घरफिचर्सआद्यलेखिका काशीबाई कानिटकर

आद्यलेखिका काशीबाई कानिटकर

Subscribe

काशीबाई कानिटकर या आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका होत्या. आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी, चरित्र आणि कथा या साहित्य प्रकाराचे महिला म्हणून प्रथमतः लेखन केले. त्यांचा जन्म २० जानेवारी १८६१ रोजी सातारा जवळील अष्टे या गावी झाला. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत, ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या. त्याकाळात स्त्रीशिक्षणाला विरोध होत असे. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे या अशा पद्धतीने शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. तत्पूर्वी वयाच्या ९ व्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले.

ते सुधारणावादी होते. हरिभाऊ आपटे, न्या. रानडे यांच्या सहवासामुळे स्त्रियांनी शिकावे अशा विचारांचे ते होते. पण उघडपणे त्याकाळात काशीबाईंचे शिक्षण सुरू ठेवण्याची सोय नव्हती. पण तरीही काशीबाई टीका सहन करीत चोरून मारून शिकत, वाचत राहिल्या. गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. तेव्हा गोविंदरावांबरोबरच हरिभाऊ आपटे काशीबाईंना लेखनास उत्तेजन देत असत. या नियतकालिकात काशीबाईंचे लेखन सुरू झाले. ‘शेवट तर गोड झाला’ (१८८९) हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला.

- Advertisement -

मनोरंजन,नवयुग आणि विविधज्ञानविस्तार आदी मासिकांमधून काशीबाईंचे स्फुटलेखन प्रसिद्ध झाले. ‘रंगराव’ (१९०३) व ‘पालखीचा गोंडा’ (१९२८) या कादंबर्‍या आणि ‘शेवट तर गोड झाला’ (१९८९), ‘चांदण्यातील गप्पा’ (१९२१), ‘शिळोप्याच्या गोष्टी’ (१९२३) हे कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले. डॉ.आनंदीबाई जोशी : चरित्र व पत्रे या चरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच ख्याती मिळाली. काशीबाईंचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात. पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते. १९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनात त्या एकट्या स्त्री लेखिका उपस्थित होत्या. अशा या प्रख्यात लेखिकेचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -