जायखेडा @ 52; आणखी 5 रुग्ण करोनाबाधित

Corona

मोसम खोऱ्यात कोरोना अजूनही हातपाय पसरवत असून जायखेडा ( ता. बागलाण) येथील मयत कोरोनाग्रस्त तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचे कुटूबिय व संपर्कातील ४७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर शनिवार (दि. २०) रोजी जायखेडा येथील १,  मुल्हेर १ आणि जवळच असलेल्या नांदिन या छोट्याशा गावांतील एकाच कुटुंबातील ३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता जायखेडा, जयपूर(मेंढीपाडे), वाडीपिसोळ, सोमपूर, नांदिन मिळून पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. तर एकट्या जायखेड्याची कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या ३३ झाली आहे. मात्र, त्या २७ व्यक्तींपैकी २६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जायखेडावासियांना दिलासा मिळाला आहे.

मयत वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील मुलासह भावजईचा अहवाल सुरुवातीला निगेटिव्ह आला होता. मात्र, मयत वाहनचालकाच्या मुलाला अचानक त्रास जाणवायला लागल्याने दोन दिवसांपूर्वी अजमेर सौंदाणे येथील क्वांरटाईन सेंटरला पाठविण्यात आले होते. त्यानंतर शनिवार (ता. २०) रोजी प्राप्त अहवालानुसार १० वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. जायखेडा ग्रामपंचायत प्रशासनामार्फत वेळोवेळी परिसर निर्जंतुकीकरण केले जात आहे. हा भाग पूर्णतः सील करण्यात आला आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना होमक्वांरटाईन केले आहे. त्या २७ व्यक्तींना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात पाठवून त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तर २६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  मुल्हेर येथील २५ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच जायखेडापासून अगदी ५ ते ६ किलोमीटरवर असलेल्या नांदीन गावातील एकाच कुटुंबातील ५४ वर्षीय पुरुष, २३ व ११ वर्षीय तरुण असे एकूण ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. होमक्वांरटाईन करण्यात आलेल्या व्यक्ती जायखेडासह परिसरात बिनधास्तपणे वावरतांना दिसून येत असल्याने धोका अधिकच वाढत आहे. तसेच सुरुवातीला निगेटिव्ह आलेल्या रुग्णांनाही घरी पाठवण्यात आल्याने त्यांनाही काही दिवसातच त्रास जाणवायला लागला असल्याचे चित्र आहे. संशयितांनी १४ ते १५ दिवस घरातच थांबून स्वतःसह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांनी केले आहे. जर संशयितांपैकी कुणी रस्त्यावर वावरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस प्रश्सानाकडून सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.