घरमहाराष्ट्रनाशिकमेगाभरतीच्या व्दितीयोध्यायात उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज?

मेगाभरतीच्या व्दितीयोध्यायात उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज?

Subscribe

पाच आमदारांच्या नावांची चर्चा; आघाडीची धाकधूक वाढली

केंद्र-राज्यातील नरेंद्र-देवेंद्र जोडगळीच्या कारभाराने प्रभावित होऊन भाजपच्या कमळावर स्वार होण्यासाठी मरगळलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील नेत्यांमध्ये चढाओढ लागली असताना मेगाभरतीच्या प्रथमोध्यायात दिग्गज राजकारण्यांनी प्रवेशाचे सोपस्कार पार पाडले. मात्र, या घडामोडी इथवर न थांबता आता मेगाभरतीचा व्दितीयोध्याय येत्या १० ऑगस्ट रोजी मुक्रर झाल्याचे सांगण्यात येते. या मेगाभरतीत उत्तर महाराष्ट्रातील पाच विद्यमान आमदारांसह दिग्गज घराण्यांचा भाजप प्रवेश सोहळा होणार असल्याने लोकसभा निवडणूक निकालाने गोत्यात आलेली काँग्रेस आघाडी उद्याच्या धक्क्याने आणखीच गाळात जाण्याची शक्यता आहे.

भाजपमधील मेगाभरतीचा प्रथमोध्याय गेल्या बुधवारी पार पडला. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक घराणी, आमदार व नेते भाजपमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा झडल्या. सध्या काँग्रेस आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू असल्या तरी दोन्ही पक्षांतील अनेक विद्यमान आमदारांनी मुलाखतीकडे पाठ फिरवल्याने त्यांनी आपापल्या पक्षनेतृत्वाला योग्य तो संदेश दिला आहे. भाजपमधील मेगाभरतीत दिग्गज घराणी कमळावर स्वार झाल्यानंतर भरतीचा व्दितीयोध्याय येत्या १० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यावेळी पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जाते. विशेषत: त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील अशा दिग्गजांचा समावेश राहणार आहे, ज्यांच्या दोन-तीन पिढ्यांची काँग्रेस संस्कृतीसोबत नाळ जुळलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर व शिर्डी या आठही मतदारसंघात भाजप-शिवसेनेने निर्भेळ विजय मिळवत काँग्रेस आघाडीचा सुपडासाफ केला होता. परिणामी, आधीच मोठी मरगळ आलेली काँग्रेस आघाडी आताच्या धक्क्याने राजकीयदृष्ट्या ‘व्हेंटीलेटर’वर जाण्याची स्थिती निर्माण होणार आहे. भाजप प्रवेशकर्त्यांमध्ये दिग्गजांची नावे घेतली जात असल्याने काँग्रेस आघाडी आता कसे ‘डॅमेज कंट्रोल’ करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नेमक्या कोणाच्या नावांची चर्चा..

  • नाशिक : जि. प. सदस्या अमृता पवार (राकाँ), माणिकराव बोरस्ते (काँ)
  • जळगाव : गुलाबराव देवकर (राकाँ)
  • धुळे : आ. अमरिश पटेल (काँ), राजवर्धन कदमबांडे (राकाँ), शिवाजी दहिते (जि.प. अध्यक्ष)
  • नंदुरबार : आ. चंद्रकांत रघुवंशी (काँ), भरत गावीत
  • अ. नगर : आ. संग्राम जगताप (राकाँ), आ. राहुल जगताप (राकाँ)
मेगाभरतीच्या व्दितीयोध्यायात उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज?
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -