घरमहाराष्ट्रभाजपच्या अमरावती बंदला हिंसक वळण

भाजपच्या अमरावती बंदला हिंसक वळण

Subscribe

संचारबंदी लागू, इंटरनेटही स्थगित, दुकाने, वाहनांची तोडफोड

अमरावती शहर उसळलेल्या हिंसाचारानंतर अखेर शहरात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. अमरावतीचे प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी एका पत्रकाद्वारे संचारबंदीची घोषणा केली. आज दुपारी २ वाजल्यापासूनच ही संचारबंदी लागू करण्यात आल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्रिपुरातील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात रझा अकादमीने शुक्रवारी काढलेला मोर्चा आणि शनिवारी भाजप बंदच्या आवाहनानंतर उफाळलेला हिंसाचार लक्षात घेत संचारबंदी पुकारण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. आजच्या अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानेच गृह विभागाकडून तातडीचा उपाय म्हणून संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

संचारबंदीच्या कालावधीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून १३ नोव्हेंबरपासून दुपारी २ वाजल्यापासून संचारबंदीचा आदेश अमरावती शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी जारी केला. या संचारबंदीच्या कालावधीत कोणत्याही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणाकरिता बाहेर पडणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्रिपुरामध्ये मुस्लिमांवरील हल्ले आणि मोहम्मद पैंगबरांबद्दल वापरण्यात आलेल्या अपशब्दाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी भाजपने पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण आले आणि दुकाने आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली. शहरातील राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांकडून दुकानांवर तुफान दगडफेक सुरू होती. या घटनेनंतर शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून तो दोन दिवस कायम ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

वाढत्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, आंदोलकांची संख्या पाहता पोलीस फौजफाटा खूपच मर्यादित असल्याचे दिसत होते. यामुळे आंदोलकांना आवरणे पोलिसांना कठीण जात होते. अनेक ठिकाणी जमावाने मोठ्या संख्येने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. भाजपच्या अमरावती बंदच्या आवाहनामुळे आज संपूर्ण शहरातील दुकाने बंद होती. बंद असलेल्या दुकानांवरही आंदोलकांकडून दगडफेकीचे प्रकार सुरू होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करताना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन केले. हिंसाचार रोखण्यासाठी एसआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या बोलावण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पालकमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

राजकीय पोळी भाजण्यासाठीच हिंसाचार – यशोमती ठाकूर
अमरावतीची दंगल ही राजकीय पोळी भाजण्यासाठीच घडवण्यात आल्याचा आरोप अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला अहे. अमरावती राजकमल चौकातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनियंत्रित झालेल्या जमावाला पोलिसांनी एकत्रित ठिकाणी आणण्यासाठीचे प्रयत्न केले. काही हॉस्पिटल्सवरही हल्ला करण्यात आला. कोणत्याही हल्लेखोराला मोकळे सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हिंसाचाराच्या मुळाचा शोध लवकरच- शंभू राजे देसाई
हिंसाचाराच्या मुळाशी कोण आहे? हे कोण करायला लावत आहे? याचा पर्दाफाश केला जाईल. महाराष्ट्रातील लोकांना यामागची शक्ती कळेल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. काहीजण माथी भडकवण्याचे काम करत आहेत. याला बळी पडू नका. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असल्याचेही ते म्हणाले. गृहमंत्रीही सर्व अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. पोलीस दल कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तयार आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -