वशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल

आपले प्रयत्न अपुरे पडले किंवा साम, दाम, दंड, भेद करूनही एखादी गोष्ट हाती लागत नाही म्हटल्यावर लोकांची डोकी फिरतात. आता विपरीत परिस्थितीत निरक्षर आणि गरीब सरीबाचे डोके फिरले तर त्याला नीट समजावता येते, बाबा रे हे चूक आहे. पण, वेड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाणार्‍या लोकप्रतिनिधींना ठिकाणावर आणण्यासाठी वेड्याचे हॉस्पिटल हे एकमेव ठिकाण आहे. आपल्या स्वार्थासाठी विरोधकांवर जादूटोण्याचे आरोप करणे म्हणजे आपला मेंदू जाग्यावर नसल्याचे हे लक्षण आहे. तुम्ही जर बुवाबाजी आणि काळी जादू याचे समर्थन करत असाल तर त्याचा मोठा प्रभाव लोकांवर पडून समाजाला तुम्ही अधोगतीकडे नेत आहात. अंधश्रद्धेच्या नादाला लागून नरबळी, गुप्तधन, वशीकरण आणि नाहक भीतीचे जाळे यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

आधी ही मुक्ताफळे पाहू…

१)राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बुवाबाजी आणि जादूटोणा करणारे नेते आहेत. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने ते जादूटोणा करणार्‍या बाबांना घेऊन फिरत आहेत. कदम यांनी विरोधी पक्षनेता होण्यासाठीदेखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे- माजी शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी, दापोली.

२) राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वशीकरणाची विद्या आहे. याच वशीकरण मंत्राचा वापर करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वश केले आहे.
महाजन यांनी वशीकरण मंत्र शिकून घेतला आहे. त्यामुळेच ते दावा करतात ती प्रत्येक गोष्ट खरी ठरते – आमदार सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, एरंडोल.

३) राज्यमंत्री दीपक केसरकर हे काळी जादू करणारे असून त्यांच्यामुळेच नारायण राणे यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. मी अनेक वर्षे त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांच्या या भानामतीची मला चांगलीच माहिती आहे. मी आता त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी माझी भेट घेतली आणि त्यापासून गेले महिनाभर मला मानसिक त्रास होत आहे. असा अनुभव त्यांच्या अगदी जवळच्या मित्रांनाही आला आहे- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रतिनिधींची ही मुक्ताफळे पाहून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे की नाही, अशी शंका येऊ लागली आहे. शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार यांचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पुढे नेत नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव आणि अविनाश पाटील यांनी या राज्यातून बुवाबाजी नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्या राज्यात आपल्या स्वार्थासाठी काळ्या जादूचे समर्थन करणार्‍या असल्या लोकप्रतिनिधींना तात्काळ वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले पाहिजे. आणि काही दिवस वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये बरे होऊन बाहेर काढल्यानंतर त्यांना राज्य सरकारच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा हिसका दाखवून थेट तुरुंगाची हवा खायला पाठवले पाहिजे. मग अशा लोकांचे डोके ठिकाणावर येईल आणि नाही आले तर पुन्हा वेड्यांचे हॉस्पिटल आहेच…

आपले प्रयत्न अपुरे पडले किंवा साम, दाम, दंड, भेद करूनही एखादी गोष्ट हाती लागत नाही म्हटल्यावर लोकांची डोकी फिरतात. आता विपरीत परिस्थितीत निरक्षर आणि गरीब सरीबाचे डोके फिरले तर त्याला नीट समजावता येते, बाबा रे हे चूक आहे. पण, वेड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाणार्‍या अशा लोकप्रतिनिधींना ठिकाणावर आणण्यासाठी वेड्याचे हॉस्पिटल हे एकमेव ठिकाण आहे. आपल्या स्वार्थासाठी विरोधकांवर जादूटोण्याचे आरोप करणे म्हणजे आपला मेंदू जाग्यावर नसल्याचे हे लक्षण आहे. बाबा बुवांना मेंदू ताब्यात देऊन लोकांसमोर जाणारे असे भंपक लोकप्रतिनिधी आपण काय करतो हे त्यांना कळत नाही. लाखो लोकांचे आपण प्रतिनिधित्व करत असता आणि जनता मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहत असते. तुम्ही जर बुवाबाजी आणि काळी जादू याचे समर्थन करत असाल तर त्याचा मोठा प्रभाव लोकांवर पडून समाजाला तुम्ही अधोगतीकडे नेत आहात, हे आधी कळायला हवे. अंधश्रद्धेच्या नादाला लागून नरबळी, गुप्तधन, वशीकरण आणि नाहक भीतीचे जाळे यामुळे याआधी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

नरेंद्र दाभोलकर आणि श्याम मानव यांनी यातून आपल्या राज्याला बाहेर काढताना अंधश्रद्धाविरोधी कायदा बनवण्यासाठी सरकार दरबारी अनेक वर्षे अथक प्रयत्न केले त्याला आम्ही मी साक्षीदार आहे. धर्माच्या नावाखाली या कायद्याला विरोध करून तो दाबून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. कोर्ट कचेर्‍याही झाल्या, सरकारवर दबावही आणला गेला. पण, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पुढाकार घेतल्याने हा कायदा होऊ शकला. हा कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रसंगी मोठा विरोध आणि टीका सहन करावी लागली, पण आबांनी राजकीय धारिष्ठ्य दाखवले. आज आबा या जगात नाहीत आणि या कायद्यासाठी जीवाचे रान करणार्‍या दाभोलकरांना प्रतिगामी लोकांनी गोळ्या घालून त्यांचे जीवन संपवले.

दाभोलकरांप्रमाणे समाजसुधारक पानसरे, कलबुर्गी यांनाही गोळ्या घालण्यात आल्या. धर्म आणि श्रद्धेच्या पलीकडे माणूस नावाचे एक बेट आहे, हे सांगण्याची या सर्वाना किंमत मोजावी लागली. श्याम मानव, अविनाश पाटील हे आता या सार्‍यांचा लढा घेऊन पुढे जात आहेत, पण त्यांच्याही जीवाचा धोका टळलेला नाही. पण, हे दोघेही निर्भय आहेत. मरत मरत जगण्यापेक्षा लोकांचे आयुष्य भयमुक्त राहावे यासाठी त्यांनी वसा घेतला आहे आणि घेतला वसा ते टाकणार नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांना आपली साथही असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच अंधश्रद्धेचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना चांगले ठणकावले तर पाहिजेच, पण निवडणुकांच्या तोंडावर आपल्या स्वार्थासाठी भंपकगिरी केल्याबद्दल त्यांना ठरवून पाडायला हवे.

शिवसेनेत एकत्र असले तरी रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यातून विस्तव जात नाही. मात्र, दळवी यांनी कदम यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याला कारण आहे ते म्हणजे कदम यांना आपल्या मुलाला योगेश कदम यांना निवडणुकीसाठी उभे करायचे आहे आणि मागच्या वेळी पराभूत झालेल्या दळवी यांना पुन्हा एकदा आमदारकी मिळवायची आहे. पाचवेळा आमदारकी भोगूनही दळवी यांचे समाधान झालेले नाही. गेल्या वेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांनी पराभूत करून घरी बसवले होते. पराभवानंतर गेली पाच वर्षे झोपी गेलेले दळवी निवडणुका आल्याने पुन्हा एकदा जागे झाले आहेत. त्यांना सहाव्यांदा आमदार होण्याचे स्वप्न पडले आहे. आणि स्वप्नातून जागे झाल्यावर पान खात खात आणि तोंड लालभडक करत त्यांनी कदम यांच्यावर अंधश्रद्धेच्या नावाखाली बेछूट आरोप केले आहेत. दळवी यांनी पंचवीस वर्षे आमदारकी भोगून दापोलीत काय दिवे लावले, हे एकदा त्यांनी स्वतःला आरशासमोर उभे राहून विचारायला हवे.

गावच्या नाटकात एखादे ऐशआरामी पात्र असावे अशी देहबोली असणार्‍या दळवी यांना विधानसभेत धड कधी बोलता आले नाही ते लोकांची कामे काय करणार? दापोली आणि त्याच्या शेजारचा मंडणगड हे कोकणातील सर्वात मागास तालुके आहेत. घरटी एक दोन माणसे शिल्लक असून बाकी पोट भरण्यासाठी मुंबईला आली आहेत. रोजगार देणे तर सोडा, पण रस्ते, पाणी अशा प्राथमिक सुविधांना या भागातील लोकांना वणवण करावी लागत आहे. मात्र कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति असलेला असीम विश्वास यामुळे दळवींसारखा बिनकामाचा उमेदवार पाच वेळा निवडून येतो आणि याला कारण म्हणजे शिवसेना पक्ष. २०१४ ला दळवी पडले त्याला शिवसेनेतील बंडाळी कारणीभूत तर होतीच, पण या बंडाळीला कदम यांनी दिलेली हवाही कारणीभूत होती. यामागे कदम यांना २०१९ मध्ये आपल्या मुलाला उभे करायचे होते, हे सरळ सरळ दिसते.

रामदास कदम हे जादूटोणा करणार्‍या बुवांना सोबत घेऊन फिरतात. कदम यांनी विरोधी पक्षनेता होण्यासाठीदेखील आमच्यासोबत भगत दिला होता. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा आरोप करणार्‍या दळवी यांनी आतापर्यंत कदमांनी चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावाही केला आहे. आता असे आरोप आणि दावे दळवींना सुचतात, याचा एकच अर्थ आहे तो म्हणजे पुन्हा त्यांना निवडणुकीला उभे राहायचे आहे. पण, हे करताना त्यांनी अंधश्रद्धेचा आधार घेऊ नये. दम असेल तर कदम यांची अंडीपिल्ली बाहेर काढावी… जनता काय निर्णय घ्यायचा तो घेईल.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वशीकरणाची विद्या आहे. याच वशीकरण मंत्राचा वापर करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वश केले आहे, असे आमदार सतीश पाटील यांना वाटत असेल तर असा वशीकरणाचा मंत्र त्यांनीही शिकून घ्यायला हवा. खरेतर त्यांनी स्ट्राँग वशीकरण मंत्र शिकून घेतल्यास त्यांना महाजन यांना ताब्यात घेता येईल आणि महाजनांची मती गुंग होऊन ते पाटील यांच्या ताब्यात येतील आणि त्यांचा विजय सोपा होईल. कुठल्या जगात पाटील वावरत आहेत, हे एकदा त्यांनी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला तपासून घ्यायला हवे. २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर महाजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात. अनेक महत्त्वाचे निर्णय आणि आंदोलनांमध्ये गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने मध्यस्थाचे काम पार पाडले होते. याशिवाय, सध्या भाजपमध्ये सुरु असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या आयातीमध्येही महाजन यांची मुख्य भूमिका आहे. हे कळायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. राजकारणात महाजन यांच्यासारखी मध्यस्थ माणसे नेतृत्वाला कायम हाताशी लागतात.

आपल्या वाटेतील प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांचा काटा काढण्यासाठी फडणवीसांनी महाजनांचा चतुराईने वापर केला आणि त्यांनतर गेली चार वर्षे संप, आंदोलन, उपोषण अशा विरोधकांच्या सर्व अस्त्रांना बोथट करण्याचे कामही फडणवीसांनी याच महाजनरुपी अस्त्राने केले. आता ते कोणालाही पटवू शकतात, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यात महाजन यांच्या अंगभूत कौशल्याला दाद दिली पाहिजे. पण, आमचा प्रश्न असा आहे की मध्यस्थी करण्यासाठी महाजन आले असताना त्यांना समोरची माणसे फसतात तरी कशी? याचे साधे उत्तर आहे ते म्हणजे समोरची फसणारी माणसे आपल्या भूमिकेवर ठाम नव्हती. आज मुख्यमंत्र्यांच्या वतीने महाजन यांनी दिलेली किती आश्वासने पाळली गेली, याचा हिशोब त्यांनी करायला हवा. खरेतर महाजनांकडून फसवल्या गेलेल्या लोकांनी निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना पाडायला हवे. बाकी आमदार सतीश पाटील यांनी पुन्हा एकदा आमदारकीला उभे राहण्यापेक्षा स्वतःची मानसिक तपासणी करून घ्यावी.

हेच बबन साळगावकर यांना सांगावेसे वाटते. समाजवादी विचारांची परंपरा सांगणार्‍या तळकोकणात आपण मोठे झालात. एके काळी या विचाराने काम केले. पण, सत्तेपुढे तुमचे डोके ठिकाणावर नसल्याचे दिसून येते. इतकी वर्षे दीपक केसरकर यांच्या गळ्यात गळे घालून फिरताना आपल्या मित्राच्या वशीकरण जादूने तुमचा गळा कापला जाईल, अशी कधी भीती वाटली नाही. मग, आताच कशी वाटते? याचा एकच अर्थ आहे तो म्हणजे तुम्हाला आमदारकीचे वेध लागले आहेत. एका हाताची छातीला घडी, दुसरा हात तोंडावर ठेवत आणि नाकावर खाली गेलेल्या चष्म्यामधून न बघता वर उघड्या राहिलेल्या भागातून समोरच्याला आरपार न्याहाळत अगदी हळू आवाजात बोलणार्‍या केसरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना हा प्रवास सर्वांनी पाहिला आहे. त्यांना पक्षापेक्षा स्वतःवर अमाप प्रेम आहे. या प्रेमापोटी खाण सम्राट अवधूत तिंबेलो यांना त्यांनी ताब्यात घेतले असेल तर त्यात केसरकरांप्रमाणे तिंबेलो यांचाही काही हेतू असेलच. प्रचंड श्रीमंत माणसे उगाच कोणाच्या प्रेमात पडत नाहीत.

गोव्यात मायनिंग काढून खाणी संपल्यानंतर आता गोव्यातील मोठे खाण सम्राट तळकोकणातील आमदारांच्या प्रेमात पडत असतील तर त्यात धंदा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजप प्रवेशही म्हणे केसरकरांच्या वशीकरणाने रखडला असेल तर आजतागायत राणेंना विरोध करून केसरकरांप्रमाणे आपले राजकीय अस्तित्व तयार करणार्‍या साळगावकरांनी लगेच तात्काळ शिवसेना सोडून स्वाभिमान पक्षात प्रवेश करावा आणि नंतर राणेंबरोबर भाजपमध्ये खुशाल जावे. पण, बकवास वशीकरणाच्या फालतू गप्पा मारू नये. आणि आम्ही ज्या काही मागच्या गोष्टी सांगत आहोत त्या आठवत नसल्यास साळगावकरांनी स्वत:ला स्मृतीभ्रशांचा आजार जडला आहे, हे लक्षात घेऊन मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरला दाखवून घ्यावे. आता राहता राहिला प्रश्न वशीकरणाचा, तर हिंमत असेल तर त्यांनी असे काही असते हे सिद्ध करून दाखवावे, अन्यथा राजकारणातून बाहेर पडून थेट मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे…