फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राकडून हेच शिकलात का?; अजित पवारांची शिंदे गटावर टीका

मराठी माणसाला मुंबईत हक्क मिळवून देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुचनेनुसार बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. पानपट्टीवाला, ड्राईव्हर यांना बाळासाहेबांनी मोठं केलं. उमेदवारी देताना बाळासाहेबांनी कधी जात बघितली नाही. गरीब व सर्वसामान्य माणसाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. मंत्री केलं. त्याच बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला तुम्ही फसवलंत, असा आरोपही अजित पवार यांनी शिंदे गटावर केला.

Ajit-Pawar

पुणेः फुले, शाहू, आंबेडकर, संत, महापुरुषांचा इतिहास महाराष्ट्राला आहे. अशा महाराष्ट्राकडून हेच शिकलात का तुम्ही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटावर केली.

पुणे येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, सर्व काही सुरळीत सुरु होते. कोणी गद्दारी केली. कशासाठी केली. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पन्नास खोके. एकदम ओके, हे घराघरात गेलं आहे. स्वार्थासाठी किती कराल. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. मोठी केली. त्यांच्या मुलाकडून, नातवाकडून तुम्ही शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह घेता. याद राखा महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

मराठी माणसाला मुंबईत हक्क मिळवून देण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सुचनेनुसार बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. पानपट्टीवाला, ड्राईव्हर यांना बाळासाहेबांनी मोठं केलं. उमेदवारी देताना बाळासाहेबांनी कधी जात बघितली नाही. गरीब व सर्वसामान्य माणसाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. मंत्री केलं. त्याच बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला तुम्ही फसवलंत, असा आरोपही अजित पवार यांनी शिंदे गटावर केला.

पुढे अजित पवार म्हणाले, दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव व आदित्य पक्ष सांभाळतील. शिवाजी पार्क मैदानाच्या साक्षीने त्यांनी हे सांगितलं होतं. तुम्ही हे सर्व विसरलात. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल लोकांना पटलेला नाही. उद्धव ठाकरे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतीलच. पण जनता तुम्हाला माफ करणार नाही. फुले, शाहु, आंबेडकर. महान संत, महापुरुष यांचा वारसा महाराष्ट्राला आहे. अशा महाराष्ट्राकडून तुम्ही हेच शिकलात का, असा प्रश्नही अजित पवार यांनी शिंदे गटाला केला.

महाविकास आघाडीचे सर्व नेते उद्वव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांना एकटं सोडणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी बोलून दाखवला.