घरफिचर्सएक शायर की मौत

एक शायर की मौत

Subscribe

मुशायरा म्हटला की तिथे नजाकत, हळुवारपणा यांचा वावर अपेक्षित. तिथे धबधब्याचे असणेच अनपेक्षित, कोसळणे ही तर दूरची गोष्ट; पण राहत इंदौरी यांनी मुशायर्‍यांची ही आचारसंहिता जणू धुडकावून लावली. त्यांच्या युट्युबवरील ध्वनिचित्रफिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा निव्वळ शब्दांतून नवरसांचा अद्भुत आविष्कार साकारणे म्हणजे काय असते, याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. उर्दू ही भाषा म्हणून गोड खरी, पण आपला या भाषेचा परिचय निव्वळ वरवरचा. मग अशा अर्धपरिचित भाषेतील कवीची अवघ्या तरुणाईवर ‘क्रेझ’ निर्माण करण्यात त्यांच्या या परफॉर्मन्सचा मोठा वाटा आहे. गुलजार यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीने त्यांना ‘मुशायरों का लुटेरा’ म्हटले आहे, ते उगीच नाही.

आल्या-गेल्या प्रत्येक मृत्यूचे सूतक समाजमनाने पाळावे, इतकी आपल्या देशाची लोकसंख्या कमी नाही. म्हणून तर ‘कोरोना’च्या संसर्गाने दररोज शेकडोंनी माणसे दगावत असतानाही आपणाला त्याचे काही ‘खास दुःख’ होतेय असे अजिबातही नाही. परिस्थिती अशी झाल्याय की एखाद्याच्या मृत्यूनंतर दोन-चार दिवसांनी कळतंय की याचे-त्याचे निधन झाले म्हणून…

परंतु अशा भल्याभल्यांना बेदखल करणार्‍या काळातही एका कवीच्या मृत्यूचे दुःख अनावर व्हावे? इतके की सगळ्या समाजमाध्यमांच्या भिंतीवर मागील पाच दिवसांपासून त्यांच्या शायरीचे पारायण व्हावे? खरेतर आजच्या बाजारकेंद्री काळात कविता/गझल/शायरी म्हणजे कांही ‘स्टँड अप कॉमेडी’ सारखे सेलेबल प्रोडक्ट नाही, की ज्याच्यावाचून लोकांच्या आयुष्यात काही फरक पडावा; सध्या कविता ही लोकांच्या प्राधान्याचीच नव्हे तर साध्या खिजगणतीतलीही गोष्ट नाही, मग असे असतानाही एका कवीच्या मृत्यूनंतर समाजाच्या सर्व स्तरांतून, सगळ्या वयोगटातून, विशेषत्वाने तरुण वर्गाकडून त्यांच्या कवितेचे स्मरण केले जावे, ही ‘विशेष गोष्ट’ ठरते.

- Advertisement -

राहत इंदौरी यांच्यामध्ये अशी काय खास गोष्ट होती?

कुणी म्हणेल,ते ‘मोदी सरकारचे’ कडवे टीकाकार होते, म्हणून जास्त ‘लोकप्रिय’ होते. हे खरे आहे, पण पूर्ण खरे नाही. कारण सत्तर वर्षांचे त्यांचे वय आणि पाच दशकांची साहित्यिक कारकीर्द होती आणि ‘मोदी सरकारचे’ आतापर्यंतचे वय उण्यापुर्‍या सहा वर्षांचे आहे. याचा अर्थ त्यांच्या साहित्यिक योगदानाचे मूल्यमापन केवळ या एका पैलूवरून करता येणारे नाही.

- Advertisement -

राहत कुरैशी हे त्यांचे मूळ नाव. जन्म इंदौरचा. घरची आर्थिक परिस्थिती यथातथा. म्हणून दहा वर्षांच्या वयात दुकानांच्या पाट्या रंगवण्याचे काम केले, पुढे चित्रपटांची पोस्टर्सही रंगवली…भले निव्वळ चरितार्थासाठी ते पेंटिंगकडे वळले असले तरी चित्रकलेवर त्यांचे मनस्वी प्रेम होते. या प्रेमातूनच पुढे आर्थिकदृष्ठ्या स्थिरस्थावर झाल्यावरदेखील ‘कलार्थी’ नावाचा स्टुडिओ त्यांनी उभारला. तारिक शाहीन यांच्या ‘सूरज देश’ या पुस्तकाचे त्यांनी रंगवलेले कव्हर हे त्यांच्यातील उत्तम चित्रकाराची साक्ष देणारे आहे.

उत्तम चित्रकलेसाठी लागणारी डिटेलिंगची नजर त्यांच्याकडे होती. याचे प्रत्यंतर त्यांच्या गझलेमध्ये येते. प्रदीप निफाडकर यांनी नोंदवल्याप्रमाणे विष्णू चिंचाळकर, डी.डी.देवळालीकर, एन.एस.बेन्द्रे यांच्याकडे जसे त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले तसे उस्ताद कैसर इंदौरी या गुरूच्या सानिध्यात गझलेचा रियाज केला. ही सगळी माहिती यासाठी की ‘विकीपिडिया’ विद्यापीठाला प्रमाण मानणार्‍या लोकांना असा समज होण्याची शक्यता आहे की ते देवी अहिल्याबाई विद्यापीठात उर्दूचे प्रोफेसर होते; आणि प्रोफेसर, प्राध्यापक असले म्हणजे ते आपोआप ‘कवी/लेखक’ असणारच. त्यासाठी वेगळा रियाज वगैरे थोडाच असतो? प्राध्यापक असणे म्हणजेच लेखक/विचारवंत असल्याची खूण समजल्या जाण्याच्या काळात ‘राहत इंदौरी’ होण्यासाठी काय किंमत मोजावी लागते? हे कळणे आवश्यक आहे.

निफाडकरांनी त्यांच्या लेखात एक छान किस्सा सांगितला आहे. ‘एके दिवशी आपल्या गुरूकडे गेल्यानंतर कैसर साहेबांनी विचारले, ‘किती गझला लिहिल्यास?’ राहत अभिमानाने म्हणाले, ‘चार-पाच दिवसांत बावीस गझला लिहिल्या.’ गुरुंनी आज्ञा फर्मावली, ‘जा त्या सगळ्या नाल्यात फेकून ये.’ क्षणाचाही विलंब न करता कैसर साहेबांनी गुरुची आज्ञा पाळली आणि ‘पक्व’ न होऊ देताच गझल मानलेल्या सगळ्या रचना नाल्यात फेकून दिल्या.

‘रुत’, ‘दो कदर और सही’, ‘मेरे बाद’, ‘धूप बहुत है’, ‘चांद पागल है’, ‘मौजूद’ आणि ‘नाराज’ हे त्यांच्या गझलांचे संग्रह अशा अग्निपरीक्षेतून ज्या तापून-सुलाखून निघाल्या त्या गझलांचे आहेत. पण हे सगळे उर्दू गझलांचे संग्रह. उर्दू ही काही सगळ्यांना सहजतेने वाचता येणारी भाषा नाही. मग ‘राहत इंदौरी’ हे कवी/शायर म्हणून करोडो लोकांपर्यंत पोचले ते मुशायर्‍यांतील उत्साहाने धबधब्यासारख्या कोसळणार्‍या त्यांच्या परफॉर्मन्सच्या बळावर.

खरेतर मुशायरा म्हटला की तिथे नजाकत, हळुवारपणा यांचा वावर अपेक्षित. तिथे धबधब्याचे असणेच अनपेक्षित, कोसळणे ही तर दूरची गोष्ट; पण राहत इंदौरी यांनी मुशायर्‍यांची ही आचारसंहिता जणू धुडकावून लावली. त्यांच्या युट्युबवरील ध्वनिचित्रफिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा निव्वळ शब्दांतून नवरसांचा अद्भुत आविष्कार साकारणे म्हणजे काय असते, याची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही. उर्दू ही भाषा म्हणून गोड खरी, पण आपला या भाषेचा परिचय निव्वळ वरवरचा. मग अशा अर्धपरिचित भाषेतील कवीची अवघ्या तरुणाईवर ‘क्रेझ’ निर्माण करण्यात त्यांच्या या परफॉर्मन्सचा मोठा वाटा आहे. गुलजार यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीने त्यांना ‘मुशायरों का लुटेरा’ म्हटले आहे, ते उगीच नाही.

रंगाने सावळ्या, अंगाने शारीरिक व्यंग्य असलेल्या त्यांच्यासारख्या सामान्य प्रकृतीच्या माणसाने तरुण पिढीला आपले ‘कायल’ करून घेणे, इतके सोपे आहे काय? शेकडो गझला त्यांच्या जिभेवर अक्षरशः नृत्य करायच्या. पण नृत्य करायच्या म्हणजे ही केवळ शब्दांची आतिषबाजी नसायची. भवतालाचे गर्दगहिरे चित्र असायचे. कुणाला भले ते केवळ भारतातले वाटले असेल, पण त्यातून ठिबकणारी वेदना दुनियाभरांतील कुठल्याही ‘मुल्क’मध्ये सापडणारी असायची.

मुहब्बतों का सबक दे रहे हैं दुनिया को
जो ईद अपने सगे भाई से नहीं मिलते

प्रेमाच्या आणाभाकांमागील दांभिकता उघडी करणारी ही गझल असो अथवा

पहले दीप जलें तो चर्चे होते थे
और अब शहर जलें तो हैरत नहीं होती

सभोवताली वाढत चाललेल्या संवेदनहीनतेला शब्दबद्ध करणारी ही गझल असो; केवळ विशिष्ट राजवटीवरील टीका इतक्या मर्यादित परिप्रेक्ष्यात त्याकडे कसे पाहता येईल?

भगीरथाने स्वर्गातून गंगा आणावी तसे गझलेतून लोकांच्या मनांत ठणकणारी वेदना आणि धुमसणारा असंतोष ते मंचावर साक्षात करायचे….आणि सगळी मैफिल टाळ्या आणि वाहवाच्या गजरात निनादून उठायची. हे अजिबातही सोपे नाही. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे, ‘जर माझ्या गझलेत पाच शेर असतील तर प्रत्येक शेर प्रत्येकालाच आवडेल असे नाही; परंतु त्या प्रत्येक ‘शेर’चा एक स्वतंत्र ऑडियन्स असतो, आणि ज्याला-त्याला तो अपील होतो, याची मला कल्पना असते.’ एका गझलेत लाखो लोकांची आवड गुंफणं ही किती अवघड गोष्ट आहे, हे जाणकारांशिवाय इतरांना समजणे केवळ अशक्य आहे.

व्यक्तीशः मला असे वाटत आले आहे की असे करण्यात त्यांच्या फिल्मी गीतांचा काही खास वाटा नाही. भले पन्नास-साठ गाणी त्यांच्या नावावर असली तरी मागील तीस वर्षांतील कोणत्याही पिढीने त्यांच्या गीतांना डोक्यावर घेतले आहे,असे झालेले नाही. त्यांनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली,ती काही काळ लोकांच्या ओठांवर रेंगाळली, इतकेच.

म्हणून राहत इंदौरी हा जो कांही ‘फिनॉमिनॉ’ आहे, तो तयार झाला सर्वसाधारणपणे चार गोष्टींच्या बळावर. पहिली त्यांच्या गझलेतील सामर्थ्य, दुसरी त्यांचा मुशायर्‍यातील अद्भुत परफॉर्मन्स, तिसरी गोष्ट त्यांचे सर्वसामन्यांच्या बाजूने आणि व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभे राहणे आणि चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘साहित्य आणि जीवन’ यात एकसारखे राहणे. म्हणजे साहित्यात व्यवस्थेच्या विरोधातील डरकाळ्या आणि प्रत्यक्ष व्यवहारात व्यवस्थेच्या शिलेदारांसोबत गुळपीठ. असे त्यांनी केले नाही. भले त्यांचा विरोध कुणाला आक्रस्ताळा वाटेल, पण त्यासोबत तडजोड न करता ते प्रामाणिक राहिले.

समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे ‘मोदी राजवटी’वर त्यांनी केलेली जहरी टीका लोकांपर्यंत अधिक पोचली असली तरी अगदी आणीबाणीच्या काळातही त्यांनी सरकारला आपल्या कवितेतून धारेवर धरलेले होतेच; फक्त ते इतक्या सहजतेने लोकांपर्यंत पोचू शकले नाही. ते स्वतःच एक किस्सा सांगायचे. त्यांनी एका मुशायर्‍यात ‘सरकार चोर है’ असे म्हटले आणि दुसर्‍या दिवशी पोलीस त्यांच्या घरी चौकशीसाठी येऊन धडकले. पोलिसांनी विचारले, ‘सरकार चोर है’ असे तुम्ही म्हणालात हे खरे आहे का? ते म्हणाले, ‘हो. मी ‘सरकार चोर है’ असे म्हणालो, पण ‘हिंदुस्थान की सरकार चोर है’ असे कुठे म्हणलोय? त्यावर छद्मीपणाने हसत पोलीस अधिकारी म्हणाला, ‘..म्हणजे तुम्ही आम्हाला मूर्ख समजता की काय? कुठले सरकार चोरांचे आहे, इतकेही आम्हाला ठाऊक नाही का?’

थोडक्यात काय, सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्याचा गुणगौरव करणे हे कसे कवीचे काम असू शकते? तो सरकारच्या चुका दाखवेल, त्यांच्यावर टीका करेल; कारण लोकशाही देशाचा सन्माननीय नागरिक म्हणून हे सरकार त्यानेही निवडलेले असते, म्हणून ते त्याचेही सरकार असते.आणि आपल्या निवडीवर टीका करण्याचा त्याला पूर्ण अधिकार असतो.

‘फतवे का इंतजार’ या लेखात उदयप्रकाश यांनी म्हटले आहे, ‘दरअसल किसी भी राज्य और समाज में जो व्यक्ती सबसे अधिक संदिग्ध हुआ करता है, वह लेखक होता है, उसपर कोई संस्था, राज्यव्यवस्था, प्रबंधन कभी भरोसा नहीं कर सकता, करना भी नहीं चाहिये, करेगा तो पछतायेगा…..उन्हें ऐसा करना भी चाहिए, क्योंकी उनके अस्तित्व के सुरक्षा के लिये यह एक जरुरी कर्तव्य है, और लेखक को भी देशबदर, शहरबदर या दरबदर होने के लिये तैयार रहना चाहिए, क्योंकि यही उसकी फितरत भी है, अगर वह किसी राज्य, संस्थान, प्रबंधन, पार्टी या गिल्ड का वफादार हो गया तो दो के साथ उसे गद्दारी कारणी पडेगी, उसमें से एक होगी उसकी अंतरात्मा (अगर ऐसी कोई चीज उसके अंदर बची है तो) और दुसरा होगा उसके समय का साधारण मनुष्य, उसका साधारण पाठक…’

अशी ‘दुहेरी गद्दारी’ न करता राहत इंदौरी अखेरपर्यंत लिहीत राहिले, बोलत राहिले.

‘ये हवाएँ उड़ न जाएँ ले के काग़ज़ का बदन
दोस्तो मुझ पर कोई पत्थर ज़रा भारी रखो
ले तो आए शाइरी बाज़ार में ‘राहत’ मियाँ
क्या ज़रूरी है की लहजे को भी बाज़ारी रखो’

भवतालाने भ्रष्ट करण्याची बरीच शिकस्त केली खरी; पण अखेरपर्यंत ‘बाजारू’ झाले नाहीत. स्वतःच्या शायरीवर ‘जमीर का पत्थर’ ठेवत राहिले. भल्याभल्यांना ‘वाहून नेणार्‍या’ आजच्या काळात त्यांचे असे ‘निश्चल’ राहणे अनेकांना पसंत पडले नाही. म्हणून तर त्यांच्या निधनानंतरही जल्पकांच्या टोळधाडी शांत बसल्या नाहीत.‘बहुत से लोग रोये होंगे तेरी मय्यत में ऐ काले तीतर……मेरे मुल्क का तू अकेला गद्दार थोडी है’ अशा अत्यंत हीन शब्दांत जल्पकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण हयात असतानाच त्यांनी कधी अशा जल्पकांची पर्वा केली नाही, मग रूख्सत झाल्यानंतर त्यांना फिकिर कसली?

‘उसे जिंदगी और जिंदगी के बीच
काम से काम फासलां
रखते हुए जीना था
यही वजह थी की वह
एक की निगाह में हीरा आदमी था
तो दुसरी निगाह में
कमीना था’

खर्‍या कवीची निशाणी सांगताना राजकमल चौधरींविषयी धूमिलांनी हे जे म्हटले आहे, ते राहत इंदौरी यांच्यासाठीही समर्पक ठरणारे आहे.

‘किसीने जहर कहा है, किसीने शहद कहा
कोई समझ नही पाया जायका मेरा’

हे राहत साहेबांनी स्वतःबद्दल अगोदरच नोंदवून ठेवले आहे.
आता निदान त्यांच्या निधनानंतर तरी त्यांना ‘जहर’ म्हणून स्मरणात ठेवायचे की ‘शहद’ म्हणून आयुष्यात मिसळायचे, हे ज्याच्या त्याच्या फितरतीवर अवलंबून आहे !

-विश्वाधार देशमुख
-(लेखक भारतीय भाषांतील साहित्याचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -