घरफिचर्सउशिरा सुचलेले शहाणपण!

उशिरा सुचलेले शहाणपण!

Subscribe

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी शेवटी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला हा एका परीने शहाणपणाचा निर्णय असला तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. आपल्याकडे राजस्थान सरकार पाडण्यासाठी पूर्ण ताकद नसताना आणि आपले शहाणपण भाजपकडे गहाण ठेवल्याने पायलट तोंडावर पडले होते. आता उरल्या सुरल्या अब्रूची लक्तरे निघण्यापेक्षा घरवापसी केलेली बरी, असा निर्णय घेऊन त्यांनी राहुल यांच्याकडे वेळ मागितली. त्यांच्याशी बातचीत केली. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर अन्याय झाला असेल तर त्यामधून मार्ग काढण्यासाठी समिती नियुक्ती केली हा आणखी एक शहाणपणाचा निर्णय म्हणायला हवा.

राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होणायपूर्वी पायलट यांचे मन परिवर्तन होणे गरजेचे होते. कारण लोकशाहीत राहुनही दुसऱ्या पक्षांचे निवडून आलेले सरकार खाऊन टाकण्याचा भस्म्या आजार मोदी- शहा यांच्या भाजपला जडला असून गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश पाठोपाठ ते राजस्थानची सत्ता गिळंकृत करू पाहत होते. पण, भाजपच्या घोडेबाजारात आपलाच एक नेता सामील असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वेळीच लक्षात आले आणि त्यांनी भाजपचा डाव उधळून लावला. उठता बसता स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या भाजपने गेहलोत सरकार पाडण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून बघितले. पण, शेवटी हातात काही उरले नसल्याने आता काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा आमचा खर्च वाचला, असे आता सांगून आपल्या निलाजरेपणाची खुलेआम साक्ष दिली. एक आमदार विकत घेण्यासाठी २०-३० कोटी खर्च करण्याची तयारी, वर त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये एक दोन महिने राजेशाही व्यवस्था करणे, ही आता भाजपची खास वैशिष्ट्ये झाली आहेत. खरेतर यावर त्यांनी एक मार्गदर्शन पुस्तिका काढून प्रशिक्षण वर्ग सुरू करायला काही हरकत नाही. देशभरातील आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बोलावून विरोधी पक्षाची सरकारे कशी पाडायची याची चिंतन शिबिरे त्यांना घेता येतील.

- Advertisement -

राजस्थानच्या २०० आमदारांच्या विधानसभेत बहुमातासाठी १०१ आमदारांच्या बहुमताची गरज आहे. मात्र बंडखोर आमदारांचे बंड थंड पडल्याने येत्या शुक्रवारी सुरू होणाऱ्या अधिवेशनात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला काही कसरत करण्याची गरज भासणार नाही. सचिन पायलट आणि १८ आमदारांनी गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवल्याने भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागली होती. आपले ७३, काँग्रेसचे २० आणि इतर तसेच अपक्ष यांना हाताशी घेऊन त्यांना राजस्थानमध्ये कमळ फुलवायचे होते, पण कमळ फुलण्यापूर्वी कोमेजून गेले. गेले महिनाभर हातपाय मारूनही शेवटी त्यांना हात चोळत बसावे लागेल. बंडाला सुद्धा एक वेळ असतो, धार आणि वेगही असतो. पण, पायलट यांना गेहलोत यांच्याऐवजी आपल्याला सत्ता हवी आहे म्हणून त्यांनी बंडाचे निशाण फडकवून बघितले, पण त्यासाठी लागणारी जोरकस ताकद त्यांच्यात नव्हती. उलट गेहलोत यांनी इतक्या वर्षांचा आपला सारा राजकीय अनुभव पणाला लावून पायलट यांच्या बंडातील हवा महिनाभर हळुहळू काढायला सुरुवात केली. शेवटी एकाकी पडल्यामुळे नमते घेत पायलट यांना घरवापसीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पायलट यांचे सर्वात मोठे समर्थक आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेन्द्र सिंह यांनी सोमवारी गेहलोत यांची भेट घेतल्यानंतर पायलट यांच्या हाती काहीच उरले नव्हते. त्याआधी १८पैकी बहुतांशी सर्व बंडखोर आमदारांनी भाजपचा हॉटेल पाहुणचार सोडत आपल्या तलवार म्यान केल्या होत्या. बंड केलेल्या आमदारांचे मन वळवण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही पुढाकार घेतला, हे विशेष. मुख्य म्हणजे पायलट यांनाही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडू नका, अशी काँग्रेसच्या युवा नेत्यांनीही युक्तीच्या दोन गोष्टी सांगितल्या. व्यवस्थेत राहून तुम्हाला ती बदलता येते. परिघाच्या बाहेर गेला की आधी तुमच्या आजूबाजूची माणसे साथ द्यायला बंद करतात. राजकारणात तर ही गोष्ट प्रकर्षाने होते. अशा वेळी एकाकी पडल्यानंतर तुमच्या हातात काही राहत नाही आणि काही मिळण्यापेक्षा नैराश्य हाती येते. कदाचित एक महिन्यानंतर पायलट यांच्या ही गोष्ट लक्षात आली असावी.

पायलट या घरवापसीमागे मुंबईतील युवा काँग्रेस नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दीपेंद्र हुडा, भंवर जितेंद्र सिंह, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा प्रयत्नाला खास यश मिळाले आहे. घरवापसी करण्यासाठी पायलट यांनी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर काँग्रेसमधील या युवा ब्रिगेडने मोठ्या नेत्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले. ही युवा नेत्यांची आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांची टीम गुप्तपणे पायलट यांच्याही संपर्कात होती. दीपेंद्र हुडा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहे. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी पायलट यांच्या परतीला होकार दिला. त्यानंतर हुडा आणि भंवर जितेंद्र सिंह  यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांनीही तडजोडीसाठी प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे, वेणुगोपाल आणि पी. चिंदबरम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पायलट यांच्या भूमिकेला लगेच पाठिंबा दिला.

- Advertisement -

पायलट यांनी घरवापसी केली असली तरी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आता संपली आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही. यापुढे ते सावधपणे पावले उचलतील. भाजपच्या नादाला लागून कपाळमोक्ष करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये राहून आपली ताकद आहे त्या पेक्षा वाढवण्यावर त्यांचा आता भर राहिल असे दिसते. काँग्रेसचा आजही २२ आमदारांचा एक मोठा गट मनाने त्यांच्या बाजूने आहे. स्वतः काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यात लक्ष घालून नियुक्त केलेली समिती गेहलोत आणि पायलट यांच्यातील काही मुद्यांवरच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हेच मुद्दे पायलट यांनी पक्ष नेतृत्वासमोर मांडले होते.

या बंडातून पायलट यांना काय मिळाले हा प्रश्न अनुत्तरित असला तरी काँग्रेसमध्ये जीवाचे रान करून काही मिळत नाही. तुम्ही किती ताकदवान आहात याचाही दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांना काही फरक पडत नाही. तुम्हाला वेळ आल्यावरच आणि पक्षाची खात्री पटल्यावर राज्याची धुरा दिली जाते. ही पक्षाने घालून दिलेली वाट असून ती आताच्या काळात युवकांना बाजूला सारून किती उपयोगी आहे, हे खरे वाटत असले तरी काँग्रेस अजून जुन्या काळात वावरत असल्याचे दिसते. होईल-जाईल, असा एक मोठा वर्ग अजून काँग्रेसमध्ये आहे. त्याला पूर्वीसारखी सत्ता तर मिळणार आहे, ती जाते कुठे? काँग्रेसचा पारंपरिक मतदार आपण काही हातपाय न मारता आपल्याच मत देणार, असे या पक्षाच्या नेत्याला वाटते. तसेच अजूनही लोक आपल्याला सहजासहजी सत्ता देतील या भ्रमात ते आहेत. याशिवाय सत्तेच्या जवळ जाऊन ती मिळवण्यासाठी एक वेग लागतो तो सुद्धा आताच्या वेगवान काळात आत्मसात करणे काँग्रेसला जमलेले नाही. यामुळे गोव्यातील हातची सत्ता गेली. कर्नाटकमध्ये भाजप घोडेबाजार करत असताना हे मग्न तळ्याकाठी बसून राहिले आणि ज्योतिर्मयी शिंदे सारखा युवा मोहरा हातचा राखण्याची लगबग काँग्रेसला दाखवता आली नाही. या चुकांमधून शिकून सचिन पायलट या आणखी एक युवा नेत्याला गमावण्याची चूक मात्र यावेळी पक्षाने केली नाही, हे सुद्धा काँग्रेसलाही उशिरा सुचलेले शहाणपण म्हणायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -