयक्तिक घरगुती कारण आहे, वाद आहे, असं म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही, करता कामा नये. अगदी एका व्यक्तीनं केलेली आत्महत्यादेखील समाज म्हणून आपलं अपयश असतं. समाजातला ‘समूहभाव’ लोप पावत चालल्याचं ते ठळक लक्षण आहे.

आत्महत्या करणारी व्यक्तीच दोषी आहे असं गृहीतक आपल्या मनात तयार असतं. म्हणून तर संबंधित व्यक्तीच कशी नाजूक मनाची होती, लौकिक अर्थाने अपयशी झाली होती आदी निकालपत्रं आपण सादर करतो. आयुष्यभर त्या व्यक्तीला आपण समजावून घेत नाहीच, पण मेल्यानंतरही तिची बाजू लक्षात घेत नाही.

ज्या प्रकारच्या समाजात आपण आज जगतो आहोत, तो विस्कटलेला विखुरलेला आणि शतखंडित झालेला आहे. व्यक्ती समाजापासून एकटी पडलेली आहे. समाजासोबत अनुकूलन साधण्याचा अवकाश अधिकाधिक आक्रसत चालला आहे.

विशेषतः आजच्या युवा पिढीचं वेगळंच त्रांगडं आहे. टोकाची स्पर्धा अंगावर आदळत राहते. तिथं स्वतःला सिद्ध करण्याचा जीवघेणा खेळ सुरु असतो. त्या वेगवान धावपट्टीवर अडखळलं तरी कुणी बोलायला नाही. ( विसावणं तर शक्यच नाही !) समवयीन व्यक्तींसोबत काही बोलायचं तर ते हसतील. आई-वडिलांशी बोलायचं तर ते रागावतील. वयानं लहान असणार्‍यांना तर आपले इश्यूच समजू शकत नाहीत. अशा सार्‍या कोंडीतून दाही दिशांनी एकटपण अंगावर येतं. ही कुत्तरओढ सहन होत नाही नि अचानक एके दिवशी गळफास घेतल्याची बातमी येते. आपण वाचतो, हळहळतो. काही जुजबी कारणांविषयी चर्चा करतो पण मोकळेपणाने चर्चा करता येईल, असा अवकाश तरी आपण निर्माण करतो काय ?

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र दुःख व्यक्त झालं. पैसा, प्रसिद्धी, भौतिक साधनसंपत्ती याबाबतीत वयाच्या तिशीतच सर्व काही मिळवलेल्या ‘हिरो’ ला एक्झिट का घ्यावी वाटली, याचा विचार आपण करणार की नाही ? याचा अर्थ असा की कदाचित या सार्‍या लौकिकाच्या पलीकडंही माणसाला काही हवं असतं. ते नेमकं काय आहे ? ते काय आहे, हे शोधणं दूर. असं काही असतं याचा सामूहिक विसर हे आजच्या काळाचं विचित्र वास्तव आहे.

तुमच्याकडे फार भारी गाडी-बंगला नसेल, तुम्ही ‘यशस्वी’ नसाल तरी काही फरक पडत नाही. मात्र आपलं सुख दुःख शेअर करण्यासाठी किमान एक व्यक्ती तरी हवी. सारीच हवा कोंडली गेली तर अचानक कुकर फुटणार, हे साधं भौतिक सत्य आहे.

आपलं हे सारं प्रेशर कमी व्हावं म्हणून आपण काही आउटलेट निर्माण केले आहेत काय ? मुळात एवढ्या मोठ्या संख्येने लोक डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येपर्यंतचं पाऊल उचलतात, ही गंभीर समस्या आहे, हे आपण मानतो का ? आजही कुणी काउन्सिलरकडं जायचं म्हणालं तर त्या व्यक्तीला वेडं ठरवून हसायला आपण मोकळे असतो. इतरांना असं वेड्यात काढणं, बोचकारत राहणं यातून काय साधलं जातं कोणास ठाऊक ! पण हे सर्रास होताना दिसतं.

कधीकधी काही उपचारांची किंवा सोल्युशन देण्याचीही गरज नसते. गरज असते ती फक्त कुणीतरी शांतपणे ऐकून घेण्याची. शेअर करण्याच्या जागा आटत चालल्या आहेत. आपली जमीन अधिकाधिक कोरडी बनत चालली आहे. मुळात आपला जगण्यावरचा विश्वास संपत चालला आहे. तो पुन्हा पेरत जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.

काळोख कितीही गडद असला तरी फटफटतंच. किंबहुना जेवढा अंधार गडद, तेवढी पहाट जवळ. आयुष्यभर अपयश पदरी पडूनही अब्राहम झुंजत राहिला आणि एके दिवशी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. तब्बल 27 वर्षे तुरुंगात काढून नेल्सन मंडेला नावाच्या अवलियाने जगाला शांततेचा, अहिंसेचा मार्ग दाखवला. आयुष्यभर अन्याय सहन करत सामाजिक न्यायासाठी भीम झटत राहिला आणि संविधानाचा शिल्पकार झाला. अशी कित्येक उदाहरणं आहेत !

आयुष्य म्हणजे हे चार क्षण नव्हेत किंवा लॉकडाऊनचे चार महिनेही नव्हेत. रखरखीत उन्हाळे येतात तसेच बहारदार पावसाळेही असतात जगण्यात. जगणं हा एक्स्प्रेसवेवरचा वनवे नाही. डेड एंड नसतो जगण्यात. मार्ग असतात. मार्ग निघतात. उत्तरं सापडतात. ती उत्तरं शोधण्यासाठी हातात हात घ्यायला हवा. सारं काही संपलं असं समजायची अजिबात आवश्यकता नाही, कारण मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं तर –

अजून येतो वास फुलांना
अजून माती लाल चमकते
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते !

- Advertisement -