आप कानामागून येऊन तिखट! राष्ट्रवादीसह मनसेला दिला धोबीपछाड…

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आप अर्थात आम आदमी पार्टीचा बोलबाला वाढत आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाबमधील सत्ता काबिज करणाऱ्या आपने गोवा आणि गुजरात या दोन राज्यांतही आपले अस्तित्व दाखवले आहे. गेल्या 10 वर्षांत आपने जी प्रगती केली आहे, त्याने अलीकडेच अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धोबीपछाड दिला आहे.

लोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात केलेल्या उपोषणाच्या वेळी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही त्यांच्यासमवेत होते. अण्णा हजारेंची मागणी मान्य करून केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मान्य केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि 26 नोव्हेंबर 2012 रोजी ‘आम आदमी पार्टी’ची (आप) स्थापना केली. अलीकडेच 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या आपने ‘राष्ट्रीय पक्ष’ अशी ओळख मिळवली आहे. आपचे देशभरात 161 आमदार आहेत.

त्याउलट स्थिती महाराष्ट्रातील दोन बड्या पक्षांची आहे. 1999मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण तेव्हापासून आतापर्यंतच्या 22 वर्षांच्या कालावधित राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षवेधी कामगिरी बजावलेली नाही. पहिल्या निवडणुकीत म्हणजे 1999मध्ये स्वबळावर लढणाऱ्या राष्ट्रवादीला 58 जागा जिंकता आल्या. तर, नंतर काँग्रेसबरोबर आघाडी केल्यावर 2004मध्ये 71 आणि 2009मध्ये 62 जागा जिंकता आल्या. 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा स्वबळावर निवडणूक लढवत केवळ 41 जागा जिंकल्या. (यावेळी मोदी लाटेचा प्रभाव होता.) तर, 2019च्या निवडणुकीत काँग्रेस सोबत असतानाही राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या.

आपने पंजाबमध्ये 92, गोव्यात 2 तर, गुजरातमध्ये 5 जागा जिंकल्या आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस इतर राज्यात फारसा प्रभाव दाखवू शकलेली नाही. 2017मध्ये गोवा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक, झारखंडमध्ये 2019मध्ये एक तर, केरळमध्ये 2016 आणि 2021मध्ये प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत.

तशीच गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी 2006मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्ष स्थापनेनंतर 2009मध्ये झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 उमेद्वार निवडून आले. तर, 2014 आणि 2019मध्ये मनसेचा प्रत्येकी एकच उमेदवार विजयी झाला. अरविंद केजरीवाल यांच्या आपने सर्वसामान्यांच्या वीज, पाणी, शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्याच्या विकासाची ब्लू-प्रिंट तयार केली आहे. पण मतदारांनी त्याबद्दल त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. उलट सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, शरद पवार आणि राज ठाकरे यांची पार्श्वभूमी राजकीय आहे. पण तशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना अरविंद केजरीवाल यांचा आप आज देशातील सर्वाधिक आमदार असलेला चौथ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. भाजपा, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पाठोपाठ आपचा क्रमांक लागतो.