घरमहाराष्ट्रमी राष्ट्रवादीतच आहे, आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?; अखेर अजित पवार बोलले

मी राष्ट्रवादीतच आहे, आता प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?; अखेर अजित पवार बोलले

Subscribe

मुंबईः मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच आहे. मी कुठेही जात नाही. आता हे सर्व प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?, माझ्याबद्दल आणि माझ्या सहकार्यांबाबत जे काही जाणीवपूर्वक बोलले जात आहे त्यात काहीही तथ्य नाही, असा खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

अजित पवार हे भाजपसोबत जात असल्याची चर्चा मंगळवारी सकाळपासून सुरु होती. अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. शरद पवार यांनीही हे वृत्त नाकारले होते. त्यामुळे याविषयी अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, मी कोणत्याही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. सह्या घेण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून जी भूमिका घ्यायची आहे ती सर्व मिळून घेतीलच. आणि आता आम्ही निर्णय घेतला आहे की महाविकास आघाडी मजबूत करण्याचा. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. मला आणि माझ्या सहकार्यांना बदनाम करण्याचे काम थांबवा. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीसाठीच काम करणार आहे.

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत कोण बोलणार हे आधीच ठरलं आहे. त्यामुळे मी नागपूरच्या सभेत बोललो नाही. बाळासाहेब थोरातही बोलले नाहीत. जे बोलले त्यांची चर्चा नाही. पण जे नाही बोलले त्यांची मात्र चर्चा. माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे, असा सवालही अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

माझी जी काही भूमिका असेल ती मीच मांडेन ना. त्याबद्दल दुसरं कोणी बोलण्याचं काहीच कारण नाही. मीच तुम्हाला येऊन सांगेन ना. मी भाजप सोबत चाललो आहे याची चर्चा तुम्हीच सुरु केली आहे. मी किंवा माझ्या पक्षातून कोणीच काही बोललं नाही, असेही अजित पवार यांनी माध्यमांना फटकारलं.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना घडलेली घटना दुर्देवी आहे. त्यामुळे आपणही लवकरच पत्रकार परिषद संपवूया. नाहीतर आपल्यालाच उष्माघात होईल, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -