घरठाणेनाशिक बस अपघातामुळे अंबरनाथमध्ये शोककळा

नाशिक बस अपघातामुळे अंबरनाथमध्ये शोककळा

Subscribe

अंबरनाथ । अंबरनाथच्या मोरोवली गावातून शिर्डी दर्शनाला निघालेल्या बसला सिन्नर-शिर्डी मार्गांवर पाथरे गावात ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला तर २१ जण जबर जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे अंबरनाथ शहरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर खासगी रुग्णालयात सरकारी खर्चातून उपचार केले जाणार आहेत. अशी माहिती आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी दिली. अंबरनाथमधील मोरवली एमआयडीसीमध्ये राजेश वालिया यांची महालक्ष्मी पेकेजिंग कंपनी आहे. तसेच आनंद नगर एमआयडीसीमध्ये देखील मिठाई चे बॉक्स बनवण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. वलिया हे साईबाबांचे भक्त असल्याने गेली तीस वर्षांपासून कंपनीच्या वतीने कामगारांना शिर्डी दर्शनासाठी सहल काढली जाते. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे शिर्डी सहल रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु यंदा त्यांनी सहल काढण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री बारा वाजता एकूण 14 बसेस शिर्डी दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील अपघातग्रस्त बस सर्वात शेवटी निघाली होती.

तातडीने मदत मिळाली नाही…
या बस मध्ये एकूण 45 भाविक होते. रात्री अडीज वाजता कसारा घाटात बस चहा पाण्यासाठी थांबली होती. घाट पार केल्यानंतर बस चालक मोहन्टीने बसचा वेग वाढवला होता. घोटी सोडल्यानंतर सिन्नरपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाथरे गावच्या एका वळणावर समोर येणार्‍या ट्रकने बसला जोरदार ठोकर मारली. अपघातात यातील दहा जण जागेवरच ठार झाले तर 21 जण जखमी झाले. त्यांना सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचा अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

- Advertisement -

गोंधळी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मृतांमध्ये कल्याणच्या चिंचपाडा भागातील रहवासी संतोष गोंधळी यांच्या कुटुंबातील दोन जण दगावले त्यात त्यांची मुलगी दिशा आणि वाहिनी प्रमिला प्रकाश गोंधळी तसेच पत्नी श्रुतिका गोंधळी जबर जखमी झाली असून त्यांना सिन्नर मध्ये खासगी रुग्णालयात आयसियूमध्ये दाखल केले आहे. प्रमिला प्रकाश गोंधळी यांचा मृतदेह रत्नागिरीला त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आला आहे. अंबरनाथ मोरोवलीचे रहवासी नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैषाली उबाळे या पती पत्नींचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच त्यांची नऊ वर्षाची मुलगी निधी गंभीर जखमी झाली आहे. यात श्रवणी सुहास बावस्कर आणि बस चालक बालाजी कृष्णा मोहंती यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या सतरा जणांपैकी काही जणांची प्रकृती अत्यंत चिंता जनक आहे. त्यांचा उपचार सुरू आहेत.
अंबरनाथमध्ये लक्ष्मी पेकेजिंग या कंपनीचे मालक दर वर्षी त्यांच्या कामगारांना शिर्डी दर्शना साठी घेऊन जातात. त्यासाठी प्रत्येक कामगाराला पास दिला जातो. एका पासवर पाच ते सहा जण शिर्डी यात्रेला जातात. यंदा 14 बसेस काढण्यात आल्या होत्या. या बसेस मध्ये कंपनीचे कामगार आणि त्यांचे नातेवाईक असतात, या पूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती, असे काही कामगारांनी सांगितले.

अंबरनाथकर हेलावले
अपघाताच्या घटनेने अंबरनाथकराना हेलावून टाकले आहे. शहरातील नागरिकांनी मोरोवली गावात धाव घेऊन ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन तातडीने काही लोकांना शिर्डीकडे जाण्यासाठी गाड्यांची सोय करून दिली. तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा साहेब भुसे यांच्याशी संपर्क करून जखमींना तातडीनेची मदत देण्याची विनंती केली. या शिवाय मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर माहिती देऊन मदतीसाठी विनंती केली. मुख्यमंत्री यांनी तातडीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमीना खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची घोषणा केली.

- Advertisement -

आज अंत्यसंस्कार होण्याची शक्यता
अंबरनाथमध्ये पत्रकार संघांचे अध्यक्ष सुनील अहिरे यांच्या अध्यक्षते खाली पत्रकारांनी अपघातात दगावलेल्या मृतकांना श्रद्धांजली दिली. तसेच भाजपाचे अध्यक्ष अभिजित कारंजुळे यांच्या समवेत भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोरिवली ग्रामस्थांची भेट घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. मोरोवलीच्या ग्रामस्थांनी सांगितले की मृतदेह आण्यासाठी गावातील अनेक जण शिर्डी रवाना झाले आहेत. सर्वांचे अंत्यसंस्कार शनिवारी करण्यात येतील, अशी माहिती आहे.

मोरोवलीतील दुकाने बंद
अपघाताची माहिती सकाळपासून मोरीवली गावातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. अंबरनाथमधील अनेक भागात दुकाने आणि व्यवहार बंद होते. काही ऑटोरिक्षा चालकांनी मृतकांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना स्टेशनपासून मोरोवली गावापर्यंत मोफत सेवा दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -