घरफिचर्समन अजून झुलते गं!

मन अजून झुलते गं!

Subscribe

दिल का भंवर

परवा लता मंगेशकरांचा 89वा वाढदिवस झाला. सर्व वर्तमानपत्रांत, चॅनेल्सवर त्याची बातमी होणं साहजिक होतं. रेडिओवर त्यांची गाणी लागणं हाही एक तसाच उपचार होता. तोही अंमलात आणला गेला. दिलीपकुमारनी त्यांना कसं भर व्यासपीठावरून जाहीरपणे, ‘लता की आवाज कुदरत का एक करिश्मा है‘ म्हटलं, आचार्य अत्रेंनी त्यांना कसं, ‘भगवंताची बासरी‘ म्हटलं, हे पुन्हा एकदा सांगितलं गेलं. लता मंगेशकर हे आभाळ व्यापून टाकणारं इतकं मोठं नाव समोर आल्यावर, त्या नावाची थोरवी सांगताना हे सगळं सांगणं आवश्यक असतं हे मान्यच, पण आजच्या पिढीला लतादिदींची थोरवी खरंतर वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या शब्दात सांगायला हवी, असं कधी कधी वाटतं.

त्या काळात दोन थोर माणसं लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होती. एक क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि दुसर्‍या अर्थातच, लतादिदी!…या दोन्ही माणसांच्या काळात त्यांच्या क्षेत्राशी संबंधित तांत्रिक संसाधनं आजच्या काळाच्या तुलनेत तशी आधीअधुरीच होती. थोडक्यात सांगायचं तर सुनील गावसकरांच्या काळात कुठे हेल्मेट होतं? कुठे थर्ड अंपायर आणि त्याचा रिव्ह्यू होता? पण एक अल्पस्वल्प उंची लाभलेला, सरळ सांगायचं तर एक ठेंगणा माणूस पॅव्हेलियनमधून तरातरा बाहेर पडायचा. एकाग्रता साधण्यासाठी आपल्याच कोशात असायचा. गार्ड घ्यायचा आणि उरात धडकी भरवणार्‍या महाकाय वेगवान गोलंदाजांचा शास्त्रशुध्द पद्धतीने मुकाबला करत संध्याकाळपर्यंत शतक झळकवायचा. शतक झळकवल्यावर कुठे आक्रस्ताळी उडी मारणं नाही, की हातातली बॅट नाचवणं नाही…की आता शतक झालं आहे. म्हणून आडवेतिडवे फटके मारण्याची बेदरकारी नाही.

- Advertisement -

लतादिदींचंही अगदी तसंच. एक सर्वसाधारण उंची लाभलेल्या बाई षण्मुखानंदसारख्या हॉलमध्ये लालसर-पांढुरक्या साडीमध्ये यायच्या. दुसर्‍या खांद्यावरही नेटका पदर घेतलेला, हरीश भिमाणी किंवा अमीन सयानींसारख्या भारदस्त आवाजाच्या सूत्रसंचालकांनी त्या व्यासपीठावर येण्याआधीची अलंकारिक ओळख करून दिली की त्या ओळखीने बुजून जाऊन पार लाजत लाजत, प्रेक्षकांपुढे कमालीचं झुकत-वाकत माईकपर्यंत यायच्या. गाणं गातानाही इतक्या लाजत-बुजत गायच्या की इतकं अवघड गाणं ह्या इतक्या लाजत-बुजत तितक्याच समर्थपणे गाऊ शकतातच कशा, असा प्रश्न पडावा. कुठे चित्रविचित्र हातवारे नाहीत, एखादी हरकत किंवा तान घेताना उगाचच चेहरा आकसलेला नाही, ’अपलम-चपलम’ गायचं आहे, म्हणून त्याच्या तालावर किंचित थिरकणं नाही, नाचणं तर दूरच! गाणं गाताना कुठेही मापात पाप नाही, इतकं काटेकोर गाणं झाल्यानंतर प्रेक्षकांमधून सरसरून आलेल्या टाळीचा कुठे उन्मादाने स्वीकार नाही. गाणं संपल्यावर पुन्हा झुकून-वाकून अगदी खर्‍याखुर्‍या अदबीने मनोभावे नमस्कार…आणि विंगमधून जशा सहजपणे आल्या तशाच सहजतेने निघून जाणं. कुठे लोकप्रियतेचं वलय कुरवाळणं नाही की कसला झगमगाट नाही!

लतादिदींच्या गाण्यातली त्यांची अदाकारी पेश करण्याची ही साधीसुधी पद्धत आजच्या पिढीला कुणीतरी सांगण्याची खरोखरच गरज आहे. ह्या ठिकाणी संगीतकार श्रीनिवास खळेंनी सांगितलेला एक किस्सा आवर्जुन सांगण्यासारखा आहे. ’या चिमण्यांनो परत फिरा रे…घराकडे आपुल्या’ हे गाणं खळेंनी केलं तेव्हा त्यांना ते लतादिदींकडूनच गाऊन घ्यायचं होतं. पण लतादिदींच्या व्यग्र वेळापत्रकातून या गाण्यासाठी त्यांना खळेंना वेळ देता येत नव्हता. पण अखेर त्यांना वेळ मिळाला आणि हे गाणं जेव्हा त्या गायल्या तेव्हा भावनेने ओथंबलेल्या या गाण्याच्या इतक्या सुंदर सुरावटीने भारावून जाऊन लतादिदींनी या गाण्याचं मानधन घेतलं नव्हतं. हे गाणं आपल्याला गायला मिळालं, हे त्या आपलं भाग्य समजल्या होत्या. लतादिदींच्या कलाकार म्हणून कारकिर्दीतला हा किस्सा आज सांगणं महत्वाचा आहे.

- Advertisement -

दिवाळीनिमित्त काढलेल्या रांगोळी प्रदर्शनात लतादिदींचं चित्र रेखाटलं जाणं हा आता एक नित्याचा भाग झालेला आहे. अशाच एका रांगोळी प्रदर्शनात लतादिदींच्या चित्राखाली लिहिलेली एक ओळ मात्र कायम लक्षात राहिली. त्या चित्राखालची ओळ होती- ‘झाले जुने पुराणे तरी फूल वेलीवर डुलते गं, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं!‘…आजच्या काळाच्या निकषावर लता मंगेशकर या गायक-कलाकाराचं ते समर्पक वर्णन आहे. कारण लतादिदींची गाणी जुनी झाली असतील, पण ती कधीच जुनाट ठरणार नाहीत. हे आजचे रिअ‍ॅलिटी शो पहाताना तर स्पष्टच दिसतं. या रिअ‍ॅलिटी शोंमधली कोवळी मुलंसुद्धा आपलं गाण्यातलं कौशल्य दाखवताना लतादिदींच्या गाण्याची निवड करतात, यातच लतादिदींच्या गाण्यांचं चिरंजीव अस्तित्व दिसून येतं.

राज ठाकरेंच्या राजकीय धोरणांबद्दल आपली मतमतांतरं असतील नसतील, पण त्यांनी एकदा एका मराठी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, मी लता-आशा ऐकल्या आहेत हो, आता त्यानंतर आणखी काय ऐकणार!…लतादिदींच्या गाण्यातलं मोठेपण अशाच शब्दात जेव्हा व्यक्त होतं ते आजच्या कुणाला तरी सांगण्याची गरज आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -