घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रक्रिप्टो करन्सीच्या नावाने ५ कोटींची फसवणूक

क्रिप्टो करन्सीच्या नावाने ५ कोटींची फसवणूक

Subscribe

वर्षभरात 5 कोटी ८९ लाख २६ हजार गायब झाल्याची नोंद

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फायदे आणि तोटे काय आहे, याची शहानिशा करणे आवश्यक झाले आहे. कारण नफ्याचे आमिष अंगलट येऊन आयुष्यभराची कमाई अवघ्या काही मिनिटांमध्ये गायब होवू शकते. ऑनलाईन फसवणुकीबाबत सायबर पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात असली तरी फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. वर्षभरात क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली नाशिक शहरातील नागरिकांना तब्बल ७० लाख ७३ हजार ४५५ रुपयांना गंडा घालण्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात झाली आहे. क्रिप्टो करन्सी मिळवण्याच्या नादात १५ जणांची चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फेक वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून देशभरात फसवणुकीचे पेव फुटले आहेत. सायबर चोरटे सुशिक्षित नागरिकांनादेखील जाळ्यात ओढत आहेत. अनेकजण दुप्पट परतावा मिळेल, या आशेने कोणत्याही वेबसाईट, अँपची शहनिशा न करता व्यवहार करत असल्याचे या घटनांमधून अधोरेखित होत आहे. नाशिकमधील अनेक नागरिक याला बळी पडले आहेत. युवराज गायकवाड-पाटील यांनी मे २०३ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मोहम्मद हबीब मोहम्मद नीफ, मोहम्मद अब्बास, हम्मद युसूफ यांनी 2021 मध्ये त्यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. दाखल गुन्ह्यानुसार आत्तापर्यंत 15 गुंतवणूकदारांची चार कोटी 18 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. संशयितांनी संगनमत करून युवराज पाटील यांच्यासह त्यांचे मित्र व इतरांना बक्षिसे, लक्झरी कार, विदेश यात्रा आणि सहा महिन्यांत गुंतवणुकीच्या दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सुरुवातीस संशयितांनी गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर सहा महिन्यांनी संशयितांनी एक वेबसाईट आणि अँप तयार करण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी लाख रुपये अ‍ॅप आणि संकेतस्थळावर गुंतवले. मात्र, त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही, त्याचबरोबर गुंतवलेली रक्कमसुद्धा परत मिळाले नाही. वारंवार चौकशी करूनही संबंधितांना प्रतिसाद मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इंजिनीअरला सायबर चोरट्याने घातला २४ लाख रुपयांना गंडा
 क्रिप्टो करन्सीचा ऑनलाइन पार्टटाईम व्यवसाय केल्यास त्यातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला तब्बल २४ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य मनोहर अहिरराव (रा.अमृतधाम, पंचवटी) या इंजिनिअर असलेल्या तरुणाच्या फिर्यादीनुसार, तो पुण्यात काम करतो तर, त्याचे वडील सैन्यात कार्यरत होते.त्यांच्या निधनामुळे अनुकंपाअंतर्गत तरुणाला सैन्यात नोकरी लागणार होती. तोपर्यंत व्यवसाय करण्याचा त्याचा मानस होता. त्यातूनच २६ ते ३१ ऑगस्ट २०२३ कालावधीत टेलिग्रामवरून संपर्क साधत चोरट्यांनी त्यास ऑनलाइन क्रिप्टो करन्सीच्या व्यवसायाबाबत माहिती दिली. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष त्याने दाखविले होते.त्यावर विश्वास ठेवून संशयितांनी टप्प्याटप्प्याने तरुणाकडून २४ लाख २५ हजार ५०५ रुपये विविध खात्यांवर ई-स्वरूपात घेतले. व्यवसाय सुरू न झाल्याने व नफा न मिळाल्याने तरुणाने सायबर पोलिसात धाव घेतली. तक्रारीच्या तपासाअंती सायबर पोलिसांनी चार लाख गोठविले. तरुणाने सायबर पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केल्याने पोलिसांनी संशयितांची ऑनलाईन माहिती व बँकेच्या खाते क्रमांकावर तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कारवाई सुरू केली.
क्रिप्टो करन्सीच्या नावाने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडविल्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार तपास सुरु आहे. ऑनलाईन गुंतवणूक करताना शहानिशा करावी. मदतीसाठी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
रियाज शेख, वरिष्ठ पोलीस, निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे
क्रिप्टो करन्सीच्या नावाने अनेक अ‍ॅप व वेबसाईटव्दारे फसवणूक केली जात आहेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत अ‍ॅप, वेबसाईटची शहानिशा करावी. रक्कम कोणाच्या खात्यावर जात आहे, याचीसुद्धा माहिती घ्यावी.
तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -