घरताज्या घडामोडीमराठा आंदोलनाचा ३२ वा दिवस; आंदोलनाकर्त्याची तब्येत बिघडली

मराठा आंदोलनाचा ३२ वा दिवस; आंदोलनाकर्त्याची तब्येत बिघडली

Subscribe

जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

मुंबईतील मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाही. गेल्या ३२ दिवसांपासून हे विद्यार्थी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या ५६ हून अधिक रिक्त जागांवर नियुक्ती करावी यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. गेल्या ३२ दिवसांपासून हे आंदोलनकर्ते आझाद मैदानावर अगदी ऊन्हातही आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

या आंदोलनातील एक एक आंदोलक हॉस्पिटलमध्ये भरती होत आहे. शुक्रवारी उज्वल धावडे यांना आलेल्या तापामुळे जीटी म्हणजेच गोकुळदास तेजपाल या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूसदृश ताप असल्याचे सांगण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. त्यानंतर, अर्चनाताई पणपट्टे यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांनाही जीटीमध्ये नेण्यात आले आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारपासून या आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे. रविवारी मराठा आंदोलनकर्ता अतिष पाटील यांची प्रकृती गंभीर झाली. अचानक दोन वेळा चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – करोना व्हायरस – राज्यात चौघांवर उपचार सुरू


आतापर्यंत अनेक नेत्यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. पण, ठोस तोडगा काढलेला नाही. भाजपच्या विनोद तावडे, आशीष शेलार आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी विधान भवनात या प्रश्नावर माननीय चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्थगन प्रस्ताव आणला गेला आणि प्रश्न मांडला गेला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर विस्तृत उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की काही अधिकार्‍यांनी माझा गैरसमज करून दिला होता. पण, आता हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याचे हे आंदोलनकर्ते सांगतात. पण, आतापर्यंत या आंदोलनाला ३२ दिवस उलटले आहेत. या आंदोलकांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे, या आंदोलनावर आणि यांच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.

काय आहेत मागण्या?

महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी हे तरुण आंदोलन करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -