मुंबईत विचित्र अपघात, धावत्या रिक्षावर लोखंडी खांब कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबईतील जोगेश्वरी या परिसरात एक विचित्र अपघात घडला आहे. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीमधून एक लोखंडी खांब धावत्या रिक्षावर कोसळला. त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सोनार चाळ परिसरात घडली. एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी खांब धावत्या रिक्षावर कोसळला. या रिक्षात प्रवास करणाऱ्या माय लेकीचा गंभीर अपघात झाला. परंतु दुर्दैवानं या अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जोगेश्वरी पोलीस दाखल झाले. त्यांनी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला आणि लेकीला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


हेही वाचा : हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश