दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटमधील बॉम्ब धमकीचा धक्कादायक खुलासा

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटमधील बॉम्ब धमकीचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हे विमान काल संध्याकाळी दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून उड्डाण करणार होते. परंतु या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच प्रवासी आणि विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांनी सतर्कता दाखवली होती. तसेच या प्रकरणाची सुरक्षा अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली होती. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार विमानात काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. तसेच हा कॉल फसवा असल्याचे देखील त्यांनी घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील बॉम्ब धमकीची माहिती खोटी दिल्यामुळे ब्रिटिश एअरवेजच्या प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)ला अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीच्या मित्रांच्या गर्लफ्रेंडला पुण्यात जायचे होते. मात्र, त्याच्या मित्रांना आपल्या गर्लफ्रेंडसोबत काही वेळ घालवायचा होता. त्यामुळे त्याने बॉम्ब असल्याची खोटी अफवा पसरवल्याचं सांगितलं जात आहे. तर या प्रकरणातील अजून दोन आरोपी फरार आहेत.

डीसीपी एअरपोर्ट रवी कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळच्या सुमारास स्पाइसजेटच्या केंद्रावर फ्लाइट क्रमांक SG-8938 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. हे विमान रात्री ९.३० वाजता दिल्लीहून पुण्याला उड्डाण करणार होते. परंतु यासंदर्भातील माहिती फक्त सीआयएसएफ कंट्रोल रूम आणि आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत सीआयएसएफ आणि एजन्सींनी तात्काळ कारवाई केली. सर्व एजन्सींनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती.

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान एका सुरक्षित स्थळी नेण्यात आले. ८०३ मध्ये पार्क करण्यात आले. शिवाय सर्व प्रवाशांच्या सामानाची कसून चौकशी करण्यात आली. विमानाचीही कसून चौकशी करण्यात आली. परंतु कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

मॉस्को-गोवा फ्लाइटमध्येही मिळाली होती बॉम्बविषयी माहिती

मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्येही सोमवारी संध्याकाळी बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. गोव्याकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांना गुजरातमधील जामनगरकडे वळवण्यात आले आणि गोवा एटीसीला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान चालकाला जामनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आली, असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मंगळवारी मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमधील प्रवाशांची सुरक्षा दलांनी चौकशी केली. मात्र, या फ्लाइटमध्ये काहीही संशयास्पद आढळून न आल्यानंतर विमान जामनगरहून गोव्यासाठी रवाना करण्यात आले.


हेही वाचा : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चर्चा, विमानतळावर उडाला गोंधळ