घरफिचर्समुंबईतील सुप्रसिद्ध झवेरी बाजार

मुंबईतील सुप्रसिद्ध झवेरी बाजार

Subscribe

हा बाजार केवळ सोने, चांदी आणि हिर्‍या, माणिकांसाठीच प्रसिद्ध आहे असे नाही. या बाजाराच्या आजुबाजूला लाकूड, ब्रॉन्झचे अतिशय सुंदर फोटो फ्रेम मिळतात. फोटो फ्रेमसाठी हा परिसर संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. याशिवाय डिनर सेट्स, खोटे दागिने, खेळणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील लज्जतदार खाद्यपदार्थांसाठीही झवेरी बाजार प्रसिद्ध आहे.

काळबादेवी येथील झवेरी बाजार हा मुंबईतील सर्वात मोठा सराफ बाजार आहे. या बाजाराची स्थापना अर्थातच इंग्रजांच्या काळात झाली. साधारणत: १८६४ साली हा बाजार अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते. गल्लीबोळात वसलेला हा बाजार कधी काळी लोकवस्तीचा भाग होता. इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या इमारतींच्या तळमजल्यावर काही सराफांनी सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर खर्‍या अर्थाने हा बाजार आकारास आला. या ठिकाणी सोन्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू झाला. मग येथील जागांची खरेदीही सराफ व्यवसायात असलेल्या लोकांनी करण्यास सुरु केली. त्यातून हा बाजार अस्तित्वात आला. झवेरी बाजार हे सराफ मार्केट असले तरी जुन्या इमारतींसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे.

या बाजारातील अनेक इमारती या १८ व्या शतकात बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्यावर इंग्लिश स्थापत्याशास्त्राची झाक आहे. अनेक इमारती या व्हिक्टोरियन-गोथिक स्टाईलने बांधलेल्या आहेत. आज झवेरी बाजारात शंभरपेक्षा जास्त सोने-चांदी आणि हिर्‍यांची दुकाने आहेत. देशातील सुप्रसिद्ध ब्रॅण्ड जसे त्रिभुवनदास भिमजी झवेरी, तनिष्क, किर्तीलालस्, द्वारकादास चंडुमल, युटीझेड, धीरजलाल भिमजी झवेरी या झवेरी बाजारात आहेत. देशातील एकूण सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवहारांपैकी सुमारे ६५ टक्के व्यवहार हे याच झवेरी बाजारातून होतात. त्यामुळे मुंबईतील झवेरी बाजार देशातील सोने, चांदी आणि हिर्‍यांचे भाव ठरवतो, असे म्हटले जाते. अंबालाल झवेरी हे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध सोनार होते.

- Advertisement -

उत्तम प्रतीच्या सोन्यासाठी आणि सोन्याच्या डिझाईनसाठी त्यांची पेढी मुंबईत प्रसिद्ध होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये वाद झाला आणि त्यांची पत घटली. या झवेरी बाजारात मराठी सराफही पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. मात्र आता त्यांचे प्रमाण अगदीच कमी झाले आहे. या बाजारात मिळणारे सोने, चांदी, हिर्‍यांच्या दर्जाबद्दल शंका नाही. पण ते मान्यताप्राप्त दुकानातून खरेदी करायला हवे. या बाजारात सोन्या, चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच चांगल्या दर्जाचे सोने, चांदीची नाणी, सोन्याचे बार, हिर्‍यांचे दागिने मिळतात. झवेरी बाजारातील सोन्या, चांदीच्या दागिन्यांचा दर्जा देशात सर्वोत्तम मानला जातो. त्याचप्रमाणे मोती, मौल्यवान खडे, मौल्यवान धातूंचीही बाजारात विक्री होते. पुन्हा आपल्याला हव्या त्या कलाकुसरीचे दागिने येथे मिळू शकतात. तसेच आपल्या मनासारखे दागिने घडवून घेण्याचा पर्यायही झवेरी बाजारात उपलब्ध असतो.

भारतातील सर्वाधिक सोन्या, चांदीच्या दागिन्यांची निर्यात ही झवेरी बाजारातून होते. ही निर्यात प्रामुख्याने मध्य आशियातील देशांमध्ये होते. या बाजारात मौल्यवान धातू आणि हिर्‍या, माणिकांचा व्यापार होत असल्यामुळे या मार्केटवर चोवीस तास पोलिसांची करडी नजर असते. तसेच बाजारातील सीसीटीव्ही कॅमेरेही सतर्क असतात. त्यामुळे या बाजारात चोरी, दरोड्याचे प्रकार तसे कमी होतात. हा बाजार केवळ सोने, चांदी आणि हिरे, माणिकांसाठीच प्रसिद्ध आहे असे नाही. या बाजाराच्या आजुबाजूला लाकूड, ब्रॉन्झचे अतिशय सुंदर फोटो फ्रेम मिळतात. फोटो फ्रेमसाठी हा परिसर संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. याशिवाय डिनर सेट्स, खोटे दागिने, खेळणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील लज्जतदार खाद्यपदार्थांसाठीही झवेरी बाजार प्रसिद्ध आहे. झवेरी बाजारात मिळणारा खिचा पापड, दाबेली, छास, सॅण्डविच खाण्यासाठी मुंबईतील अनेक भागांतून लोक येथे येतात. झवेरी बाजारात जाण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मरिन लाईन्स आणि मध्य रेल्वेच्या मशिद बंदर स्टेशनला उतरणे जवळचे ठरते.

- Advertisement -

मुंबईतील अनेक बाजारांमध्ये झवेरी बाजार हा सर्वात मौल्यवान बाजार आहे. झवेरी बाजारची अरुंद गल्लीबोळ, येथे असलेली गर्दी आणि या बाजारात खुट्ट जरी झाले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे उमटणारे पडसाद यामुळे हा बाजार नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरला आहे. १९९३ साली येथे प्रथम बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर २५ ऑगस्ट २००३ साली आणि १३ जुलै २०११ साली येथे बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोक मरण पावले आहेत. पण दहशतवादी आपली दहशत काही निर्माण करू शकलेले नाहीत. इतके बॉम्बस्फोट होऊनही आजही झवेरी बाजाराची गर्दी कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -