घरताज्या घडामोडीअल्टिमेटम : नाशिक-मुंबई महामार्ग दुरुस्त करा अन्यथा २६ कोटी भरा

अल्टिमेटम : नाशिक-मुंबई महामार्ग दुरुस्त करा अन्यथा २६ कोटी भरा

Subscribe

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल कंपनीला इशारा, १५ ऑक्टोबरची मुदत

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दशेची अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दखल घेतली आहे. हा महामार्ग १५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्त न करा अन्यथा २६ कोटी रुपये थेट खात्यातून काढून दुरुस्ती केली जाईल, असा इशाराच प्राधिकरणाने दिलाय.

खासदार हेमंत गोडसे यांनी अलिकडेच नाशिक-मुंबई महामार्गाच्या पाहणी करत या दूरवस्थेबाबत प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-नाशिक एक्सप्रेस-वे या टोल कंपनीला हायवेच्या दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत हायवेची दुरुस्ती न झाल्यास प्राधिकरण टोल कंपनीच्या खात्यातून २६ कोटी ३४ लाखांची रक्कम काढून, त्यातून नाशिक-मुंबई महामार्गाची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या तांत्रिक विभागाचे महाप्रबंधक बी. एम. साळुंके यांनी दिली. या रकमेत ५ कोटींच्या दंडांचाही समावेश आहे. उशिराने का होईल, महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या या ठोस कारवाईमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचा पाऊस

काही महिन्यांपासून घोटी, इगतपुरी, कसारादरम्यान नाशिक-मुंबई महामार्गाची अत्यंत दूर्दशा झाली आहे. महामार्गाला अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून, काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडला गेलेला आहे. अनेक ठिकाणी तर महामार्गावरील डांबर आणि त्याखालील खडीचा कचदेखील निघून गेलेला आहे. प्राधिकरणाने टोल प्रशासनाला अनेकदा नोटीस बजावूनही त्याकडे डोळेझाक सुरू होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत खासदार गोडसेंनी या महामार्गाची पाहणी केली होती. दरम्यान, कारवाईच्या धास्तीने टोल प्रशासनाची मात्र चांगलीच झोप उडाली आहे.

असा होणार खर्च

  • – नाशिक-मुंबई महामार्ग दुरुस्ती व इतर सोयी-सुविधांसाठी : ६ कोटी २५ लाख ३७ हजार ६५९
  • रस्त्याच्या नुतनीकरणासाठी : १४ कोटी ८२ लाख १५ हजार ४६१
  • एकूण दंडाची रक्कम : २१ कोटी ७ लाख ५३ हजार १२०
  • याव्यतिरिक्त ठोठावला जाणारा दंड : ५ कोटी
  • वसुलीची एकूण रक्कम : २६ कोटी ३४ लाख ४१ हजार ४००
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -