घरफिचर्सचावदिस

चावदिस

Subscribe

चावदिसाच्या आदल्या दिवशीपासून या सोहळ्याला सुरुवात होते. प्रथम चावदिस हा शब्द कसा प्रचलित झाला हे बघू. चावदिस ह्या शब्दाची उत्पत्ती " चौ + दिस " म्हणजे त्या पंधरवड्यातील चौदावा दिवस, म्हणजेच नरक चतुर्दशी. हा दिवाळीचा पहिला दिवस. हा दिवस कोकणात वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे. कार्तिक महिन्यातली थंडी हिव भरवत असते, ही थंडी मुंबईत अनुभवता येत नाही. दातावर दात आपटत एकमेकांशी बोलणेदेखील कठीण होते.

एव्हाना तळकोकणात भात कापून, भात झोडून, त्याचे मुडी, बिवळे (आता कोण मुडी, बिवळे बांधत नाही तरी एक परंपरा म्हणून उल्लेख झाला.) बांधून एकावर रचून नवीन धान्य घरात आलं आहे. मध्यतरी ऑक्टोबरमधील उन्हाने हैराण झालेला कोकणी शेतकरी हल्ली गारठवून टाकणारी सकाळची थंडी अनुभवतो आहे. एकूण वातावरण प्रफुल्लित करणारं आहे. सकाळच्या वातावरणात पक्ष्यांचे विविध आवाज ऐकायला मिळतात. थोडंसं धुकं ओसरल्यावर मग शेताच्या मेरेवर कवडे छाती पुढे काढून बसलेले आहेत. भात कापून झाल्याने शेत संपूर्ण ओस दिसतंय.”यावर्षी भात कसा आसा?” असा प्रश्न कोणी कोकणी शेतकर्‍यांना विचारावा. कोकण्याचं उत्तर ठरलेलं, “गुदस्ता बरा हुता, ह्यावर्षी काय राम नाय” . भले शेती पिको वा ना पिको. गेली पस्तीस वर्षे हे उत्तर मी कायम ऐकत आलोय.

शेतावरून फेरफटका मारून भावाच्या चक्कीवर (गिरणीवर) आलो की, पिशव्याची एक भलीमोठी रांग बघायला मिळते. बाहेर गिरणीवरची गिर्‍हाईके बोलत बसलीत. त्यातलाच कोणतरी ओळखीचा विचारतो,”काय वो चाकरमान्यानु! मधीसशे इलास ”
“कॉलेजाक सुट्टी आसा म्हनान इलय ”
“बरा केलास, परवा चावदिस आसा, आता फॉव खावन जावा “

- Advertisement -

त्याक्षणी माझ्या एकदम लक्षात आलं की, होय की चावदिस अगदी तोंडावर आला. चावदिस जवळ आला की चक्कीवरदेखील नवीन धान्याचे (भाताचे) पोहे करण्यासाठी गर्दी होते. पूर्वी नवीन भात आलं की व्हायनात कुटून घरोघरी पोहे करायची पद्धत होती, पण आता गावोगावी चक्या, गिरणी झाल्यात त्यामुळे भात कुटून, भाजून व्हायनात कुटून पोहे बनवण्याची पद्धत आता बंद झाली.

चावदिसाच्या आदल्या दिवशीपासून या सोहळ्याला सुरुवात होते. प्रथम चावदिस हा शब्द कसा प्रचलित झाला हे बघू.चावदिस ह्या शब्दाची उत्पत्ती ” चौ + दिस ” म्हणजे त्या पंधरवड्यातील चौदावा दिवस, म्हणजेच नरक चतुर्दशी. हा दिवाळीचा पहिला दिवस. हा दिवस कोकणात वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे. कार्तिक महिन्यातली थंडी हिव भरवत असते, ही थंडी मुंबईत अनुभवता येत नाही. दातावर दात आपटत एकमेकांशी बोलणेदेखील कठीण होते.

- Advertisement -

यादिवशी सर्वात आधी पूजा केली जाते ती न्हाणीघरातल्या मडक्याची. आदल्या दिवशीच मडक्याच्या तोंडाला झेंडू आणि आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण बांधलं जात. हल्ली दारोदारी आकाश कंदील लावले जातात, तुळशी वृंदावनाजवळ पणत्यांची रोषणाई करून घरातल्या लेकी सुना या वृंदावनजवळ रांगोळी काढतात. इथपर्यंत सर्व पारंपरिक पद्धतीने जसे इतरत्र होते तसेच तळकोकणातदेखील होते.

यादिवशी बैलाच्या शिंगांना रंग लावण्याची पध्दत आहे. अगदी गोठ्यातील लहान वासरांनादेखील नुकतीच शिंगं फुटत असतील तर त्यांच्यादेखील त्या छोट्या शिंगांना रंग लावला जातो. करंज्या, लाडू, शंकरपाळ्या, चकल्या इत्यादी पदार्थ कोकणात दिवाळीला कोणीच बनवत नाहीत. कोकणात चावदिसाच्या दिवशी पोहे बनवले जातात. वाडीतले सर्वजण एकत्र एकमेकांकडे हे पोहे खाण्याच्या निमित्ताने जातात. वाडीतले हे सौहार्दाचे संबंध साजरे होणार्‍या सणांवर आधारलेले असतात. सण साजरे केले जातात तेच मुळात अशाप्रकारे ग्रामसंस्कृती टिकून राहण्यासाठी. गणपतीला एकमेकाकडे भजनाला जाणे किंवा दिवाळीला एकमेकाकडे पोहे खाण्यानिमित्त जाणे हा ग्रामसंस्कृतीतला शिष्टाचार आहे.

एकमेकांकडे पोहे देण्याघेण्याचा कार्यक्रम झाला की, लोक आपल्या कामाला लागतात. कोकणातल्या शेतकर्‍यांना या दिवसात सवड नसते. आपली कांबळी घेऊन तो बैल-गाई सोडतो आणि थेट रान गाठतो. दुपारीदेखील बैल घेऊन गोठ्यात बांधले की मग जेऊन थोडी टकली टेकून. तो माडाच्या झाडावर चढून दोन नारळ काढेल आणि नारळ सोलून पुढल्यादारी ठेऊन देईल आणि चाकरमान्यांना उठवण्यासाठी ” अरे मेल्यानु ! उठा या दुपारच्या झोपन्यांनं तुमची पोटा वाडली हतं, उठा आणि चलत देवळात चला, वायच चरबी झडान जायत “

अशा या तिरकस बोलण्यावर कोण काय बोलेल? सकाळची पोटात उबारा देणारी थंडी आणि दुपारची उन्हाबरोबर किंचित बोचणारी थंडी अंथरुणातून उठू देत नाही. तरी देवळात जायचं म्हणजे उठायला हवं .दुपारचा चहा घेऊन सदरेवर ठेवलेले दोन नारळ घेऊन देवळाकडची वाट चालायची. वाटेत कोणाच्या लगडलेल्या केळी, कुठे तरी अननस अशी फळं बघायला मिळायची. हा महिना काही फळफळावळीचा महिना नाही.

वीस-पंचवीस मिनिटे चालल्यानंतर देऊळ दिसू लागते. देवळात गुरव साफसफाई करत असतो. तो पोटभरु गुरव असल्याने कोण आलेत, चाकरमानी की गावकरी याची त्याला विशेष काही पडली नसते तो दिलेला नारळ घेतो, नाव विचारतो. तोंडातल्या तोंडात काही तरी बडबडतो आणि चाकरमान्याने दिलेले वीस-तीस रुपये खिशात ठेऊन ठेवलेला नारळ फोडून चार फोडी सगळ्यांना वाटतो. “चला तकडे पयलाडी जावया तकडे घाडी गावतलो कडकडीत गार्‍हाणा घालतलो असं म्हणत सगळे पयलाडी देवळात जातात. त्या पयलाडच्या देवळात पोचल्यावर दोन चार मानकरी आणि घाडी बसलेला असतो. आता इथे साग्रसंगीत सोपस्कार होणार हे सांगणेच नको. “बाबा, चल हे चाकरमानी इलेत वायचं नारळ ठेय नि गार्‍हाणा घाल “

” गाराणा घालूया तर एवढे चाकरमानी इलेत, रे झिला तकडे देवीकडे नारळ ठेय नि हात झोडून उभे र्‍हवा ”
सगळे चाकरमानी हात जोडून उभे राहिले की बाबू घाडी आपल्या खड्या आवाजात

बा देवा महापुरसा
घरच्या घरवाल्या, ब्राह्मणपूरसा,
लिंगा, जैनां, ब्राह्मणा, गांगो महाराजा,
मूळपुरशा, पाच पुरी बारा आकारा
राजसत्तेचो देवचार, पूर्वसत्तेचो देवचार
धरतीचो देव, भूमीचो आकारी नि चौर्‍यांशी खेड्याचो अधिकारी
त्याचप्रमाणं
आई ईटलाई, पावणाई, बा देवा नागेश्वरा
हे बाय, हे चाकरमानी चावदिसाच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे तुझी ओटी भरूक इले हत त्याका
सुबुद्धी देवन वर्षाकाठी तुझी सेवाचाकरी त्यांच्या हातून होवून दे
ह्या कार्यात खय बारिक सारीक चूक झाली आसात तर मखलास कर
काय बारीक सारीक आडो माडो आसात तो तुझ्या पायाखाली दाबून लेकरांची बरकत कर गे आवशी
व्हय महाराजा !

असे कडकडीत गार्‍हाणं घातलं की आलेला चाकरमानी खूश होतो. चावदिसाच्या कोकणात विशेष सणसोहळा नसतो पण एकमेकांकडे जाऊन पोहे खाण्यात मजा आहे. आज गोठ्यात बैल नाहीत म्हणून बैलांच्या शिंगांना कोणता रंग द्यायचा यावरून मुलांमध्ये भांडणं नसतात. हल्ली मुंबईसारखा फराळदेखील तळकोकणात बाजारात मिळतो. पण पोटात उबारा आणणारी थंडी, दातावर दात आपटत “गोविंदा रे गोपाळा” म्हणत तुळशीपुढे कारीट फोडायची मजा गावातच ! मुंबईत राहून मॉलमधून कितीही खरेदी केली तरी बाबांनी एकाच तागाच्या कपड्यांनी शिवलेले शर्ट आणि इतर कपडे आठवतात. एकाच रंगाच्या कपड्यावरना कोण कोणाची भावंडे हे सहज ओळखता यायचे, रंगाची ओळख आयुष्यभर लक्षात राहण्याजोगी आहे.

या गोडाच्या दिवसात घरातले कोणतरी रानात जाऊन सातवल वनस्पतींची सालं घेऊन येत आणि पाट्यावर चेचून त्यांचा रस काढून तो सर्वांना देत. तो पेलाभर रस पिताना नाकी नऊ यायचे. उभ्या आयुष्यात इतका कडू रस प्यायला नसेल, ही सातवल वनस्पती मूळची कडूच ! डोळे बंद करून थेंब थेंब करत तो रस आम्ही पोटात ढकलत असू. आयुष्यात गोडाबरोबर कडू अनुभवपण घ्यावा असे तर ही सातवल वनस्पती शिकवत नसेल? , या कडू आठवणी प्रसंग गिळून टाकून समृद्ध जीवन जगावे हे चावदिसाचे दिवस शिकवतात. चावदिसाच्या आठवणी काही केल्या मनातून जात नाही याचं कारण मुळात हेच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -