घरफिचर्सराणेंची जनआशीर्वाद यात्रा नेमकी कोणासाठी?

राणेंची जनआशीर्वाद यात्रा नेमकी कोणासाठी?

Subscribe

सत्तेमुळे शिवसेनेमध्ये जी काही एक मरगळ आलेली आहे ती झटकण्याचे काम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे जर होणार असेल तर ते भाजपच्या पथ्यावर पडण्यापेक्षा शिवसेनेवर आणि त्याहीपेक्षा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ते अधिक पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मग असा प्रश्न उपस्थित होतो की, नारायणराव राणे यांची जनआशीर्वाद यात्रा ही नेमकी भाजपला जनआशीर्वाद मिळावा म्हणून आहे की, शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गेल्या महिन्यातच स्थान मिळाले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते भाजपचे राज्यसभेचे खासदार व आता केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांची मुंबईत नुकतीच जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. अर्थात नारायण राणे म्हटले की राजकीय वादविवाद यांची खमंग फोडणी हे ओघाने आलेच. राणे हे शिवसेनेत असल्यापासूनच अत्यंत आक्रमक आणि तेजतर्रार नेते म्हणून ओळखले जातात. भाजपच्या नेतृत्वाला राणे यांचा उपयोग मुख्यत्वेकरून शिवसेनेच्या विरोधातील भाजपचा आक्रमक चेहरा यादृष्टीने करून घ्यायचा आहे आणि आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला टक्कर देऊ शकणारा भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून राणे फॅक्टर पालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्याची पूर्वतयारी म्हणून भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली होती. राणे यांनी देखील त्यांच्या नेहमीच्या आक्रमक राजकीय शैलीने शिवसेनेला डिवचत चिमटे काढत यात्रेमध्ये जनआशीर्वाद मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र हे करत असताना भाजप नेते हे विसरले की नारायण राणे यांच्याबाबत निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये टोकाचा तिरस्कार आहे. त्यामुळे राणे यांची राजकीय विधाने ही शिवसेनेपेक्षा ही भाजपवर अधिक प्रमाणात बुमरँग होऊ शकतात. २०१२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते आणि शिवसेना आणि भाजपा हे प्रामुख्याने विरोधी पक्षात होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचा कारभार चालवत होते आणि त्यावेळी पालिका निवडणुकीच्या प्रचारात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेचे अस्तित्व संपलेले असेल असे एक राजकीयदृष्ठ्या सर्वसाधारण विधान केले होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाचा अत्यंत विपरीत परिणाम शिवसेनेवर होण्याऐवजी काँग्रेसवर झाला आणि शिवसेनेला पृथ्वीराज चव्हाण यांच्या अशा विधानांचा मोठ्या प्रमाणावर राजकीय लाभ मिळाला आणि पुन्हा मुंबई पालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आली.

हे झाले केवळ पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवसेनेवरील टिप्पणीमुळे त्याचे जे काही पडसाद मुंबईकरांमध्ये उमटले त्याबाबत. पृथ्वीराज चव्हाण हे काही शिवसेना द्वेष्टे नव्हते. मात्र असे असताना देखील त्यांच्या एका राजकीय विधानाने शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्या अर्थाने बघावयाचे झाल्यास नारायणराव राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेमध्ये बाळासाहेबांशी निष्ठावंत असणारा अत्यंत कडवट असा शिवसैनिकांचा एक स्वतंत्र वर्ग आहे. या वर्गाला सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय निर्णय कधीकधी न पटणारे देखील असतात. उद्धव ठाकरे यांच्या या राजकीय निर्णयाविरोधात हे कडवट शिवसैनिक वेळोवेळी नाराजी देखील व्यक्त करत असतात. मुख्यमंत्रीपदासाठी अथवा सत्तेसाठी हिंदुत्वाची नाळ जुळलेल्या भाजपला दूर करत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय हा कदाचित शिवसेनेच्या या निष्ठावंत शिवसैनिकांना न पटलेल्या निर्णय यांपैकी एक निर्णय असू शकतो. मात्र असे असले तरी देखील निष्ठावंत शिवसैनिकांचा हा वर्ग नारायण राणे यांच्या राजकीय विधानांमुळे भाजपकडे आकर्षित होण्याची सुतराम शक्यता नाही. उलट राणे यांची राजकीय विधाने शिवसेनेबाबत जर अशाच पद्धतीने भविष्यात सुरू राहिली तर त्याचं बुमरँग हे भाजप वरच उलटण्याची शक्यता अधिक आहे. आणि त्यातही उल्लेखनीय म्हणजे सत्तेमुळे शिवसेनेमध्ये जी काही एक मरगळ आलेली आहे ही मरगळ झटकण्याचे काम राण्यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे जर होणार असेल तर ते भाजपला पथ्यावर पडण्यापेक्षा शिवसेनेवर आणि त्याहीपेक्षा म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते अधिक पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मग असा प्रश्न उपस्थित होतो की नारायणराव राणे यांची जनआशीर्वाद यात्रा ही नेमकी भाजपला जनआशीर्वाद मिळावा म्हणून आहे का शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी आहे?

- Advertisement -

नारायणराव राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा शुभारंभदेखील शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करून केला. यामागे देखील शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याचा हा एक प्रयत्न होता. नारायण राणे यांना मानणारा शिवसेनेतदेखील एक वर्ग आहे. त्यामुळे राणे यांच्या या भेटीने शिवसेनेतील हा वर्गदेखील सुखावला हे नाकारता येणार नाही. मात्र केवळ सुखावणे वेगळे आणि प्रत्यक्षात मतदानात त्याचा लाभ मिळणे हे वेगळे. जसे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत शिवसैनिकांमध्ये सहानुभूती नक्कीच आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा राज ठाकरे हे मराठी माणसांबद्दल अध्याय आणि पेटून उठतात तेव्हा तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिकांची साथ ही त्यांना मिळत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात केवळ एक आमदार निवडून आल्यानंतर ही राज ठाकरे यांच्या नावाभोवती जे वलय आहे त्या वलयामागे एक प्रमुख घटक हा देखील आहे घेण्याची गरज आहे. नारायण राणे यांच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. नारायण राणे यांच्या बाबतही शिवसैनिकांमध्ये निश्चितच सहानुभूती आहे. मात्र जेव्हा जेव्हा राज ठाकरे असोत ती नारायण राणे असो यांच्या विरोधात शिवसेना असते तेव्हा तेव्हा शिवसेनेला मानणारा वर्ग आणि शिवसैनिक हे सर्वप्रथम शिवसेनेची निवड करतात हे यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अधोरेखित झाले आहे.

राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेमध्ये बोलताना राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विधान करून राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नगर विकास मंत्री असून ते केवळ सह्यांपुरतेच मंत्री असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली आणि त्याचबरोबर शिंदे यांचे खाते मातोश्री वरूनच चालवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेत नाराज असून ते भाजपमध्ये येऊ शकतात असेही विधान राणे यांनी केले. त्याला अर्थातच ताबडतोब दुसर्‍या दिवशी एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देऊन त्याचा खुलासा केला. मात्र यानिमित्ताने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जी राजकीय वर्तुळात कुजबूज होती ती राणे यांच्यामुळे अधिक उघडपणे आणि ठळकपणे समोर आली याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- Advertisement -

२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकत्रपणे सत्तेत होते आणि शिवसेनेचे विधिमंडळातील पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे हे प्रमुख होते. त्यावेळी भाजपची प्रथमच केंद्रात एक हाती सत्ता आली होती आणि राज्यातही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतील त्याला मम म्हणण्या खेरीज शिवसेनेसमोर अन्य कोणताही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुसंवाद अधिक वाढावा आणि वितंडवाद कमी व्हावा यादृष्टीने एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे सहाजिकच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्यातील आणि दिल्लीतील भाजप नेत्यांशी संबंध जुळले हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे. २०१९ नंतर महाराष्ट्रात जो काही सत्ताबदल झाला त्यानंतर राज्याची राजकीय समीकरणे ही प्रचंड प्रमाणावर बदलली. मात्र असे असले तरी देखील मतदारसंघांमध्ये शिवसेनेला अधिकाधिक जागा मिळवून देताना,त्या निवडून आणताना जी कसरत एकनाथ शिंदे यांना करावी लागते ती आजच्या घडीला शिवसेनेतला अन्य कोणताही नेता करत नाही हे देखील एक कटू सत्य आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांचा म्हणजेच डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघाचा राजकीय विचार करायचा झाल्यास यामधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले आहे. केवळ एक आमदार शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीचा एक आहे आणि मनसेचा एक आहे अशा परिस्थितीत जर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचा विचार करायचा झाल्यास शिवसेनेला जर हा मतदारसंघ पुन्हा निवडून आपल्या ताब्यात ठेवायचा असेल तर भाजप नेत्यांची संबंध राहणे ही शिवसेनेची तेथील स्थानिक गरज आहे. एकनाथ शिंदे हे राजकीय गरजा ओळखण्यात आणि त्या पूर्ण करण्यात पारंगत असलेले नेते आहेत. त्यामुळेच ते भाजपशी टोकाचा विरोध अंगावर घेत नाहीत हे देखील लक्षात घेण्याची गरज आहे. मातोश्रीला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची ही मतदारसंघनिहाय अडचण लक्षात आली तर एकनाथ शिंदे यांच्या बाबत जो काही संभ्रम गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण करण्यात आला आहे तो दूर होण्यास हातभार लागू शकेल. कारण शिंदे यांचे जर राणे, भुजबळ, गणेश नाईक होऊ द्यायचे नसतील तर ती जबाबदारी एकट्या एकनाथ शिंदे यांची नसून शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील तेवढीच किंबहुना त्यापेक्षा काही प्रमाणात अधिक जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांची आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणतेही स्थानिक राजकीय नेतृत्व हे एका दिवसात उभे राहत नसते. त्यासाठी अनेक अंतर्गत लढाया लढाव्या लागतात कधी त्या अन्य राजकीय पक्षाविरुद्ध असतात तर कधी त्या अंतर्गत हितशत्रूंच्या विरोधात देखील असतात. अशा लढाया लढत, कधी कधी टोकाचा संघर्ष करत एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व ते हळूहळू उभे राहत असते. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ,गणेश नाईक अशी जर विविध राजकीय पक्षांच्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेतील नेत्यांकडे नजर टाकली तर उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात येईल ही शिवसेना सोडून गेल्यानंतरही या नेत्यांना अन्य राजकीय पक्षाच्या व्यवस्थेने सांभाळले आणि वाढवलेदेखील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाबत मातोश्रीने पुन्हा तीच चूक करू नये, एवढी तरी किमान अपेक्षा ठाणेकर शिवसैनिक नक्कीच बाळगत असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -