घरफिचर्ससोचने का काम तो मालिक करता है !

सोचने का काम तो मालिक करता है !

Subscribe

गोपाळ गणेश आगरकर एकदा म्हणाले होते, ‘लोकहो तुम्ही विचारकलहाला का घाबरता?’ आज आपण विचार करायलाच घाबरतो आहोत. आपण विचार करण्याचं कामच आऊटसोर्स केलं आहे. आपल्याला काय हवं आहे हे अ‍ॅमेझॉन, गुगल, फेसबुक, स्विगी, झोमॅटो हे सांगतील. आपुन के डोक्याला शॉट नको भाय.

फोटो क्रॉप करणं, फोटो काढताना श्वास रोखून धरणं, जुने फोटो पोस्ट करणं, चेहर्‍याचाच फोटो काढणं कॅमेर्‍याचा अँगल बदलणं, सोबत कुणी असताना कुणाच्या तरी मागे पोट लपवून उभं राहणं असे अनेक उपाय करून झाले तरी जाडी काही कमी होईना. त्यात लोक व्यायामासारखे क्षुल्लक उपाय सुचवू लागले. अशा भयाण काळात डॉ.जगन्नाथ दीक्षितांची युट्युबवर भेट झाली. दोन वेळेस जेवण करायचं आणि मध्ये काहीच खायचं नाही, असा हा प्लान ऐकला.

५५ मिनिटांत जेवण उरकणे, त्या ५५ मिनिटांत हवं ते खाण्याची परवानगी आहे, असं ऐकल्यावर भेळपासून ते पावभाजीपर्यंत कुठल्याही खाद्यपदार्थावर अन्याय होणार नाही, याविषयी खात्री झाली. तरीही प्रोटीन्सचं अधिक प्रमाण हवं, असं दीक्षितांचं म्हणणं होतंच. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या मांडणीला पुढे नेत दीक्षितांनी सुचवलेला ‘डाएट प्लॅन’ इंटरेस्टिंग आहे आणि हे डाएट फॉलो करतानाच्या गमतीजमती तर आणखी भन्नाट आहेत. दीक्षित डाएट जिंदाबाद ही मोहीम मागील वर्षी सुरू केली आणि मजेशीर प्रसंग अनुभवायला, ऐकायला मिळू लागले.

- Advertisement -

लग्नामध्ये दीक्षित डाएटवाल्यांची वेगळी रांग तर ऋजुता दिवेकर डाएटवाल्यांची वेगळी रांग, असे चित्तचक्षुचमत्कारिक प्रकार सुरू झाले. एकदा एका कार्यक्रमानंतर आयोजकांनी स्वीट्स दिलं आणि माझी ती जेवणाची वेळ नव्हती, नंतर खाऊ या म्हणून मी ते हातातच ठेवलं. आयोजक म्हणू लागले, ‘तुम्हाला स्वीट्स चालत नाही का?’ काही वेळानं आमच्या गावाकडचं चालत नाही का, वगैरे त्यांनी प्रश्न केला असता त्यामुळे मी घाबरुन खाऊन टाकलं आणि दीक्षित-द्रोह केला. एकदा एका परिचित काकांच्या घरी गेलो होतो तेव्हा मला पाहून काकांनी काकूंना आदेश दिला, ‘अग जरा चहा टाक, पोहे कर.’ काकू पुणेरी असल्याने मी काही बोलायच्या आतच त्या म्हणाल्या, ‘अहो श्री दीक्षित डाएट करतोय ना. त्याला कसं चालेल असं अवेळी खाणं’ मान डोलावण्याशिवाय माझ्या हाती दुसरं काय होतं.

म्हटलं दीक्षित डाएट जिंदाबाद! दीक्षित की दिवेकर, असा एक सनातन वाद आता मध्यमवर्गीय सदनिकांमध्ये सुरू असतो तो काही सुटणार नाही; पण डाएटबाबत अनेकजण जागरुक आहेत, हे नक्की. करीनासारखी झिरो फिगर करायची आहे. कुणाला तर रणबीरसारखं स्लिम ट्रिम व्हायचं आहे. काहींना त्यामुळे पदार्थांवर कॅलरीच दिसतात अशा व्यक्तींना. सचिन तेंडुलकरबाबत एक अतिशयोक्त विधान केलं जायचं- सचिनला प्रत्येक बॉलवर रन दिसायचे ! अगदी तसंच डाएट करणार्‍यांना प्रत्येक डिशमध्ये कॅलरीज दिसतात. त्यासाठीचा आटापिटा आणि अट्टाहास ही स्वतंत्र कहाणी आहे.

- Advertisement -

पोटात काय जावं, याबाबत एवढे आग्रही असणारे आपण डोक्यात काय जातंय, याविषयी तेवढे जागरुक का नसतो, असा प्रश्न मला सतत पडत आलाय. आपण काय वाचतो किंवा काय पाहतो किंवा आपल्याला काय दाखवलं जातं, याविषयी आपण सतर्क नसतो. सोशल मीडियावरून येणारा कचरा आपण खो खो दिल्यासारखा पुढे पुढे देत राहतो. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ च्या ऐवजी ‘फेक न्यूज से फेक न्यूज बढाते चलो’ असं आपण आपल्या नकळत करत असतो. नव्या नोटांमध्ये चिप आहेपासून ते युनोने भारतीय राष्ट्रगीताला पुरस्कार दिल्याच्या बातम्या आपण सर्रास फॉरवर्ड करत असतो. भारतातच नव्हे तर जगभरात फेक न्यूजची इंडस्ट्री एवढी तेजीत आहे की प्रतीक सिन्हासारख्या व्यक्तींना Alt News नावाची वेबसाइट सुरू करावी वाटली. खरं काय, खोटं काय याची शहानिशा या साइटवर करता येते.

ब्रेक्झिट असो की अमेरिकेतील २०१६ ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक फेक न्यूजच्या आधारे तिथे गडबड करता आली. केम्ब्रिज एनलिटिकाने तर तुमची आमची आवड लक्षात घेऊन आपल्यापर्यंत विशिष्ट प्रकारचे मेसेज /पोस्टस येतील, असे कार्यक्रम डिझाइन केले. आपण आंधळेपणाने जे जे समोर येईल ते ते पाहत, वाचत किंबहुना एन्जॉय करत राहिलो. दुसरीकडे ‘हा’ मेसेज २१ जणांना पाठवल्यास भाग्य उजळेल, असा दृढ विश्वास ठेवून पोस्टस फॉरवर्ड करत राहिलो. राज्यकर्ते आणि कंपन्या करत असलेला प्रपोगंडा एका बाजूला आणि आपल्या समाजात रुजलेल्या अंधश्रध्दा, कर्मठता दुसर्‍या बाजूला. दोन्हीला इंधन सोशल मीडियाचे. या सार्‍यातून विवेकाचा विचार बाजूला पडून कचर्‍याचा ढीग रचला गेला. आपण विचार करण्याच्या ऐवजी लोंढ्यासोबत वाहत गेलो. जेवताना कॅलरीबाबत विचार करणारे आपण, विचार करण्यात कॅलरी खर्च करत नाही, इथे खरी मेख आहे. व्हेज/नॉनव्हेज खाणं ही ज्याची त्याची निवड आहे, त्या निवडीवरून कोणी कुणाचा खून करता कामा नये, हा विचार आपण करत नाही. आपण जिवंत असण्याचं एकमेव लक्षण म्हणजे आपण विचार करतो; पण आजकाल आपण विचार करणंच टाळतो आहोत. गोपाळ गणेश आगरकर एकदा म्हणाले होते, ‘लोकहो तुम्ही विचारकलहाला का घाबरता?’ आज आपण विचार करायलाच घाबरतो आहोत.

आपण विचार करण्याचं कामच आउटसोर्स केलं आहे. आपल्याला काय हवं आहे हे अ‍ॅमेझॉन, गुगल, फेसबुक, स्विगी, झोमॅटो हे सांगतील. आपुन के डोक्याला शॉट नको भाय. ‘एक रुका हुआ फैसला’ नावाचा एक सिनेमा आहे या सिनेमात मुलाने वडिलांचा खून केला असा मुलावर आरोप झालेला असताना १२ जणांची समिती आरोप निश्चित करणार असते. त्यावेळी या समितीतला एक सदस्य दुसर्‍याला विचारतो, ‘आप क्या सोचते हो ?’ तो म्हणतो, ‘मैं ? मैं कुछ नही सोचता. सोचने का काम तो मालिक करता है’ आपण विचार करण्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायला हवी. डोक्याला शॉट नको म्हणून आपण विचार करण्यापासून दूर पळालोत तर उद्याचा सूर्यही प्रायोजित केलेला असेल. तो बॉस सोचना तो पडेगाच.

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -