घरदेश-विदेशदिल्लीत आपच

दिल्लीत आपच

Subscribe

भाजपचा सुपडासाफ;काँग्रेसला भोपळा

केंद्रासह विविध राज्यांतील पक्षाचे तमाम मंत्री, पक्ष नेत्यांना प्रचारात उतरवून अत्यंत प्रतिष्ठेची बनवण्यात आलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा जोरदार विजय झाला असून, प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचा ‘आप’ने दारूण पराभव केला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवत दिल्लीत सत्तेची हॅट्ट्रिक मारली आहे. ७० जागांच्या या विधानसभेत ‘आप’ने ६२ जागा प्राप्त केल्या असून, भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानताना माझ्यावरील विश्वास सार्थ करून दाखवू, असे म्हटले.

अत्यंत प्रतिष्ठेच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होत असताना देशभर तोच एक चर्चेचा मुद्दा बनला होता. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत आपली सारी ताकद ओतली होती. या निवडणुकीत पक्षाची एकूण एक यंत्रणा राबवली होती. केंद्रातील २० ज्येष्ठ मंत्र्यांसह केंद्रातील पक्ष पदाधिकारी विविध राज्यांमधील भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री, नेते आणि प्रवक्त्यांची प्रचंड फौजच दिल्लीत निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्यात आली होती.यामुळे सत्ताधारी ‘आप’साठी ही निवडणूक जड जाईल, अशी चर्चा राजकीय स्तरावर होत होती.

- Advertisement -

एकीकडे केंद्रातील सत्ताधारी भाजप सर्व ताकदीनिशी निवडणुकीत उतरला असताना दुसरीकडे केजरीवाल हे या सत्तेपुढे एकाकी लढा देत असल्याचेही पाहायला मिळत होते. भाजपने या निवडणुकीत नागरिकत्वाच्या मुद्याला अनन्य साधारण महत्त्व दिले होते. याशिवाय ३७० कलम, शाहिनबाग आंदोलन तसेच पुलवामा घटनेचा आधार घेत मते घेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या एकूण एक नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली होती. केंद्रिय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर केजरीवाल हे अतिरेकी असल्याचा वादग्रस्त आरोप केला होता. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीने दिल्लीत केलेल्या विकासकामांचा आधार घेत स्वत: मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्या भावाला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. शनिवारी मतदान पार पडताच जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचणीतही आपच्या बाजूने सत्तेचा कौल देण्यात आला होता.

प्रत्यक्ष मतमोजणीत आपने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांचे जवळचे सहकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री मनिष सिसोदिया यांचे मताधिक्य सातत्याने दोलायमान होत होते. मात्र अखेरच्या फेरीत सिसोदिया यांचा सुमारे साडेतीन हजारांच्या फरकाने विजय झाला.

- Advertisement -

दिल्लीत तीन टर्म राज्य करणार्‍या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत चांगलाच धक्का बसला. त्या पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. एकूण मतदानाच्या केवळ पाच टक्के इतकीच मते या पक्षाला पडली. निवडणुकीत यश आजमावू पाहणार्‍या काँग्रेस पक्षाच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. केजरीवाल यांच्या आपच्या प्रचाराच्या निवडणूक इव्हेंटची जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आली होती. केजरीवाल यांना अतिरेकी म्हणून संबोधणे, शाहीनबाग येथील आंदोलनावर प्रचंड टीका, नागरिकत्व कायद्याचा एकाकी वापर करण्याच्या भाजपच्या कृतीचा पध्दतशीर प्रचार करत किशोर यांनी भाजपला अडचणीत आणले होते.

पडपटगंज या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना कडवी झुंज द्यावी लागली. भाजपचे रविंद्रसिंग नेगी हे आलटून पालटून आघाडी घेत होते. अखेर सिसोदिया ३ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. नवी दिल्ली मतदारसंघातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे सुनीलकुमार यादव यांचा पराभव केला. दिल्लीच्या ओखला मतदारसंघात आपच्या अमानातुल्ला खान यांना सर्वाधिक ७० हजार मते पडली. विशेष म्हणजे या संघातील मुस्लीम मतदारांची संख्या १५ हजार इतकी आहे. गांधीनगरहून भाजपचे अनिल बाजपत सहा हजार मतांच्या फरकाने निवडून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -