प्राणी प्रेमी नेहमीच प्राण्यांचे आधिक लाड करतात. तर कधीकधी पाळीव प्राणी त्यांना जिभेने चाटतात. ज्या लोकांना कुत्रे-मांजर आवडतात, त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. पाळीव प्राणी चांगले मित्र असतात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने आनंद आणि विश्रांती मिळते. पण, ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे का? पाळीव प्राण्यांसोबत झोपल्याने नकळत आपण आजारांना बळी पडू शकतो याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पाळीव प्राण्यांसोबत झोपणे आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
आरोग्यासाठी हानिकारक :
ऍलर्जी आणि दमा
पाळीव प्राण्यांच्या फर आणि कोंड्यातून बाहेर पडणारे कण ऍलर्जी आणि दमा रुग्णांच्या समस्या वाढवू शकतात. हे कण हवेत मिसळतात आणि श्वासाद्वारे शरीरात पोहोचतात, ज्यामुळे खोकला, शिंकणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
जंतुसंसर्ग
पाळीव प्राण्यांच्या केसांमध्ये बऱ्याचदा पिसवा आणि तत्सम परजीवी आणि धोकादायक कीटक/जंतू लपलेले असतात. अनेकदा हे लहान जंतू प्राण्यांसाठीही त्रासदायक ठरतात. यामुळे आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो. काही आजारही होऊ शकतात. त्यामुळे प्राण्यांची उत्तम स्वच्छता राखली पाहिजे.
झोपेचा त्रास
अनेकांना प्राण्यांबरोबर झोपल्यामुळे स्वतःला पुरेशी झोप मिळत नाही. प्राण्यांची सततची हालचाल आणि आवाज यामुळे झोपमोड होऊ शकते. यामुळं तुम्हाला पूर्णपणे आराम मिळू शकत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर जाणवतो. आपल्या शरीरातली ऊर्जा आणि मानसिक स्थितीवरही याचा परिणाम होत असतो आणि थकवा जाणवतो.
आरोग्यासाठी फायदेशीर :
ताणतणाव कमी होतो
पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्याने तणाव संप्रेरक कोर्टिसोल कमी होतो. अनेकदा तुम्ही थकून आल्यावर प्राण्यांकडून मिळणारं प्रेम तुमचा ताण दूर करतो.
चांगली झोप
बऱ्याच लोकांसाठी, पाळीव प्राण्यांसोबत झोपल्याने सुरक्षिततेची भावना मिळते ज्यामुळे त्यांना चांगली झोप येते. अनेकजण प्राण्यांना अगदी जवळ घेऊन झोपतात.
काय खबरदारी घ्यावी :
स्वच्छता
पाळीव प्राणी झोपण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यांची दररोज काळजी घ्या. तसेच त्यांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घ्या.
वैद्यकीय परिस्थिती
तुम्हाला ऍलर्जी किंवा दमा असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. तसेच ऍलर्जी होत असल्यावरही विशेष काळजी घ्या.
तुमच्या झोपेकडे लक्ष द्या
पाळीव प्राण्यांसोबत झोपल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर पाळीव प्राण्यांसोबत झोपू नका.