घरताज्या घडामोडीउरण तालुक्यासह नवी मुंबईत अवजड वाहनांवर बंदीचा बडगा

उरण तालुक्यासह नवी मुंबईत अवजड वाहनांवर बंदीचा बडगा

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्यातील सदर वाहतूक समस्येची दखल घेतली आहे.

उरण तालुक्यासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उर्वरित रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत दिवसा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदर परिसर, उरण, पनवेल आणि नवी मुंबई बाजूला अवजड वाहनांच्या प्रचंड रांगा या वेळेत लागत असून, आता अन्य वाहनांची कोंडी त्यामुळे होत आहे. जेएनपीटी बंदरातून कंटेनर वाहतूक करणारी वाहने आणि इतर जड वाहने नवी मुंबई हद्दीतून ठाणे जिल्ह्यातील हद्दीत प्रवेश करून गुजरात, तसेच नाशिक जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याने ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन सदर वाहतूक कोंडीचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर वाहतूक कोंडी संदर्भात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्यातील सदर वाहतूक समस्येची दखल घेतली आहे.

वाहतूक सुरळीत राहणे आवश्यक असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जेएनपीटीमधून कंटेनर वाहतूक करणारी वाहने आणि इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या एका अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१), (अ) (ब ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी तसे आदेश पारित केले आहेत.

- Advertisement -

या अधिसूचनेमुळे दैनंदिन प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत उरणमध्ये वाहनांच्या अपघातात ८०० हून अधिक जणांचा हकनाक बळी गेला आहे. रस्ते अपघातात मृतांची संख्या अधिक आहे. मात्र अधिसूचनेमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाहतूक कोंडी आता कमी होणार असून, अपघाती मृत्यूची संख्या देखील कमी होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी, जनतेने या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असले तरी या आदेशामुळे उरण तालुक्यातील एनच-३४८, एनएच-३४८ए आणि चिरनेर, गव्हाण फाटा येथे ही वाहने रस्त्यांवर उभी केली जात असल्यामुळे अन्य वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.


हे ही वाचा – जाणून घ्या : LPG सिलिंडर सबसिडीबाबत ही आहे सरकारची योजना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -