घरमहाराष्ट्रSanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या भाषणात 78 मिनिटे काँग्रेस-नेहरूंवर टीका, राऊतांनी भाजपाला...

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या भाषणात 78 मिनिटे काँग्रेस-नेहरूंवर टीका, राऊतांनी भाजपाला सुनावले

Subscribe

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 78 मिनिटे केवळ काँग्रेस, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली, असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींच्या संसदेतील भाषणावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काल (ता. 05 फेब्रुवारी) दीड तासांपेक्षा अधिक वेळ बोलले. त्यांच्या याच भाषणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 78 मिनिटे केवळ काँग्रेस, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. मोदी सांगतात की, नेहरूंमुळे भारत आळशी झाला. म्हणजेच यांच्या मनातील काँग्रेस आणि नेहरूंविषयीची भीती आजही गेली नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे. (78 minutes of PM Narendra Modi’s speech criticizes Congress-Nehru – Sanjay Raut)

हेही वाचा… Rane On Uddhav Thackeray : “भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू”, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या संसदेतील भाषणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाच्या धोरणांबाबत आणि भविष्यावर बोलायचे असते. पण मोदींची आतापर्यंतची सर्व भाषणे केवळ प्रचाराशी संबंधित होती. देशातल्या कोणत्याही गंभीर प्रश्नावर ते काहीही बोललेले नाही. लडाखमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिंसेचा उद्रेक झाला आहे. यामध्ये अनेक लोक मरण पावली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये लोक रस्त्यावर आलेली आहेत. दिल्लीत ईव्हीएमच्या विरोधात लोकांचे आंदोलन सुरू आहे. निवडणूक कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. देशाची कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. चीनने घुसखोरी केली आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी या कोणत्याही विषयावर कोणतेही भाष्य केले नाही. मग मोदींनी नेमके कोणते भाषण केले? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

तर, महाराष्ट्रासारखे मोठे राज्य हे गुंडगिरीचा मोठा अड्डा झालेले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बेकायदेशीरपणे नेमलेले मुख्यमंत्री गुंडांना सांभाळत आहेत. पोलीस ठाण्यात आमदार गोळीबार करत आहेत. मोदी याबाबत काही बोलले का? मोदींनी काल तासभरापेक्षा जास्त वेळ भाषण केले. त्यातील 78 मिनिटे ते केवळ काँग्रेसवर टीका करत होते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत राहिले. इतक्या वर्षांनंतरही यांच्या मनातून काँग्रेसची, इंदिरा गांधींनी केलेल्या कामांची, नेहरूंनी केलेल्या कामांची भीती जात नाही, असा टोला राऊतांनी लगावला. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात, शिंदेंचे सरकार आल्यापासून साधारणतः 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सांगून आत्महत्या केल्या आहेत. मोदींनी त्यावर शब्द तरी उच्चारला का? तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करत आहात? असा सवालही राऊतांकडून उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -

भाजपाकडे मोदी हे एकमेव प्रॉडक्ट…

राहुल गांधी नावाचे एकच प्रॉडक्ट वारंवार प्रदर्शित करू नये, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून लगावला आहे. त्यांच्या या टीकेलाही संजय राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, एकच प्रॉडक्ट वारंवार प्रदर्शित न करण्याबाबत आत्मपरिक्षण करण्याची गरज ही भाजपाला आहे. भाजपा ही एकच प्रॉडक्टवर सुरू आहे. त्यांच्याकडे मोदींशिवाय दुसरे प्रॉडक्ट आहे का? गेल्या 10 वर्षांत आपण दुसरे कोणते प्रॉडक्ट पाहिले का? मोदी कोणत्या प्रॉडक्टविषयी बोलत आहेत? असे प्रश्न ही त्यांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केले.

देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल…

हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे. या देशातील हुकूमशाही कोणत्या थराला गेली आहे, हे चंदीगडच्या महापौर निवडणुकीत दिसले. त्यामुळे हे जे काही होत आहे ते मोदींना दिसत नाही किंवा त्यांना ते ऐकू येत नाही किंवा गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी लावून ते पंतप्रधान कार्यालयात बसले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी मोदींवर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -