घरलाईफस्टाईलआदराचे वाढते वय

आदराचे वाढते वय

Subscribe

आयुष्यात आपण अनेक गोष्टी पहात असतो, ऐकत असतो, काही गोष्टी आपल्याला जाणवतात तर काहींचा प्रत्यक्ष अनुभवही येतो. यापैकी काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतात आणि त्यामध्ये काही बदल करणे शक्य आहे का? असा विचार एकतर तुम्ही करत राहता किंवा त्या आहेत तशाच स्विकारुन सोडून देता.

आजच्या जगात वडीलधार्‍यांप्रती कमी होत चाललेला आदर, ही एक अशीच गोष्ट आहे जिने मला विचार करायला भाग पाडले आहे. खरे म्हणजे, वाढते वय ही एक नैसर्गिक आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. माणसाच्या जन्माने सुरु झालेल्या या प्रक्रियेचा शेवट हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनेच होतो. आपल्यापैकी काहींना हे बरोबर समजलेले असते आणि त्यांना या गोष्टीचे मोलही असते; पण दुर्दैवाने काही जण मात्र हे गृहीत धरतात.

आपला जन्म होतो, तेव्हा आपले पालक आणि वडीलधारी माणसे आपली काळजी घेतात. ही मंडळी त्यावेळी नवतारुण्याचा टप्पा ओलांडून एका विशिष्ट वयापर्यंत पोहचलेली असतात. एकीकडे जेव्हा आपण त्यांच्यासोबत मोठे होत असतो, तेव्हा त्यांचे मात्र वय होत असते, आपली वाढ होत असते आणि ते वयस्कर व्हायला लागतात. तारुण्याच्या ऐन बहरात आल्यावर आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीचा विसर पडू लागतो की, आपण आज जे काही आहोत किंवा जे काही करु शकतो, त्यामध्ये एकेकाळी तरुण असलेल्या याच वडीलधार्‍यांचे अनमोल असे योगदान असते. आज वृद्धत्वाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्यांनी आपल्याला आजपर्यंत दिलेल्या सर्व गोष्टींचा आपल्याला काळानुरुप विसर पडू लागतो आणि तेव्हाच आपण वडीलधार्‍यांचा अनादर करायला सुरुवात करतो.

- Advertisement -

जेव्हा मी ‘आदराचे वाढते वय’ असे म्हणतो, तेव्हा मला हेच म्हणायचे असते की, आपल्या वडीलधार्‍यांबद्दलच्या आपल्या आदराचे वय वाढू लागले आहे (अर्थात हा आदर कमी कमी होत चालला आहे). खरे तर आपलाही प्रवास त्याच दिशेने सुरु आहे, याचा आपल्याला विसर पडू लागला आहे. एखादा तरुण वृद्ध व्यक्तीला अनादर दाखवत वेगाने चालण्यासाठी किंवा आपल्याबरोबरीने चालण्यासाठी सांगत असतो, तेव्हा स्वाभाविकच त्या तरुणाला त्याच्या लहानपणीचा विसर तर पडला नाही ना? असे वाटते. कारण तो लहान असताना, त्याच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी हाच वृद्ध तेव्हा हळूहळू चालला असणार आणि हे करत असताना कदाचित त्याला ही जाणीवही नसणार की एकदिवस आपणही त्याच वयाचे होणार आहोत.

एखादी तरुणी जेव्हा एखाद्या वयस्कर स्त्रीला फॅशन समजत नसल्याबद्दल किंवा फॅशन समजून घेण्याइतपत ती आधुनिक नसल्याबद्दल सुनावते, तेव्हा ती कदाचित हे विसरलेली असते की, ती लहान असताना याच स्त्रीने तिला एखाद्या वाढदिवसात किंवा लग्नात सुंदर दिसण्यासाठी शक्य तितक्या सर्वोत्तमपणे तयार केले होते.

- Advertisement -

बर्‍याचदा आपण बघतो की पडण्याच्या बेतात असलेल्या एखाद्या लहानग्याला एक हळूवार हात अलगदपणे आधार देतो, जी गोष्ट त्या मुलाला जाणवतही नाही किंवा समजतही नाही. आपण पडलो असतो आणि त्यामुळे आपल्याला वेदना झाली असती, हेदेखील त्या मुलाला माहीत नसते. आपल्या लहानपणी आपल्या वडीलधार्‍यांनी कितीतरी वेळा आपल्याही नकळत दिलेल्या या आधाराची आपल्याला तेव्हाच जाणीव होते, जेव्हा आपल्याला स्वतःची मुले होतात. कारण आपणही आपल्या मुलांसाठी आपोआप हेच करत असतो.

या जगात असे तरुण आहेत, जे आपल्या वडीलधार्‍यांचा अनादर करतात; पण या वडीलधार्‍यांनी त्यांच्या तरुण वयात किंवा एकूण आयुष्यात जे साध्य केले आहे त्याच्या काही टक्के यशसुद्धा ही मुलं कदाचित मिळवू शकत नाहीत. या वडीलधार्‍या व्यक्तींकडे असलेले ज्ञान आणि अनुभव या तरुणांना काही कालावधी गेल्यानंतरच साध्य होऊ शकते आणि वाढते वय हे साध्य करण्यासाठी मदत करते. आपल्या शरीराचे वय होते, मनाचे वय होते; पण आपल्या वडीलधार्‍यांप्रती असलेल्या आपल्या आदराचे मात्र आपण वय होऊ देता कामा नये, केवळ यासाठीच नाही की आपणही एकदिवस वृद्ध होणार आहोत, तर यासाठीही की आज आपण व्यक्ती म्हणून जे काही आहोत, त्यासाठी आपल्याला काही ना काही देऊन मदत करणार्‍यांप्रती आपण कृतज्ञ असलेच पाहिजे. ते आपल्या चांगल्या आणि वाईट काळात आपल्याबरोबर होते आणि त्यामुळे आपणही त्यांच्यासाठी असायलाच हवे.

हा आदर केवळ आपल्यासाठी काहीतरी केलेल्या, आपल्याला काही दिलेल्या किंवा आपल्या स्वतःच्या वडीलधार्‍यांपुरताच मर्यादीत असू नये, तर आपल्याशी संबंधित नसलेल्या पण दुसर्‍यांसाठी काही केलेल्यांबद्दलही आदर असला पाहिजे. सगळ्यांचे वय होते, वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वय तर वाढत जाणारच; पण वृद्धांप्रती असलेल्या आपल्या आदराचे वय मात्र होऊ देऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -