‘दूधप्रश्नी तीव्र आंदोलनाचा निर्धार; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’

chandrakant-dada-patil
चंद्रकांत पाटील

दूध दराच्या प्रश्नावर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय मंगळवारी महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धारही महायुतीने केला आहे. राज्‍यातील दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना महायुती वाऱ्यावर सोडणार नाही. दूध उत्‍पादकांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय महायुतीने घेतल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

दूध आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५ लाख निवेदने देण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्‍यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.

दोनदा आंदोलन करूनही राज्य सरकारने दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला नाही. महायुतीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या. मात्र राज्य सरकारने गेंड्याची कातडी पांघरून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषयही केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

१३ ते १९ ऑगस्ट दरम्यान दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले. बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे  सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि रिपब्लिकन पक्षाचे  (आठवले गट) अविनाश महातेकर आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षाची मागणी

  • शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान द्यावे
  • दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रूपयेअनुदान द्यावे
  • गाईच्या दुधाला ३० रूपये दर द्यावा

हेही वाचा –

रशियाची लस भारतात कशा प्रकारे वापरली जाणार! उद्या होणार तज्ज्ञांची बैठक