घरलोकसभा २०१९ठाण्यात शिवसेनेला आव्हान कोणाचे ?

ठाण्यात शिवसेनेला आव्हान कोणाचे ?

Subscribe

राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यात

मध्यंतरीच्या काळात अनेक मुद्यांवरून शिवसेना, भाजपमध्ये बिनसल्यामुळे त्यावेळी शिवसेना तसेच भाजप लोकसभा स्वतंत्र निवडणुका लढतील, असे चित्र तयार झाले होते. याचाच फायदा विरोधकांनी घेतला असता राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आखाड्यात उडी घेत गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र, आता सेना भाजप युती जाहीर होताच आघाडीचे उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. मावळ,रायगड व ठाणे लोकसभा मतदारसंघात कोण लढणार यावर तर्क वितर्क लढवले जात असून, अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार, रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, ठाण्यातून कोण लढणार याची चर्चा नसल्याने या मतदारसंघातील उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहे. काही दिवस अगोदर गणेश नाईक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आता त्यांनीही विरोध केल्याचे सांगण्यात येत असल्याने या मतदारसंघात शिवसेनेला कोण टक्कर देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हे सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास फारसे इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेचा फटका नाईक कुटुंबीयांना बसला. शिवसेनेचे राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला, तर त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा क्षेत्रातून पराभव पत्करावा लागला.

- Advertisement -

निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांनी नाईकांचा या निवडणुकीत पराभव केला, परंतु ऐरोली विधानसभा क्षेत्रातून नाईकांचे दुसरे पुत्र संदीप नाईक यांनी अवघ्या साडेआठ हजार मतांची आघाडी घेत आपली जागा राखली. एकूणच 2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या तडाख्यात नाईकांच्या घराणेशाहीला जबरदस्त हादरा बसला, परंतु त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत महापालिकेतील आपली सत्ता अबाधित ठेवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -