घरफिचर्सये तेरा घर... ये मेरा घर!

ये तेरा घर… ये मेरा घर!

Subscribe

पडद्यावर ‘घर’ हा विषय हळवा असतो. त्यामुळे मकान किंवा वास्तू, इमारत, बंगला, हवेली अशा निर्जीव शिर्षकाचे सिनेमे रामसेंच्या भूतपटात असत. सामान्य माणसाचं घर असतं. त्यामुळे ऐंशीच्या दशकात केवळ ‘घर’ या विषयाला वाहिलेले अनेक सिनेमे पडद्यावर आले. ‘घर-द्वार’, ‘घर-संसार’, ‘घर’, ‘घर एक मंदिर’, ‘कहानी घर घर की’, ‘प्यार का मंदिर’ असे ऐंशीच्या दशकांत आलेले सिनेमे म्हणजे घरपटच की!

सामान्य माणसासाठी ‘घर’ हा विषय मनातल्या हळव्या कोपर्‍यात जपलेलं स्वप्न असतं. आपली सगळी जमापुंजी गुंतवून माणूस घर घेतो. करत असलेला व्यवसाय, नोकरीतल्या एकेका दिवसात केलेल्या मेहनतीची एकेक वीट उभारून हा स्वप्नमहाल उभारला जातो. जुनी-जाणती माणसंही घरासारखीच असतात, अनुभवांच्या भिंतीच्या आधाराने ही माणसं उभी असतात. हिंदी पडद्यावर मग या माणसांच्या व्यक्तिरेखा होतात आणि पडद्यावरच्या व्यक्तिरेखेतून साकारलेल्या घरांची एकेक वसाहत उभी होत जाते.

पडद्यावर ‘घर’ हा विषय हळवा असतो. त्यामुळे मकान किंवा वास्तू, इमारत, बंगला, हवेली अशा निर्जीव शिर्षकाचे सिनेमे रामसेंच्या भूतपटात असत. सामान्य माणसाचं घर असतं. त्यामुळे ऐंशीच्या दशकात केवळ ‘घर’ या विषयाला वाहिलेले अनेक सिनेमे पडद्यावर आले. ‘घर-द्वार’, ‘घर-संसार’, ‘घर’, ‘घर एक मंदिर’, ‘कहानी घर घर की’, ‘प्यार का मंदिर’, असे ऐंशीच्या दशकांत आलेले सिनेमे म्हणजे घरपटच की! त्यांत राजकिरण नावाचा अभिनेता कायम एक बायकोच्या ताब्यात असलेला स्वार्थी भाऊ असतो.बहुतांशी मिथुन किंवा गोविंदा, ऋषी, जितेंद्र हे अशा घरपटांचे समजुतदार हिरो असतात. मशीनवर कपडे शिवून मुलांना मोठं करणार्‍या निरुपा रॉयसारख्या सोशिक बाईपोटी जन्मलेली ही चांगली मुलं असतात. लग्नाची एक बहीण असते, तिच्यासाठी हुंड्याची गरज असते. काही कारणांमुळे आलोकनाथ किंवा डॉ.लागू, अनुपम खेर, कादर खान अशा साध्या-सरळ आयुष्य जगणार्‍या बापाची नोकरी जाते. घरावर जप्ती येते आणि मग सगळ्या स्वार्थी मुलांपैकी आईबाप आणि घरावर प्रेम करणारा चांगला समजुतदार मुलगा आपलं घर आलेल्या या आरिष्ट्यातून वाचवतो, अशीच कथानकं या घरपटांची थोड्याफार फरकानं ऐंशी-नव्वदच्या दशकांत होती.

- Advertisement -

‘इक घर बनाऊंगा…तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने’
१९६३ मध्ये विजय आनंदचा ‘तेरे घर के सामने’ रिलिज झाला आणि नायक नायिकेच्या प्रेमपटांतून देव आनंद-नूतननं हिंदी पडद्यावर घरमहात्म्य साकारलं. जागतिकीकरणाच्या आधी घर घेणं हे सामान्यांसाठी स्वप्न होतं. मग सिनेमातही घर घेण्याचा संघर्ष कथानकाचा विषय होणारच असतो. ‘घरौंदा’ (१९७७) मध्ये याच स्वप्नाला कथानकाचं विषय घेऊन पडद्यावर साकारतो. भीमसेनचं दिग्दर्शन असतं पटकथा गुलजारची असते, संगीत जयदेवचं असतं. हिंदी पडद्यावर महिन्याचा पास काढून लोकल बसमधून फिरणार्‍या सर्वसामान्य हिरोचं प्रतिनिधीत्व करणार्‍या अमोल पालेकरांचा हाकलात्मक, संवेदनशील सिनेमा असतो. यात अमोल संदीप असतो तर झरीना वहाब छाया असते. अमोलला घर घेणं खासगी नोकरीतल्या तुटपुंज्या पगारामुळे शक्य नसतं. त्यामुळे तो आपलं प्रेम, अर्थात झरीनासोबत एक दोघांच्या आयुष्यावर एक मोठा प्रभाव टाकणारी तडजोड करतो. कथानकात पुढे डॉ. लागू (मि. मोदी) येतात. या तडजोडीतून संदीपच्या घराच्या भिंती उभ्या राहू शकतात; पण त्या घरात राहण्यासाठी आता झरीना म्हणजेच छाया त्याच्या आयुष्यात नसते. डॉ. लागूंच्या उंच इमारतींमध्ये बांधली जाते ती. घरांपेक्षा माणसांमुळे येणारं जिवंत घरपण महत्त्वाचं असतं हे पश्चाताप दग्ध झालेल्या अमोलला जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. ‘दो दिवाने शहर में…’ या गाण्यांतून कथानकाचा सुरू झालेला हा प्रवास ‘एक अकेला इस शहर में…’ असा अमोलच्या एकाकीपणापर्यंत पोचतो आणि संपतो. घरविषयाचा आणखी एक प्रेमपट म्हणून ‘साथ-साथ’ १९८२ मध्ये रिलिज होतो. ‘ये तेरा घर …ये मेरा घर…’ असं भविष्यातल्या सुखाच्या घराचं स्वप्न फारुख शेख आणि दिप्ती नवल यांनी गाण्यातून पाहिलेलं असतं. हे घर विश्वास आणि प्रेमातून उभारलं जातं.

आरती (रेखा) आणि विकास (विनोद मेहरा)चा १९७८ चा सिनेमा ‘घर’ लक्षात राहतो तो वेगळ्या सामाजिक कारणामुळे… अत्याचार झाल्यानं आघात झालेल्या मनांतून उभारण्याआधीच उद्ध्वस्त झालेलं घर, हा ‘घर’ सिनेमाचा विषय. माणिक चॅटर्जींचा हा सिनेमा आरती आणि विकासच्या स्वप्नांच्या घराला सुरूंग लावतो. ही वेदना पडद्यावर संवेदनशीलपणे साकारण्यासाठी आर.डी. बर्मनचं संगीत महत्त्वाची भूमिका बजावतं आणि चित्रपटालाही उत्कृष्ट पटकथेचं फिल्मफेअर मिळतं. घर हरवलेली माणसं घर शोधत असतात. ती ‘कुणी घर देता का घर?’ असा काळजातून आलेला जीवघेणा सवाल विचारात ‘नटसम्राट’सारख्या नाटकाच्या अजरामर व्यक्तिरेखा होतात. पण माणसं घरापेक्षा कमी नसतात. त्यांनाही खोली असते, न दिसणार्‍या अदृश्य भिंती असतात. माणसं जोपर्यंत संवदेनशील असतात तेव्हा ती घरं असतात. ज्यावेळी ती बाहेरच्या व्यावहारिक जगात कमालीची भावनाहीन होत जातात तसतशी त्यांची घरं ‘मकान’ बनतात…अशा माणसांसाठी हे मकान तुरुंगापेक्षा कमी नसतं!

- Advertisement -

हिंदी पडद्यावर साकारलेली काही घरं
‘घर का चिराग’, ‘बडे घर की बेटी’, ‘साजन का घर’, ‘घर की लाज’, ‘पिया का घर’, ‘घर का चिराग’, ‘घर की इज्जत’, ‘घर घर की कहानी’, ‘छोटा सा घर’, ‘पराया घर’, ‘बाबुल का घर’, ‘घर जमाई’, ‘घर परिवार’, ‘घर का चिराग’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -