घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसुनीता धनगरांच्या ८५ लाखांचा हिशेब लागेना; पाच बँक खात्यांत सापडले ३० लाख

सुनीता धनगरांच्या ८५ लाखांचा हिशेब लागेना; पाच बँक खात्यांत सापडले ३० लाख

Subscribe

नाशिक : महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरात ८५ लाख रुपये आढळून आले असले तरी ते कुठून आले आहेत, याचे उत्तर अद्याप धनगरांना देता आलेले नाही. शिवाय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.५) धनगर यांच्या पाच बँक खात्यांची चौकशी केली असता त्यात तब्बल ३० लाख १६ हजार ६२० रुपये आढळून आले. दरम्यान, धनगर यांची पोलीस कोठडी सोमवारी (दि.५) संपत असल्याने पथकाने त्यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने धनगरांना एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने बाजूने निकाल देऊनही शिक्षण संस्थेने नियुक्त करण्यास नकार दिल्याने तक्रारदार मुख्याध्यापकांनी महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी धनगर यांच्याकडे अर्ज केला होता. शैक्षणिक संस्थेत नियुक्तीबाबचे आदेश देण्यासाठी धनगर व विभागातील कनिष्ठ लिपिकाने लाच मागितली होती. तक्रारीवरुन पथकाने सुनीता सुभाष धनगर आणि लिपिक नितीन अनिल जोशी यांना लाच घेताना अटक केली. प्रारंभी धनगर यांना न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

- Advertisement -

धनगर यांच्या राहत्या घराच्या झडतीत पथकाला तब्बल ८५ लाखांची रोकड व ३२२ ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले होते. त्यानंतर तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस कोठडीदरम्यान धनगरांच्या बँक खात्यांची चौकशी केली. धनगर यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तीन बँक खाती व एक पीपीएफ खाते आहे. पहिल्या खात्यात १२ लाख ७१ हजार, दुसर्‍या खात्यात ३६ हजार २२७, तिसर्‍या १५ लाख ९६ हजार २०१ आणि पीपीएफ खात्यावर ८१ हजार ४३५ रुपये आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यावर ३१ हजार ७२९ रुपये असून, सर्व बँक खाती मिळून एकूण ३० लाख १६ हजार ६२० रुपये आढळून आले आहेत. तसेच, तीन महागड्या मालमत्ता धनगरांच्या नावावर आहेत.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पथकाने धनगर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी व बचाव पक्षांकडून युक्तिवाद झाला. लिपिक हा शिक्षक असतानाही त्याची पालिकेत नेमणूक कशी झाली. त्याने आणखी काही रक्कम शिक्षणाधिकारी धनगर यांच्याशी संगनमत करत स्विकारली किंवा काय, या तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. न्यायालयाने मागणी मान्य करत धनगर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -